पौष वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सोरटी सोमनाथांचा विध्वंस !
शके ९४८ च्या पौष व. १ रोजीं गझनीच्या महमुदानें सोरटी सोमनाथ या देवस्थानावर स्वारी केली आणि दैवत छिन्नभिन्न करुन अगणित लूट नेली. महमुदानें एकूण सतरा स्वार्या हिंदुस्थानावर केल्या. त्यांतील सोरटी सोमनाथवरील स्वारी विशेष महत्त्वाची आहे. काठेवाड द्वीपकल्पास पूर्वी सुराष्ट्र ऊर्फ सौराष्ट्र असें म्हणत असत. त्याच्या दक्षिण टोंकास लहानशा द्वीपकल्पावर सोमनाथाचें एक पवित्र व प्रख्यात असें देवस्थान होतें. सौराष्ट्र सोमनाथ याचा अपभ्रंश सोरटी सोमनाथ असा झाला आहे. हें देवस्थान अत्यंत संपन्न असें असून येथें दरवर्षी असंख्य यात्रा जमत असे. हजार ब्राह्मण सोमनाथाच्या पूजेसाठीं होते. या बलाढ्य देवस्थानाचा नाश करावा असा बेत महमुदानें केला. अत्यंत अवघड परिस्थितींत तीस हजार स्वार, तीस हजार उंट इत्यादि सामग्री घेऊन महमूद हिंदुस्थानांत आला. सोमनाथाच्या देवालयाभोंवतीं भक्कम असा तट होता. पौष व. १ शुक्रवार रोजीं ‘अल्ला हो अकबर’ आरोळी ठोकून महमुदानें निकराचा हल्ला चढविला. आसपासच्या रजपूत वीरांनीं निकरानें तोंड दिले. पण कांही उपयोग न होऊन देवालयांत महमुदाचा प्रवेश झाला. आंत सुवर्णमय शृंखलांनीं बद्ध झालेल्या घंटा लोंबत होत्या. गाभार्यांतील मूर्ति नऊ फॄट उंचीची होती. ब्राह्मणांनीं विनविलें, "सोन्याच्या राशी तुम्हांस देतों. मूर्ति फोडूं नका." यावर महमूद बोलला, "मूर्ति विकणारा (बुत्फरोश्) अशा कीर्तीपेक्षां ती फोडल्याची (बुत्शिकन्) कीर्ति मला अधिक प्रिय आहे." आपल्या हातातील सोटा त्यानें मूर्तीवर मारला. त्याबरोबर मूर्ति भंग पावून तींतून हिरेमाणकांचे ढीग बाहेर पडले ! सभोंवार आणखीहि सोन्याचांदीच्या शेंकडों मूर्ति होत्या. सर्व मालमत्ता एकूण तीसचाळीस कोटी रुपयांची होती. आज सोमनाथ छिन्नावस्थेंत भयाण रीतीनें उभा आहे. फक्त समुद्राच्या लाटाच त्याचें पाद्यपूजन करीत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथचा पुनरुद्धार करणार असल्याची योजना आहे.
- ७ जानेवारी १०२६
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP