स्कंध ३ रा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४९
कोणाही द्रव्याचा अंतिम विभाग । परमाणु तयास म्हणती ज्ञाते ॥१॥
सान्निध्यें तयांच्या पदार्थावबोध । स्थूल सूक्ष्म रुप द्रव्या हेंचि ॥२॥
पदार्थावभुक्त स्थूल काल जाण । सूक्ष्म तोचि जाण अनुपभुक्त ॥३॥
दोन परमाणु तो ‘अणु’, तीन अणु । मिळतां ‘त्रसरेणु’ म्हणती तया ॥४॥
जालार्क किरणीं सूक्ष्म रज:कण । त्रसरेणु जाण तेचि बापा ॥५॥
तीन त्रसरेणुगमनासी जो काल । ‘त्रुटि’ संज्ञा बोल तयालागीं ॥६॥
शत त्रुटि ‘वेध’ तीन वेधें ‘लव’ । त्रिगुण जो लव ‘निमेष’ तो ॥७॥
निमेष जे तीन ‘क्षण’ तो गणावा । ‘काष्ठा’ ऐशा नांवा पांच क्षण ॥८॥
पंचदश काष्ठा ‘लघु’ तया नाम । पंचदश गुण लघु ‘घटि’ ॥९॥
वासुदेव म्हणे ‘मुहूर्त’ द्विघटि । षट्‍, सप्त कीं घटी ‘प्रहर’ जाण ॥१०॥
चार प्रहर तो ‘दिन’ मानवाचा । तितुकाचि साचा रजनीकाळ ॥१॥
पंचदश अहोरात्री तोचि ‘पक्ष’ । कृष्ण आणि शुद्ध पक्ष दोन ॥२॥
पक्षद्वयें ‘मास’ पितरांचा दिन । ‘ऋतु’ मास दोन होतां घडे ॥३॥
षण्मासें ‘अयन’ दक्षिण-उत्तर । दक्षिण ते रात्र, उत्तर दिन ॥४॥
ऐसें मानवांचें ‘वर्ष’ ‘अहोरात्र’ । देवांचे साचार जाणावे ते ॥५॥
शतसंवत्सर आयुष्य मानवा । भ्रमणकाल हा आदित्याचा ॥६॥
सूर्य, बृहस्पति, सवन, चंद्र, तारे । पंच संवत्सरें गतीनें त्या ॥७॥
संवत्सर, परि, इडा अनु, वत्सर । पंच हे प्रकार जाणावे ते ॥८॥
वासुदेव म्हणे भौतिकचि सूर्य । तया नमस्कार प्रेरकासी ॥९॥

५१
त्या त्या मानें शतायु ते देवादिक । वसती भृग्वादिक किती काळ ? ॥१॥
मैत्रेय विदुराप्रति निवेदिती । संधीसवें जाती चार युगें ॥२॥
द्वादश सहस्त्र अब्दें तैं देवांचीं । गणना हे शास्त्रीं कथिली असे ॥३॥
सहस्त्र ते चार, तीन दोन एक । द्विगुण शताधिक अनुक्रमें ॥४॥
कृतत्रेतादिकां मर्यादा काळाची । क्रिया हे तेथींची कथिली असे ॥५॥
वासुदेव म्हणे चतुष्पादधर्म । प्रतियुगीं न्यून पाद एक ॥६॥

५२
देवांची सहस्त्र वर्षे तोचि दिन । तितुकीच जाण रात्र जेथें ॥१॥
ब्रह्मदिन ऐसा सृष्टिक्रम चाले । चौदा मन्वन्तरें प्रतिदिनीं ॥२॥
सहस्त्र चौकडयांहूनि अल्पाधिक । प्रति मनु देख वास करी ॥३॥
परिवारासवें प्रति मनु येई । नियोजित राही काल त्याचा ॥४॥
प्रतिदिनीं ऐसा सृष्टीचा विस्तार । दिनान्तीं संहार होत असे ॥५॥
पुढती प्रलयीं शेषशायीं हरि । योगनिद्रा वरी आनंदानें ॥६॥
द्वितीय परार्ध सांप्रत हा जाण । तेंवी ब्राह्म पाद्म थोर कल्प ॥७॥
वराहावतारें कल्प हा वाराह । बंदी वासुदेव वराहा त्या ॥८॥

५३
द्विपरार्ध ऐसें ब्रह्ययाचें आयुष्य । निमेषचि एक अनंताचें ॥१॥
आपरमाणु तो द्विपरार्धवरी । काल सत्ताधारी अहंभावें ॥२॥
परमात्म्यावरी सत्ता न तयाची । व्यापकता त्याची ध्यानीं आणीं ॥३॥
ब्रह्मांडकोश हा अर्धशतकोटी - । योजनें, ज्या पोटीं विस्तारला ॥४॥
सभोंवती त्याच्या वेष्टणें तीं सप्त । दशगुण श्रेष्ठ प्रत्येक तें ॥५॥
ब्रह्मांडकोश हा परमाणुमाजी । ऐसे कोट्यवधि कोश जेथें ॥६॥
अक्षरब्रह्म तें सकलां कारण । वासुदेवा ध्यान घडो त्याचें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP