पौष वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
तैमूरचा राक्षसी प्रताप !
शके १३२१ च्या पौष व. ९ रोजीं तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणें रक्तपात करुन आपल्या मायदेशीं गेला. दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरु झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतांतील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्यानें स्वत:बरोबर घेतले. जातां जातांहि त्यानें पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरीं त्याच्या सैन्याची थट्टा कोणीं केली म्हणून त्यानें सर्वांची कत्तल केली. अग्नि व तरवार यांच्या साह्यानें तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथें आल्यावर त्यास समजलें कीं, गोमुखांतून गंगा पडते. या ‘पाखंडीपणा’ वर तो खूपच संतापला आणि त्यामुळें त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावें लागलें. लक्षावधि लोकांना त्यानें मृत्युलोकांत पाठविलें. "मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नांवाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिराचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतलें त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेंवीस झाले होते. केव्हां केव्हां जिवंत माणसांना चुन्याने व विटांनीं चिणूण त्यांचा तट बांधण्याचें काम तैमूरचे कुशल कारागीर करीत." हिंदुस्थानांत मोंगली जुलमास व्यवस्थितपणें सुरुवात तमूरनेंच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच भारतीय लोक समजत असत.
- १ जानेवारी १३९९
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP