परमभक्त विदुराच्या गृहत्यागाचीं कारणें सांगून परीक्षितीला त्यांनीं उद्धवाच्या तीर्थयात्रेची माहिती सांगितली. यमुनेच्या तीरावर त्याला श्रीकृष्णाचा केवळ प्राणच जो उद्धव तो भेटला. त्यांचा भक्तिरसपूर्ण प्रेमळ संवाद श्रवणीय, वाचनीय आणि चिंतनीय आहे. प्रामुख्यानें त्या संवादांत त्या उभयांचें श्रीकृष्णप्रेम ओसंडून गेलेलें पहावयास मिळतें. श्रीकृष्णाचें चरित्र गातां ऐकतांना त्या दोघांना अष्टसात्विक भावांनीं अंतर्बाह्य रंगवून टाकिलेलें प्रत्ययास येतें. या संवादांतील श्रीकृष्णाचे निजधामास गेल्याचें वृत्त तर हृदय विदीर्ण करतें. शुक महामुनि म्हणाले राजा, भक्तिज्ञानाचा प्रचार करण्यास एकमेव प्रात्र असल्याचें जाणून भगवंतांनीं उद्धवास बदरी वनांत पाठविलें व ते निजधामास गेले. हें वृत्त ऐकून प्रेमविव्हल विदुर गंगातीरीं मैत्रेयमुनींच्या आश्रमांत गेला. सहाव्या अध्यायापासून या सर्व स्कंधांत विदुर मैत्रेय संवादचा विस्तारानें गायलेला आहे. त्यांत विदुराच्या अनेक प्रश्नांस मैत्रेयांनीं उत्तरें दिलीं असून पुढें भागवत पुराणाची शेष, सनत्कुमार, सांख्यायनऋषि, पराशर व बृहस्पति, व बृहस्पतिपासून मी (मैत्रेय) अशी एक पीठिका सांगून तें त्यांनीं विदुरास सांगितलें. त्यांत काळाची उत्पत्ति, दशविधसृष्टि, कालाचें कोष्टक आणि आयुर्मान, मनुशतरुपेची उत्पत्ती वराहहिरण्याक्षवृत्त, नानाविधप्रजोत्पत्ति, कर्दमदेवहुति विवाह, कपिलजन्म, त्यांचा देवहुतीस सांरख्य, योग, भक्ति इत्यादि मोक्षोपकारक उपदेश, ध्यान कसें करावें, भक्तीचे प्रकार व तिची श्रेष्ठता, मृत्युपाषाणापासून मानवापर्यंतच्या श्रेष्ठतेचा क्रम, जीवाच्या संसार यातना, प्राणी जन्माला कसा येतो, त्याची गर्भातील स्थिति व त्याचें परमेश्वराजवळ मागणें, बाल्य पौगंडादि अवस्था, स्त्रीसंगतीचे दुष्परिणाम, जन्म मरणाचें स्वरुप, निर्गुणभक्तीचें महत्व व देवहूतीची कृतार्थता इत्यादि ज्ञानवैराग्यकारक विषय या स्कंधांत परिणामकारकरीतीनें आलेले आहेत.