पौष वद्य ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


स्वामी विवेकानंद यांचा जन्म !

शके १७८४ च्या पौष व. ७ रोजीं भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवानें नटलेली आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळें रसाळ गोमटीं’ या उक्तीप्रमाणें विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनीं ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान्‍ होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती. तिचा चेहरा भव्य व उदात्त असून त्यावर दिव्य शक्तीचें तेज ओसंडत असे. रामायण-महाभारतांतील कित्येक भाग तिनें मुखोद्‍गत केले होए. अशा या उच्च मातापितरांच्या पोटीं विवेकानंदांचा जन्म झाला. नामकरणाच्या दिवशीं अनेकांनीं ‘दुर्गादास’ हें नांव सुचविलें; परंतु भुवनेश्वरी देवीच्या पसंतीनें ‘वीरेश्वर’ हें नांव ठेवण्यांत आलें. पुढें नरेंद्र हेंच नांव रुढ झालें. लहानपणीं यांचा स्वभाव हट्टी व खोडकर असला तरी साधुसंतांविषयीं प्रेम यांना होतेंच. अलौकिक बुद्धिमत्त्ता, खेळाडूपणा, तेजस्विता या गुणांच्या साह्यानें नरेंद्रांचें शिक्षण झपाट्यानें होऊं लागलें. यांचा आवाज मोठा मधुर होता. बी.ए. ची परीक्षा दुसर्‍या दिवशीं असतांना यांच्या हृदयांत अध्यात्मज्ञानाचा दिव्य आनंद निर्माण झाला. त्यांची वृत्ति अध्यात्मचिंतनांत गुंगूं लागली. त्यांना योग्य असे रामकृष्ण परमहंस हे गुरु भेटले .... रामकृष्णांचा सहवास, हिंदुस्थानांतील भ्रमण, हिमालय व तिबेट येथील वास्तव्य, सन १८९३ मधील जपानमार्गे अमेरिकेचा प्रवास, धर्मपरिषदेंतील असामान्य कर्तृत्व, ‘राजयोग’ या ग्रंथाचें लेखन, इंग्लंडमधील पं. मॅक्समुल्लर व भगिनी निवेदिता यांची मैत्री, मायदेशीं परत आल्यावर रामकृष्ण मठाचीं स्थापना, सन १८९९ मध्यें परत अमेरिकेस जाण्याची तयारी, वाटेंत मधुमेयाचा विकार झाला म्हणून सिलोनमधूनच परत हिंदुस्थानांत आगमन आणि सन १९०२ मध्यें समाधिअवस्था असा यांचा संक्षिप्त जीवितक्रम आहे.

- १२ जानेवारी १८६३

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP