कोडें - ६७७० ते ६७७८

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७७०॥
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनी फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झंवे आपुली आई ॥२॥
सांगतों हें मूळ कांही न धरावी खंती । झालें जीवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥३॥
तुका ह्मणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥४॥

॥६७७१॥
नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालूनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥
आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥२॥
कमाईस मोल येथें नका रीस मानूं । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥३॥
तुका ह्मणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥४॥

॥६७७२॥
हरुष आनंदाचा । घोष करा हरिनामाचा ॥ कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित ॥ होईल करीत । आला अधिकारी तो ॥२॥
काय पाहतां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई ॥ पोटभरीं कांहीं । घेतां उरी न ठेवा ॥३॥
जे सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे ॥ तुका ह्मणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥४॥

॥६७७३॥
अवघे गोपाळ ह्मणती या रे करुं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ॥
नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरेंच बोला । वंची वंचला तोचि रे येथें भोवंडला त्याला ॥१॥
घेतल्यांवाचूण झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ॥
ताका सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥२॥
एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनी मोटा । एक सोडितिल गाठी रे एक चालती वाटा ॥
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करुनि आराले आतां ऐसेंचि घाटा ॥३॥
एकीं स्थिरावल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ॥
एकें चारावोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला ह्मणती एक हुंबरी घेती ॥४॥
एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ॥
गांठीचें तें सांडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोडी रे भार वाहतां मेलें ॥५॥
एक ते माया गुंतलें घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीच ठावें ॥
जैसें होतें शिळें संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचूनी मग पडिलें ठावें ॥६॥
एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ॥
एकते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥७॥
तुका ह्मणे आतां कान्होबा आह्मां वांटोनी द्यावें । आहें नाहीं आह्मांपाशीं तें तुअ आवघेंचि ठावें ॥
मोकलितां तुह्मी शरण आह्मी कवणासी जावें । कृपावंतें कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥८॥

॥६७७४॥
बैसवूनी फेरी । गडियां मध्यभागीं हरी ॥ अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥
पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥२॥
बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें ॥ एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥३॥
तुका ह्मणे देवा । बहु आवडीचा हेवा ॥ कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥४॥

॥६७७५॥
आह्मां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें ॥ नाहीं अनारिसे । कान्होबाचे अंतरीं ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना ॥ कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥२॥
खेळ खेळे न पडे डाई । ज्याचा भार त्याच्या ठायीं ॥ कोणी पडतील डाई । कोणी कोडीं उगविती ॥३॥
तुका ह्मणे कवळ । हातीं घेऊनी गोपाळ ॥ देत ज्यांचें बळ । त्यांसी तैसा विभाग ॥४॥

॥६७७६॥
काम सारुनी सकळ । आले अवघे गोपाळ ॥ झाली आतां वेळ । ह्मणती आणा सिदोर्‍या ॥१॥
देती आपुलाला झाडा । माई बैसविल्या वाडां ॥ दोंदिल बोबडा । वांकडयाचा हरि मेळीं ॥२॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥३॥
भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी ॥ सकळांचे संदीं । ओझीं अवघीं उतरलीं ॥४॥
मागे जो तांतडी । त्यासी रागा येती गडी ॥ तुह्मी कांरे कुडी । येथें मिथ्या भावना ॥५॥
एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें ॥ तुका ह्मणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥६॥

॥६७७७॥
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करुं आजी ॥
अवघें एके ठायीं । करुनी स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हांमाजी देतों ॥१॥
ह्मणती बरवे गोपाळ । ह्मणती बरवे गोपाळ । वाहती सकळ । मोहरी पांवें आनंदें ॥
खडकीं सोडियेल्या मोटा । आवघा केला एकवटा । काळा वंदूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥२॥
एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे ॥
ह्मणती गोड झालें । ह्मणती गोड झालें । आणिक देई । नाहीं पोठ धालें ॥३॥
हात नेतो मुखापासीं । येर अशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ॥
देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं ॥ धरुनी काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥४॥
ह्मणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा ॥ दुम करितो शाहणा । पाठोवाटीं तयाच्या ॥
अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय ॥ सुरवर ह्मणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥५॥
एक एका मारी । दुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । ह्मणे पुरे आतां ॥
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । ह्मणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥६॥
आनंदाचे फेरी । माजी घालूनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ॥
वांकडे बोबडे । खडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥७॥
करी कवतुक । त्यांचे देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ॥
एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥८॥
नाहीं ज्याची गेली भूक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखेंचि हरि ॥
ह्मणती भला भला हरी । तुझी संगति रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥९॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । झालें यमुनेंचे स्थिर । जळ वाहों ठेलें ॥
देव पाहाती सकळ । मुखें घोटुनियां लाळ ॥ धन्य ह्मणती गोपाळ । धिग झालां आह्मी ॥१०॥
ह्मणती कैसें करावें । ह्मणती कैसें करावें । यमुनाजळीखं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ॥
सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिकचि होंठ ॥ मटमटां वाजवी ॥११॥
आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । ह्मणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ॥
म्हणती जाणें जेवीचें । ह्मणती जाणी जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥१२॥
धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझियानि हातें ॥
मानवले गडी एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१३॥
तुझासंग बरवा । नित्य आह्मां द्यावा । ऐसें करुनी जीवा । नित्य देवा चालावें ॥
तंव ह्मणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । अता जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१४॥
तुका ह्मणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसी केली । आपण यांसरी ॥
आजी झाला आनंद । आजी झाला आनंद । चाले परमानंद । सवें आह्मांसह्ति ॥१५॥

॥६७७८॥
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनिंचा ॥१॥
वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥२॥
उरलें तें सांडा काम नका करुं गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥३॥
निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥४॥
कृष्णभेटी आड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झालें उदास ॥५॥
एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका ह्मणे देवें रुपें केल्या तन्मय ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP