बाळक्रीडा - ६७२१ ते ६७३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७२१॥
दु:खी होती लोभें करावें तें काई । उडतील गाई म्हैसी आतां ॥१॥
आणीकही कांहीं होईल अरिष्ट । नाइके हा धीट सांगितलें ॥२॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासी देवा रागें ॥३॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोंकवी गोपाळ क्रोधियांसी ॥४॥
क्रोध देवावरी धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥५॥

॥६७२२॥
भाग त्या सुखाचे वांकडया बोबडयां । आपलिया गडयां भाविकांसी ॥१॥
भारवाही गेले टाकूनी कावडी । नवनीतगोडी भाविकांसी ॥२॥
काला करुनियां वांटिला सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥
खेळेमेळे दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥४॥
कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य झाला ॥५॥

॥६७२३॥
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिया मेघा आज्ञा करी राव । गोकुळीचा ठाव उरों नेदा ॥२॥
नेदाविया गाई म्हैसी वांचों लोक । पुरा सकळीक सिळाधारी ॥३॥
धाक नाहीं माझा गौळियांच्या पोरां । सकळीक मारा म्हणे मेघां ॥४॥
म्हणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलो मी ॥५॥
मीपणें हा देव नकळेचि त्यांसी । अभिमानें रासी गर्वाचिया ॥६॥
अभिमानराशि जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥

॥६७२४॥
देव त्यां फावला भाविकां गोपाळा । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥
नाडलीं आपल्या आपणचि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥
फारें चालविलीं नेदी कळों भाव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावांचूनी कळों नये खरा । अभक्तां अधिरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळी त्या दुरी । तुका ह्मणे हरि देतो घेतो ॥५॥

॥६७२५॥
तो या साचभावें न कळेचि इंद्रा । ह्मणऊनी धारा घालीसिळा ॥१॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥४॥
लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥
आतां काय कैसा करावा विचार । गोधनासी थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारें होणार तें कायीं । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥७॥

॥६७२६॥
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसी ॥१॥
शिरीं धरुं गोवर्धन उचलूनी । ह्मणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाकां आरोळिया ॥३॥
आशंकित चित्तें न वाटे त्यां खरें । धाकेंच ते बरें ह्मणती चला ॥४॥
चित्तीं धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥५॥

॥६७२७॥
नेदी दु:ख देखों दासा नारायण । ठेवी निवारुन आल्या आधीं ॥१॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागे मग सुखरुप ॥२॥
पर्वतासी हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥
आपल्या आपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासी ॥४॥
निमित्य करुनी करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥
दीनाचा कृपाळू पतितपावन । हें करी वचन साच खरें ॥६॥
सांगणें न लगे सुखदु:ख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥७॥

॥६७२८॥
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥
निघाले या भेणें पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरीं चहुंकडे । हांसे फुंदे रडे कोणी धाकें ॥३॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥
तया खालीं गाई वत्सें आलीं लोक । पक्षी सकळीक जीवजाति ॥५॥
जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥
जाति कुळ नाहीं तयांसी प्रमाण । अनन्या अनन्य तुइका ह्मणे ॥७॥

॥६७२९॥
त्यांसी राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासी वास पाहों नेदी ॥१॥
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥
येऊनी दगड बैसतील गिरी । वरुषला धारी शिळांचिये ॥३॥
शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥
एक सरें गिरी धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसें ॥५॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मी आतां हात सोडा ॥६॥
हांसती गोपाळ करुनी नवल । आइकोनी बोल गोविंदाचे ॥७॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥
भार आह्मांवरी घालूनी निराळा । राहिलासी डोला चुकवूनी ॥९॥
निमित्य अंगुली लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसी ॥१०॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकेंचि खरें मानूनियां ॥११॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥१२॥

॥६७३०॥
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणावें ॥१॥
बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्याचें ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥
लटिका चि आम्ही सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसी ॥४॥
आलें कळों तुका ह्मणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP