स्कंध ३ रा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३८
ब्रह्मा म्हणे ईशा, महत्तपें अद्य । जाहलों कृतार्थ दर्शनें या ॥१॥
त्वदज्ञान हाचि दोष या जीवांचा । तुजविण एका नसे कांहीं ॥२॥
ज्ञानरुपा, तुज बाधे न अज्ञान । केलेंसी निर्माण तूंचि मज ॥३॥
अव्यय शाश्वत अलिप्त त्वद्रूप । भक्तकल्याणार्थ दिससी मज ॥४॥
नास्तिकांचे तर्क नरकद्वार तें । दुर्लक्षूनि त्यांतें नमितों तुज ॥५॥
वेद हाचि वायु पादपद्मरजें । पुनीत भक्तांतें करी नित्य ॥६॥
जोंवरी निर्भय त्वपादचिंतन । न घडे तों जाण भवपीडा ॥७॥
वासुदेव म्हणे अल्पलाभास्तव । अंतरे माधव मूढ जना ॥८॥

३९
त्रिदोष, षड्रिपु, क्षुधापिपासादि । बाधस ती जनांसी अज्ञानानें ॥१॥
श्रवणकीर्तनविन्मुख ते घोर । दु:खामाजी थोर पडती नित्य ॥२॥
ध्यानींमनींस्वप्नीं द्रव्यचि त्यां दिसे । सुखनिद्रा त्यांतें नसे कदा ॥३॥
तथापि न हेतु पूर्ण होती त्यांचे । जवळीच असे नित्य दैव ॥४॥
भक्त तुझे नित्य दर्शनें कृतार्थ । निर्दयां अप्राप्य सर्वदा तूं ॥५॥
निष्काम त्वदर्थ आचरी जो धर्म । तोचि जनीं धन्य ज्ञानरुप ॥६॥
वासुदेव म्हणे अंतकाळीं हरि - । चरित्रचि, तारी श्रवणें भक्तां ॥७॥

४०
विश्वद्रुममूळ त्वदाश्रित माया । ब्रह्मायादि त्या तया शाखा तीन ॥१॥
उपशाखा तयां होती बहुतचि । वंदन तुजसी कालरुपा ॥२॥
विन्मुख जे तुज तयां कालबाधा । वर्णवेन तुझा महिमा मज ॥३॥
आयुष्य मजसी द्विपरार्ध अब्दें । विश्ववंद्य मातें मानिताती ॥४॥
ऐशा मजसीही भय तुझें  देवा । अनुग्रह व्हावा सर्वकाळ ॥५॥
आत्मानंदमग्ना धर्मरक्षणार्थ । लीलामात्रें नित्य अवतरसी ॥६॥
तम, मोह, महामोह, तैं तमिस्त्र । तया अंधतामिस्त्र मायावृत्ति ॥७॥
पार तूं तयांच्या परी शेषशायी । वंदन हें घेईं नारायणा ॥८॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा ईश्वरासी । बहुपरी प्रार्थी नम्रभावें ॥९॥

४१
बह्मा म्हणे देवा, ज्ञानैश्वर्ययोग । घडावा बुद्धीस माझ्या नित्य ॥१॥
तेणें सृष्युत्पत्तिसामर्थ्य पावेन । गुणगानीं मन लीन होवो ॥२॥
निमित्त मजसी केलेंसी, वेदांचें - । विस्मरण, मातें न होवोचि ॥३॥
कृपासागरा, हे कमललोचना । करीं अवलोकना मजकडे ॥४॥
मधुर भाषणें बोलें मजप्रति । होतील त्रैलोक्यीं उपकार ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तो स्तव । बोलला केशव विरंचीतें ॥६॥

४२
ब्रह्मदेवाप्रति बोले भगवंत । त्यजूनि आळस सृष्टि रचीं ॥१॥
सिद्धचि ते परी होई तूं निमित्त । आचरितां तप ध्यानीं येई ॥२॥
तपश्चर्या माझी उपजवी भक्ती । जेणें सर्वांभूतीं मीचि दिसें ॥३॥
मजमाजी भूतें, अग्नीसम काष्ठीं । पाही तो मजसी तोचि ज्ञाता ॥४॥
भूत-भूतकार्याहूनि जीव भिन्न । साक्षात्परब्रह्म कळतां मुक्ति ॥५॥
मम आशीर्वादें पुरतील हेतु । भक्तीचि हा केतु साधनांचा ॥६॥
देहादिक जीवां प्रिय हे वाटती । आत्मा मी तयांसी प्रियतम ॥७॥
वेदस्वरुप तूं सकलांचा आत्मा । पूर्वकल्पज्ञाना स्मरण करीं ॥८॥
तेणें तूं सहज निर्मिसील सृष्टि । बोलूनि जगजेठी गुप्त झाले ॥९॥
वासुदेव म्हणे ईश्वरीप्रसाद । होतांचि तीं सिद्ध सकल कार्येम ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP