बाळक्रीडा - ६७११ ते ६७२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७११॥
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पे वेष्टियेला ॥१॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्यांच्या धुधुकारें निवारलीं ॥२॥
निघतां आपटी धरुनी धांवामधीं । एकाचेंचि वधी माथें पायें ॥३॥
एकीं जीव दिले येतांच त्या धाकें । येतील तीं एकें काकुलती ॥४॥
यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥५॥
आतां करुं काम आलों जयासाठीं । हरि घाली मिठी काळयासी ॥६॥
यासी नाथुनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगून बहुडविलें ॥८॥
विसरु न पडे संवगडया गाई । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनी सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥११॥

॥६७१२॥
अवचित त्यांणी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुने बाहेरी । पालवितो करीं गडियांसी ॥२॥
गडियांसी ह्मणे वैकुंठनायक । या रे सकळीक मजपाशीं ॥३॥
मजपाशीं तुह्मां भय काय करी । जवळी या दुरी जाऊं नका ॥४॥
कानीं आइकिलें गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥
पाहों आले हरी जवळ सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाई वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥
लोटती सकळें एकावरी एक । होऊनी पृथक कुर्वाळलीं ॥८॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥
त्यांचपाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसी कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥
दिले गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥

॥६७१३॥
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देऊनी चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोळिया देऊनी नाचती । एक सादाविती हरि आला ॥३॥
आरंभीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोकां भूक तान नाहीं निद्रा डोळां । रुप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥७॥

॥६७१४॥
जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥
काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दु:ख कोणें सोसावें हें ॥२॥
हें दु:ख न सरे हरि न भेटे तों । त्यामागेंचि जातों एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवांपरता न करितें ॥४॥
करितों हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥

॥६७१५॥
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनी आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥
हरुषली माता केलें निंबलोण । गोपाळांवरुन कुरवंडी ॥३॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥
थोर सुख झालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनियां नारायण । काळ्या नाथून वहन केलें ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥
नारायणापुढें गोपाळ चालती आनंदें नाचती गाती गीत ॥८॥
तंव तो देखिला वैकुंठीचा पति । लोटांगणीं जाती सकळही ॥९॥
सकळही एका भावें आलिंगिलें । अवघियां झाले अवघे हरि ॥१०॥
हरि आलिंगनें हरिरुप झालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापभावें लोकपाळां ॥१२॥
मायबाप देखा नाहीं लोकपाल । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥

॥६७१६॥
नेणे वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघींच हरी आलिंगिलीं ॥१॥
हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणें तयांचें झालें एका वेळे । देखिलें सांवळें परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माला चौकदारीं ॥५॥
दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । राम कृष्ण गाणें नारायण ॥६॥
नारायण तिहीं पूजिला बहूतीं । नाना पुष्पयाती करुनियां ॥७॥
यांचें ऋण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥
हीं नवह्तीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाऋणी ॥९॥
सेवाऋणें तुका म्हणे रुपधारी । भक्तांचा कैवारी नारायण ॥१०॥

॥६७१७॥
नारायण आले निज मंदिरासी । झाले या लोकांसी बहुडविते ॥१॥
बहुडविले बहु केले समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥
सकळां भातुक वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥
लोभ दावूनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणें ॥७॥

॥६७१८॥
झाला कवतुक करिता रोकडें । आणिकही पुढें नारायण ॥१॥
येऊनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रयाजीं ॥२॥
इंद्रा दहीं दूध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनी वाटे त्यांचें ॥३॥
हिरोनी घेतल्या कावडी सकळा । म्हणति गोपाळा बरें नव्हें ॥४॥
नव्हे तेंचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥

॥६७१९॥
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव तया भीऊंनका ॥१॥
नका धरुं भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसी ॥२॥
गौळियांसी धीर नाहीं या वचनें । आशंकित मनें वेडावलीं ॥३॥
वेडावलीं त्यांस न कळतां माव । देवाआदिदेव नोळखतां ॥४॥
नोळखतां दु:खें वाहाती शरीरीं । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥

॥६७२०॥
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥
अंगसंगें तयां न कळे हा देव । कळोनी संदेह मागुतला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥
बुद्धि स्थिर होऊं नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दु:खी होती ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP