बाळक्रीडा - ६७३१ ते ६७४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७३१॥
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भले ॥२॥
भला आजी तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूंचि एक ॥४॥
एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥
आजिवरी आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥
तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवर्द्धना राखियेलें ॥७॥
राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसी । दगडाच्या रासी वरुषतां ॥८॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळही ॥९॥
सकळही तान विसरलीं भूक । सकळही सुख दिलें त्यांसी ॥१०॥
त्यांसी कळों आला वैकुंठनायक । तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥११॥

॥६७३२॥
लोकां कळों आला देव आह्मामधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥
शंका नाहीं थोरां लहानां जीवांसी । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥
मग मनीं झाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त झालें त्यांचें ॥४॥
त्यांसी ठावा नाहीं बाहेरील भाव । अंतरींच वाव सुख झालें ॥५॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥
चिंतनेंचि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥७॥

॥६७३३॥
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥
गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥
काज काम त्यांचे सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषम तें हरि दिसों नेदी ॥४॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥५॥

॥६७३४॥
कृष्णाचिया सुखें भूक नाहीं तान । सदा समाधान सकळांचे ॥१॥
कळलेंचि नाहीं झाले किती दिस । बाहेरील वास विसरलीं ॥२॥
विसरु कामाचा तुका ह्मणे झाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥

॥६७३५॥
जावें बाहेरी ना नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥
कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठीं भक्त देहावरी । आणिताहे हरि बोलावया ॥३॥
यासी नांव रुप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥
मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघें ॥५॥
दोघे वेगळाले लेखील जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडलीं सकळही पापें । भक्तांचिय कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवीं प्राणा नाश करी ॥८॥
करितां आइके निंदा या संतांची । तया होती तेचि अध:पात ॥९॥
पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संतसेवीं ॥१०॥
संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका ह्मणे यासी नाश नाहीं ॥११॥

॥६७३६॥
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळही ॥१॥
सकळही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाई वत्स पशु जीवां ॥४॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥५॥

॥६७३७॥
यांसी समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा ह्मणे देव ॥१॥
देव राखे तय आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥
दासां दु:ख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥
नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढें भक्तांचे सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥

॥६७३८॥
काकुलती एकें पाहाता बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक झालेम ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥
भावें तया पुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पावे ॥५॥
वत्सें गाई पशु नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाचया ॥६॥
चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें देवाचें तयाहूने ॥७॥
तयाहूनी कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥

॥६७३९॥
गोकुळींची गति कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडीवार । सकळ संहार करुनी आलों ॥२॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥

॥६७४०॥
नाचतां देखिलीं गाई वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसी येथें ॥२॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥
विचारितां उंचलिला गोवर्द्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासी ॥६॥
सीणतां जो ध्याना नये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥
समागमें गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥
संग झाला मायबापां लोकपाळां । आलिंगिती गळां कंठाकंठ ॥९॥
करिते हे झाले स्तुति सकळीक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टि पुष्पवरुषाव । देवाआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ॥१२॥
नामाचा गजर गंधर्वाचीं गाणीं । अनंद भुवनीं न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचें ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP