ओंव्याचे अभंग - ६६६४ ते ६६६७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६६६४॥
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईन पवित्र पांडुरंग ॥१॥
दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥२॥
तिसरी माझी वोवी तिळा नाहीं ठाव । अवघाचि देव जनीं वनीं ॥३॥
चवथी माझी ओवी वैरिलें दळन । गाईन निधान पांडुरंग ॥४॥
पांचवी माझी ओवी माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंगा ॥५॥
साहावी माझी ओवी साहाही आटल । गुरुमूर्ति भेटले पांडुरंगा ॥६॥
सातवी माझी ओवीं आठवे वेळोवेळां । बैसलासे डोळां पांडुरंग ॥७॥
आठवी माझी ओवी अठ्ठावीस युगें । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥८॥
नववी माझी ओवी सरलें दळण । चुकलें मरण संसारीचें ॥९॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका म्हणे ॥१०॥

॥६६६५॥
पांडुरंगा करुं प्रथम नमना । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥
त्याच्या कृपादानें कथेचा विस्तारु । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण झाला मज संसारसंभ्रमें । सीतळ या नामें झाली काया ॥५॥
या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥
तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दु:खमूळ ॥८॥
मूळ नरकाचें राज्यमदें माते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामानिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणते तयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूणियां ॥१२॥
यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाहीं त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचें पुत्रपत्निबंधूवरी । सुटेल हा परि कैसें जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥
नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबरें खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हेंचि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयानें तारिले पाषाण सागरीं । तो घ्या ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळू हा ॥२३॥
हाचि माझा नेम हाचि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शीतळ रामनाम ॥२५॥
मना धीर करी दृढ चित्तीं धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळू भक्तां भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेंविण जाणा नाहीं त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी । तया गर्भवासी नाहीं येणें ॥३०॥
यावें गर्भवासी तरीच विष्णुदासीं । उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥
होती आवडते जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंबे ॥३२॥
भेदाभेद नाहीं चिंता दु:ख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥
वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नाम घोष ॥३४॥
संपदा तयां झाला संसारा येऊनी । भगवंत ऋणी भक्तीं केला ॥३६॥
लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥
विसरली तयां थोर झाली हाणी । पचविल्या खाणी चौर्‍यासीच्या ॥३८॥
शिकविलेंख तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक ते छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची कांहीं तरी करा । कांरे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचें कां नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥
जेणें अग्निमाजे घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भुक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥
नाहीं ऐसा तिहिं केला संवसार । दु:खाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥
कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गावां आल्याविण ॥४७॥
विनवितां दिवस बहुत लागती । ह्मणउनि चित्तीं देव धरा ॥४८॥
धरा पाया तुह्मी संतांचें जीवेंसी । वियोग तयांसी देवां नाहीं ॥४९॥
नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥
त्यांचीच उच्छिष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥
व्यासें सांगितलें भक्ति हेंचि सार । भवसिंधुपार तरावया ॥५२॥
तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनियां पुढें नेली एक्यासरें । निमित्तें उत्तरें ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावें भक्तां तारावया । जननी बाळ माया राखे तान्हें ॥५५॥
तान्हेलें भुकेलें ह्मणे वेळोवेळां । न मागतां लळा जाणोनियां ॥५६॥
जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥
धांवे सरवता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्हावा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥
पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशीलीं ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥
मरणाचें अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥
तयासी तो ठाव केलासे वैकुंठीं । वसे नाम चित्तीं सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी स्थिर कोठें ॥६५॥
कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥
सांपडे हा देव भाविकांचें हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥
नाहीं भले भक्ति केलीयावांचून । अहंता पापीणी नागवण ॥६८॥
नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जनां ठकलों तो ॥६९॥
तोचि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥
खाणी भरुनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥
ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनियां गेले एक पुढें । तयासी वांकुडे जातां ठके ॥७३॥
ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनी भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाठी । म्हणऊनि तुटी देवासवें ॥७५॥
सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकाचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करुनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचें दर्शन । नव्हे झाला पूर्ण षडकर्मी ॥७८॥
षडकर्मी हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सत्य देवा ॥७९॥
देवासी आवडे भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेला नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्ति थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलीया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥
पुढें पार त्याचा न कळेचि जातां । पाउलें देखतां ब्रह्मादिकां ॥८४॥
काय भक्तिपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनी वांकुडें मुख तैसें ॥८७॥
तैसें याचकाचें समाधानदाता । होय हा राखता सत्त्वकाळीं ॥८८॥
सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥
सत्वरजतम आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्यचि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तोचि एक ॥९४॥
एक चित्त धरुं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आह्मां ॥९५॥
आह्मांसी विश्वास त्याचिया नामाचा । ह्मणउनि वाचा घोष करुं ॥९६॥
करुं हरिकथा सुखाची समाधि । आणीकाची बुद्धि दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोकमोहो माया । शरण जातां या रे विठोबासी ॥९८॥
सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसें ॥९९॥
राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आतां ॥१००॥

॥६६६६॥
गाईन ओंविया पंढरीचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगलें हें चित्त माझें तया पायीं । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हाचि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥
नारायण नाम घालिता तुकासी । न येती या रासी तपतीर्थे ॥४॥
तीर्थे रज माथा वंदिती संतांचे । जे गाती हरीचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गातां पूज्य झाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥६॥
त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ऋषी विचारिता ॥७॥
विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जीव करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हाचि लीळा । व्यापूनि वेगळा पाहतसे ॥१०॥
सेवटीं आपण एकलाचि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग तया कोण भोगविशी ॥१२॥
विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाजा धनलोभें ॥१३॥
लोभें गिळी फांसा आमिषाच्या आशा । सांपडोनी मासा तळमळी ॥१४॥
तळमळ त्याची तरीच शोभेल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठवे हा तरी संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतर ॥१६॥
जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥
पुढें जाणोनियां करावें संचित । पूजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसें नव्हे तुह्मां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥२०॥
लावियेलीं कर्मे शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥२१॥
पावला सत्वर निष्काम उदार । जिंकीली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । तरलोंसें कोणी न ह्मणावें ॥२३॥
न ह्मणावें झाला पंडित वाचक । करुनि मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥
चाळविलीं एक तेचि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥
सुख तरीच घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥
राम हा उच्चार तरीच बैसे वाचे । अनंता जन्मांचें पुण्य होय ॥२७॥
पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥
यागयज्ञ तप संसारदायक । न तुटती एके नामेंविण ॥२९॥
नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥
जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुख धणी अमृताची ॥३१॥
अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥
नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसिद्ध हे ॥३३॥
हेंचिअ सुख आह्मी घेऊं सर्वकाळ । करुनी निर्मळ हरिकथा ॥३४॥
कथाकाळीं लागे सकळां समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥३५॥
नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥
विठोबाचे गुण मज आवडती । आणेक हे चित्तीं न लगे कांहीं ॥३७॥
कांहीं कोणी नका सांगो हे उपाव । माझ्या मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥
जाणोनियां आह्मी दिला जीवभाव । दृढ याचे पाव धरियेले ॥३९॥
धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला येच विशीं निरधार ॥४०॥
निरधार आतां राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करुनियां ॥४१॥
येणें अंगिकार केला पांडुरंगें । रंगविलों रंगें आपुलिया ॥४२॥
आपुली पाखर घालूनियां वरी । आह्मांसी तो करी यत्न देव ॥४३॥
देव राखे तया आणिकांचे काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥
तेथें नाहीं रिघ कळिकाळासी जातां । दास ह्मणवितां विठोबाचे ॥४५॥
विठोबाचे आह्मी लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥
धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुह्मी ॥४७॥
तुह्मी निद्सुरे नका राहूं कोणी । चुकवा जाचणी गर्भवास ॥४८॥
गर्भवासदु:ख यमाचें दंडण । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥
तान भूक पीडा जीतां ये आघात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥
जाच करिती हें कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥
बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥
धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरी नये ॥५३॥
न ये वरी कांहीं करितां उपाव । भोगवितो देव ज्याचें त्यासी ॥५४॥
त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥
नारायण नाम विसरलीं संवसारीं । तयांसी अघोरीं वास सत्य ॥५६॥
सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुह्मी ॥५७॥
तुह्मी नका मानूं कोणाचा विश्वास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥
धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियेले फांसे यमदूतीं ॥५९॥
दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥
नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तासी । नाना कर्मे त्यासी दुरावती ॥६१॥
दुराविलीं एकें जाणतींच फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥
वादभेद निंदा हे फंद काळाचे । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥
रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥
सेवटीं हे गळा लावूनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥
वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळीं जन्म धरी ॥६६॥
आठवावा देव मरणाचे काळीं । ह्मणउनि बळी जीव दिलें ॥६८॥
दिले टाकूनियां भोग ऋषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥
मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाठीं नेला अधोगती ॥७०॥
गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥
विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोंठें जावें वनांतरा ॥७२॥
तरती दुबळीं विठोबाच्या नांवें । संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥
शुद्ध तरे याचें काय तें नवल । ह्मणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥
वेळकाळ नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥
भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनी । संचित जाणोनी शुद्ध करा ॥७६॥
करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥
मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥
पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥
ठाउकें हें असे पाप पुण्य लोकां । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥
भोगतील एक दु:ख संवसारीं काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥
ल्यावें खावें बरें असावें सदैव । हेचि करी हांव संवसारीं ॥८२॥
संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥
वासनेचे मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥
सायास केलियावांचूनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥८५॥
नये दळें धड घालूं कांटयावरी । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥
हातीं आहे हित करील तयासी । ह्मणौउनि ऋषीं सांगितलें ॥८७॥
सांगती या लोका फजित करुनी । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥
तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥
गंगा चरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥
चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥
लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥
संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामनाम ॥९३॥
मग कोठें देव जाऊं न सके दूरी । बैसोनी भीतरी राहे कंठीं ॥९४॥
राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥
नेदी दु:ख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥
तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥
होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥
चेवले जे कोणी देहअभिमाने । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥
कृपाळु हा देव अनाथा कोंवसा । आह्मी त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥
लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका ह्मणे संगें संतांचिया ॥१०१॥

॥६६६७॥
विचार करिती बैसोनी गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांत एकल्या एकाच सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥
कुशाळा कवित्या कथित्या लोभिका । त्याही येथें नका आह्मांपाशीं ॥४॥
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । त्यां चोरोनी तिहीं खेट केली ॥५॥
भेऊनियां जना एकी सवा झाल्या । वाती विझविल्या दाटो बळें ॥६॥
कृष्णमुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी मेळविला ॥८॥
अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥
हरिरुपीं वृष्टि कानीं त्याच गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥११॥
विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥
अवस्था लागोनी निवळचि ठेल्या । एका एकी झाल्या कृष्णरुपा ॥१३॥
कृष्ण ह्मणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥
ताप कोण वारी गोविंदावाचूनी । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥
न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजी कामास ये उसिर केला ॥१६॥
रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीति कृष्णाचिया ॥१७॥
मागें कांहीं आह्मी चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥
आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥
अनुतापें झाल्या संतप्त त्या बाळा । टाकूनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥
जाणोनी चरित्र जवळीच होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥
होऊनी प्रगट दाखविलें रुप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥
निवालेया देखोनी कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दु:ख दुरावला ॥२३॥
साच भाव त्यांचा आणूनियां मना । आळंगिता राणा वैकुंठींचा ॥२४॥
हरिअंगसंगें हरिरुप झाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥
व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनी असतां घराचारी ॥२६॥
सकळा चोरोनी हरि जयां चित्तीं । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥
उणें पुरें त्यांचें पडों नेदी कांहीं । राखे सर्वा ठायीं देव तयां ॥२८॥
न कळे लाघव ब्रह्मदिकां माव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥
तुका ह्मणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP