पौष शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पानपतच्या संग्रामानंतरची निरवानिरव !
शके १६८२ च्या पौष शु. ९ या दिवशीं आदल्याच दिवशीं पानिपतच्या भयंकर संहारांत पतन पावलेले यशवंतराव पवार, विश्वासराव, भाऊसाहेब, तुकोजी शिंदे, संताजी वाघ, आदि लोकांच्या शवांना अग्निसंस्कार देण्यांत आले. पौष शु. ८ ला भाऊसाहेब पडल्याची वार्ता रणांगणावर पसरतांच मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड यांनीं पळ काढण्यास सुरुवात केल्यावर सर्वत्र पळापळ सुरु झाली; आणि जेत्यांनीं एक प्रकारच्या आवेशानें सर्व पळणार्यांची कत्तल केली. शेवटीं दमून गेल्यानंतर कत्तल थांबली. दुसर्या दिवशीं म्हणजे पौष शु. ९ ला १५ तारखेस मराठ्यांच्या छावणींत जे जिवंत सांपडले त्यांची पुन्हा अत्यंत क्रूरपणें कत्तल झाली. या दिवशी मोठमोठ्या मराठे सरदारांच्या प्रेतांचा शोध लावावा म्हणून शेषधर पंडित, गणेश पंडित इ. सदाशिवरावभाऊंच्या माहितींतील इसम बरोबर घेऊन स्वत: सुजाउद्दौला घोड्यावर बसून रणभूमीवर फिरत होता. एका ढिगार्याखालीं प्रेताच्या अंगावर तीनचार रत्नें चमकली म्हणून तें वर काढलें. पायावरील व पाठीवरील जखमांचे वण पाहून तें सदाशिवरावांचें प्रेत होय असें समजून मंडळींनी त्यास अग्नि दिला. विश्वासरावांचे प्रेत पाहण्यास दुराणी लष्करांतून आबालवृद्ध जमले होते. पेशव्यांच्या घरांत विश्वासरावाएवढा सुंदर पुरुष झाला नव्हता. त्याचें शव पाहून अहमदशहा अब्दालीहि क्षणभर हळहळला ! सुजाउद्दौलाचा सरदार उमरावगीर गोसावी यानें तुकोजी शिंदे, संताजी वाघ, यशवंतराव पवार व विश्वासराव यांची प्रेतें तीन लक्ष रुपयांना सोडवून आणून ब्राह्मणांकरवीं त्यांना अग्नि दिला. भरतपूरच्या जाटानेंहि बहुत पैसा खर्च करुन लोकांचे प्राण वांचविले. या पानिपतच्या युद्धांत मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. चांदी, सोनें, हिरे-माणकें,पांचशें हत्ती, पन्नास हजार घोडे, एक हजार उंट इत्यादि पुष्कळच संपत्ति मराठ्यांच्या छावणींतून अब्दालीस मिळाली.
- १५ जानेवारी १७६१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP