पौष शुद्ध ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


केशवचंद्र सेन यांचें निधन !

शके १८०५ च्या पौष शु. ११ रोजीं ब्राह्मसमाजातील थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचें निधन झालें. यांचे घराणें कट्टें बंगाली वैष्णव होतें; यांच्या आजाचें नांव राजकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी हीं यांच्या मातापितरांचीं नांवें होतीं. शाळेंत असतांना बायबलाच्या वाचनाचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला आणि सन १८५७ मध्यें कुलामध्यें रुढ असणार्‍या वैष्णव सांप्रदयाची दीक्षा न घेतां ब्राह्मसमाजाची त्यांनीं दीक्षा घेतली आणि या कार्यासाठीं स्वत:ला वाहून घेतलें व ‘इंडियन मिरर’ नांवाचें इंग्रजी साप्ताहिक सुरु केलें. सन १८६४ मध्यें त्यांनीं प्रचारासाठीं मुंबई-मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने फार यशस्वी झाला; परंतु शेवटीं मतभेद झाल्यामुळें त्यांनी स्वतंत्रपणें ‘भारतवर्षीय ब्राह्मसमाज’ नांवाची संस्था सन १८६६ मध्यें काढली. त्यानंतर ते इंग्लंडमध्यें गेले. तेथें त्यांचा समाजसुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला. तेथूण परत मायदेशीं आल्यावर समाज सुधारण्यासाठीं त्यांनीं अनेक संस्था काढल्या. ‘सुलभ समाचार’ यासारखी नियतकालिकें त्यांनीं काढलीं. शेवटीं कांही खाजगी गोष्टींवरुन यांचे सहकारी फुटून दूर निघाले. त्यांनीं केशवचंद्रावर टीकेचा गहजब केला. या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला; आणि त्रस्त झालेल्या मनास विश्रांति मिळावी म्हणून यांनीं ध्यानधारणेसाठीं ‘साधनकानन’ नांवाची बाग तयार केली, परंतु येथेंहि त्यांना म्हणावी अशी शांति लाभली नाहीं. यांच्या परिवारांतील लोकांनीं स्वतंत्रपणें ‘साधारण ब्राह्मसमाज’ काढला. त्यामुळें यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला. तेव्हां यांनीं ‘नवविधान’ नांवाच्या पंथाची स्थापना केली. "यांच्याइतका प्रचंड व्याप करणारा, रोज नव्या कल्पना काढणारा, नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामें करुन घेणारा समाजसुधारक अलीकडच्या काळांत क्वचितच सांपडेल." जीवनवेद (आत्मचरित्र) व ब्राह्मधर्माधिष्ठान हे यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ होत.

- ८ जानेवारी १८८७

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP