वासुदेव अभंग - ६९३१ ते ६९३४

विविध अभंग

वासुदेव अभंग

॥६९३१॥
राम राम दोनी अक्षरें । सुलभ सोपारें ॥ जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तेंचि खरें गा ॥१॥
रामकृष्ण वासुदेवा । जाणवी जनासी ॥ वाजवी चिपळिया । टाळ घागर्‍याघोषें गा ॥२॥
गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा ॥ दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरी कांही ठेवा गा ॥३॥
एक वेळा जाणविती । धरुनियां राहा चित्तीं ॥ नेघें भार सांडीं कामा हातीं । नीज घेऊनी फिरती गा ॥४॥
सुपात्रीं सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव ॥ जाणती कृपाळू संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥५॥
शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवीं विसर ॥ कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥६॥

॥६९३२॥
बोल बोले अबोलणें । जागें बाहेर आंत निजेलें ॥ कैसे घरांत घरकुल केलें । नेणो अंधार ना उजेडलें गा ॥१॥
वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा ॥ कोणी कांही तरी दान करा । जाव नेदा तरी जातो माघारा गा ॥२॥
हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठयानें ॥ नाहीं निवडिलीं थोर लहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥३॥
मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां ॥ आहे ठाऊका सभाग्या संता । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥४॥
काय जागाचि निजलासी । सुनें जागवूनि दारापासीं ॥ तुझ्या हितापाटीं करी व्यास व्यासी भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥५॥
ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तिहीं केलें दान ॥ तुका म्हणे दुबळीं कोण कोण । गेलीं वासुदेवा विसरुन गा ॥६॥

॥६९३३॥
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत ॥ छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनी फिरत गा ॥१॥
जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव ॥ मग वोळगती । ऐसा मनीं वसुं द्यावा भाव गा ॥२॥
निज दासाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडी । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥३॥
अवघा सारुनी शेवट झाला । प्रयत्न न चले कांहीं केला ॥ जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥४॥
तुका ह्मणे रे धन्य त्याचें जिणें । जिहीं धातलें वासुदेवा दान । त्याला नलगे येणें जाणें । झाले वासुदेवीं राहणें गा ॥५॥

॥६९३४॥
यासी भांडावें तें तोंडें ॥ पुरे अंतरीचें कोडें ॥१॥
ऐसा घरींचा या मोळा ॥ जनां निकटा जवळा ॥२॥
हाका मारितांचि द्वारीं ॥ यावें धांवोनी बाहेरी ॥३॥
तुका म्हणे वासुदेवें ॥ मागितलें हातीं द्यावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP