दळण अभंग - ६७८८ ते ६७९८

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७८८॥
शुद्ध दळणाचें सुख सांगो काई । मानवीत सईबाई तुज ॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥२॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥३॥
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥४॥
तुका ह्मणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥५॥

॥६७८९॥
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥
वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥२॥
एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥३॥
तुका ह्मणे वाळवंट ॥ बरवें नीट उत्तम ॥४॥

॥६७९०॥
याल तर या रे लागें । अवघें माझ्या मागें मागें ॥१॥
आजी देतों पोटभरी । पुरे ह्मणाल तोंवरी ॥२॥
हळूहळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥३॥
तुका ह्मणे सांडा घाटे । तेणें नका भरुं पोटें ॥४॥

॥६७९१॥
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥
तुह्मी व्हा रे दोहींकडे । मुख पसरुनी गडे ॥२॥
वाहती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥३॥
तुका ह्मणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥४॥

॥६७९२॥
शुद्ध वोजा धान्य आडसुनी काठी । पाखडोनी सांडी भूस सर्व ॥१॥
निसोनियां बाई सांडी सर्व खडे । करुनियां झाडे संचिताचे ॥२॥
देउनियां घाव मागतो गोंडाळ । वेंचूनी समूळ रज काढी ॥३॥
घोळुनीयां घोळ ठेवी एकी सवा । सांचूनियां द्यावा घाव त्यासी ॥४॥
आंतील जो कण तयामाजी रेती । वेंचूनी परती त्यागावी ते ॥५॥
तुका ह्मणे तेव्हां दळणा सारिला । नाहीं तरी केला लाज फार ॥६॥

॥६७९३॥
निवडावे खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥
नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥२॥
निवडावे तन । सेतीं करावें राखण ॥३॥
तुका ह्मणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥४॥

॥६७९४॥
पळाले ते भ्याड । त्यांसी येथें झाला नाड ॥१॥
धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥२॥
आपुलिया मतीं । पडलीं विचारींतीं रितीं ॥३॥
तुका लागे घ्या रे पायां । कैं पावाल या ठाया ॥४॥

॥६७९५॥
धालें मग पाटे । केला गडयांनीं बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥२॥
खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥३॥
तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥४॥

॥६७९६॥
पाह्ती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥
ह्मणती नंदाचिया पोरें । आजी चोरी केली खरें ॥२॥
त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥३॥
सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥४॥

॥६७९७॥
आतां ऐसें करुं । दोघां धरुनियां मारुं ॥१॥
न बोटाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥२॥
कोंडूं घरामधीं । न बोलोनी जागों बुद्धी ॥३॥
बोलवितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥४॥

॥६७९८॥
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥
आह्मी न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥२॥
न साहावे भार ॥ बहु लागतो उशीर ॥३॥
तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP