बाळक्रीडा - ६६९१ ते ६७००
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६६९१॥
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसा थाट चाले ॥१॥
वाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥
सोयी लागलीया तयांची अनंतीं । न बोलावितां येती मागें तया ॥३॥
तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तेंचि सुख ॥४॥
सुख नाहीं कोणा हरीच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥
॥६६९२॥
जाय फाकोनियां निवडोनी गाई । आपुल्याच सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापें ॥२॥
गोविंदें वेधीलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचे ॥३॥
॥६६९३॥
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा ह्मणे गुणमय । निंबलोण मयि उतरिलें ॥२॥
उतरुन हातें धरी हनुवठी । ओवाळुनी दिठी सांडियेली ॥३॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥
लहान हा थोर जीवजंतु भुतें । आपण दैवतें झाला देवी ॥५॥
देवी ह्मैसासुर मुंजिया खेचर । लहानहि थोर देव हरि ॥६॥
हरि तुका म्हणे अवघा एकला । परि हा धाकुला भक्तीसाठीं ॥७॥
॥६६९४॥
भक्तीसाठीं केली यशोदेसी आळी । थिंकोनियां चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळूनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥२॥
दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥
देवापाशीं पुसे देव काय झाला । हांसे आलें बोला याचें हरि ॥४॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥
लटिकें तें साच साच तें लटिकें । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥
सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तव तें ब्रह्मांड देखे माजी ॥७॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणे बाळलीळा ॥८॥
लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥
देवें कवतुक दाखविलें तयां । लागती ते पायां मायबाप ॥१०॥
मायबाप ह्मणे हाचि देव खरा । आणिक पसारा लटिका तो ॥११॥
तोहि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तोहि मीच ॥१२॥
मीच ह्मणउनी जें जें तेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥
तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥१४॥
तद्भावना तैसें भविष्य तयांचें । फळ देता साचें मीच एक ॥१५॥
मीच एक खरा बोले नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥१७॥
॥६६९५॥
नारायण भूतीं न कळे जयांसी । तयां गर्भवासीं येणें जाणें ॥१॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥
बुडीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तयां चित्तीं ॥४॥
चित्त तें निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजि हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखेंचि ॥६॥
चिंतनें तयांच्या तरती आणीक । जो हें सकळीक देव देखे ॥७॥
देव देखे तोही देव कसा नव्हे । उरला संदेहें काय त्यासी ॥८॥
काया वाचा मनें पुजावे वैष्णव । ह्मणउनी भाव धरुनियां ॥९॥
यांसीं कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनी गोपाळांसी ॥१०॥
गोपाळांसी डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरुप ॥११॥
पसरुनी मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारुनिया पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलासि ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसी ॥१५॥
सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकासी साचा भाव दावी ॥१६॥
॥६६९६॥
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥
सांगे गोपाळांसी काय पुण्य होतें । वाचलों जळते आगी हातीं ॥२॥
आजी आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वांचतों ॥३॥
न वांचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठीं । बोले जगजेठी गोपाळांसी ॥५॥
गोपाळांसी ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका ह्मणे करविता आपण । द्यावें थोरपण सेवकांसी ॥७॥
॥६६९७॥
काय आह्मां चालविसी वायांविण । ह्मणती दुरुन देखिलासी ॥१॥
लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयांचि कुंची झाकूं ॥३॥
झालासी थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धुर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥
भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका ह्मणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥
॥६६९८॥
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियासी भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥
दुराविले दूर आशाबद्ध देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥४॥
चित्तीं द्रव्यदारा पुत्रादि संपत्ति । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिला विसरोनीं देवा । बुडाले ते भवनदीमाजी ॥६॥
जिहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥७॥
॥६६९९॥
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥
मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिलें तिनें करुनी आरती । पुसे दसवंती गोपाळांसी ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुक कानीं आइकतां त्याचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळूहळू दोहीं मायबापां ॥७॥
हळूहळू त्यांचे पुण्य झालें वाड । वारलें हें झाड तिमिराचें ॥८॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । झालिया प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥
॥६७००॥
काय आतां यासी ह्मणावें लेकरु । जनाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासी राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासी । माझें माझें ऐसें करी बाळा ॥३॥
करी कवतुके कळों नेदी कोणा । योजुनी कारणा तेंचि खेळे ॥४॥
तें सुख लुटिलें घरींचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2019
TOP