पौष वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"बचेंगे तो और भी लढेंगे !"
शके १६८१ च्या पौष व. ८ रोजीं राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रांमांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचें निधन झालें. सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लीस आले. स्वत:चे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करुं असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यमार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलें नाहीं. पौष व. ८ रोजीं दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले. "शत्रूंनीं एकदम निशाणावर चाल केली आणि तोफांचा व बंदुकांचा मार मराठी फौजेवर जोराचा चालू केला. नदीच्या तीरावर अडचण भारी, शेरणीची बेटें असल्यामुळें पळून जाण्यास सोय पडेना ... आठ घटका पूर्ण होतांच पांचशें मनुष्य ठार झालें. दत्ताजी व जनकोजी यांस पळून जातां आलें असतें, परंतु तसें न करतां निशाणापाशींच लढत राहिले. तो जनकोजीचे दंडास गोळी लागून तो बेशुद्ध होऊन खालीं पडला. हें वर्तमान दत्ताजीस समजलें तेव्हां त्यानें जोरानें शत्रूंवर घोडे घातले. त्या गर्दीत यशवंतराव जगदाळे गोळी लागून पडला. त्याचें प्रेत काढावयास दत्ताजी पुढें गेला, तों त्याचे उजवे बरगडींत गोळी लागून तोहि तात्काळ गतप्राण झाला. तेव्हां सर्वांची अवसानें गेलीं." दत्ताजी गोळी लागून रणभूमीवर पडले तेव्हां त्यांना कुत्बशहानें विचारलें, "पटेल, लढेगे क्या ?" त्यावर त्यांनीं उत्तर दिलें, "बचेंगे तो और भी लढेंगे !" यावरुन दत्ताजीच्या शूरत्वाची कल्पना येते. "मराठ्यांच्या इतिहासांत जे कित्येक हृदयद्रावक प्रसंग आहेत त्यांत दत्ताजीच्या वरील पराक्रमाची गणना झाली पाहिजे. पानपतच्या प्रचंड संहारानें दत्ताजीचें अचाट कृत्य लोपून गेलें आहे. धन्याची कामगिरी पार पाडण्यासाठींच त्यानें आपल्या प्राणांची आहुति दिली." दत्ताजी शिंदे पडले आणि जनकोजी जखमी झाले हें समजतांच मल्हारराव होळकर शोक करुं लागले. त्या वेळीं त्यांची स्त्री गौतमाबाई हिनें सांगितलें, "सुभेदार, तुमचें वृद्धपण झालें. शिंदे यांच्या मुलाच्या तोंडचा जार वाळला नाहीं. ते मारतां मारतां मेले. तुमचे दिवस समीप आले. हिम्मत धरुन धरुन मारतां मारतां मरावें."
- १० जानेवारी १७६०
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP