डाका अभंग - ६९१५ ते ६९२४

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६९१५॥
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनी ये धांवोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥२॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ॥ अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥३॥
मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा तुटी ॥ भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनी केला हाकारा ॥४॥
डांका अनुहात गजरे । येउनी अंगासी संचरे ॥ आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥५॥

॥६९१६॥
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणांचा फुलवरा । आणा विनती सांगतों ॥१॥
माझें दैवत हें रेंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं ॥ भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥२॥
तुझे आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी ॥ चिवडूनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥३॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥४॥
आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥५॥
उगविलीं कोडीं मागें कितेकांची बापुडीं ॥ तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥६॥

॥६९१७॥
विनती घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं ॥ पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥
रंगा येई वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥२॥
देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथें ॥ ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवत ॥३॥
न लवीं आतां वेळ । आइत सारिलीं सकळ ॥ तुका म्हणे कुळ । आमुचियेद दैवते ॥४॥

॥६९१८॥
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा ॥ त्रिभुवनी याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥
या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी ॥ करील झाडणी । भूत काढी संसार ॥२॥
पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी ॥ हरिनाम आरोळी । कानीं प्रेमभरें । अवघे ठाव सांडूनी ॥४॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा ॥ अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥५॥
तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनींचा संदेह ॥ आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥६॥

॥६९१९॥
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी ॥ मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥
एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा ॥ माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥२॥
आतां निवारील रोगा ॥ माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥२॥
मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ ॥ तुम्ही केलें वळ । मग मी ठायीं न पडें ॥३॥
तुका म्हणे मुळीं । लागली ते आली कुळीं ॥ वंदूनी सकळीं ॥ जीवें भावें ओवाळा ॥४॥

॥६९२०॥
अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाव । धरितांचि भाव कोठें नाहीसें झालें ॥१॥
दिसे सारिखें सारिखें । परि ते कारणीं पारिखें ॥ तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥२॥
पट एका शिरीं यथाविधीनें त्या येरी ॥ वसकोळया घागरी । डेरे रांझण नाडगीं ॥३॥
तुका म्हणे माना । येथें कोणी रुसावें ना ॥ आपुलाल्या स्थानां । जेथें त्याचि शोभल्या ॥४॥

॥६९२१॥
खेचर खडतर । काळ कांपती असुर ॥ नांदे भीमातीर । पंढरपुरपाटणीं ॥१॥
आतां करी कां रे हाकारा । सहस्त्रनामें एकसरा ॥ दवडिते खेचरा । अंगसंगें धरुनी ॥२॥
सीते झाली झडपणी । राहाणें वासुगीच्या वनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥३॥
लाविलें कावरें । प्रल्हादा ह्मैसासुरें ॥ आली येकसरें । दांत खात रंगासी ॥४॥
वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें । आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥५॥
पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं ॥ धांवोनियां काढी । अंगसंगें वाहाविलीं ॥६॥
नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण ॥ न विचारितां हीण भाव देखे जयाचा ॥७॥
कुळींची कुळदेवता । तुका ह्मणे आह्मां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥८॥

॥६९२२॥
देवी देव झाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥
हरिनाम देवनाम तुह्मी गाऊनिया जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥२॥
शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥३॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका ह्मणे बरीं आजी कोडीं उगविलीं ॥४॥

॥६९२३॥
झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥
मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥२॥
नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥३॥
तुका ह्मणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥४॥

॥६९२४॥
अंगीं देवी खेळे । कां रे तुह्मांसी न कळे ॥ कोणाचे हे चाळे । सुख दु:ख न मनितां ॥१॥
मी तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं ॥ पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥२॥
आपुलाले तुह्मी पुसा । सोवा एव्याच सरिसा ॥ स्थिरावल्या कैसा । काय जाणों विचार ॥३॥
तुक ह्मणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ ॥ मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP