स्कंध ३ रा - अध्याय २३ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
११४
कांतेसवे मनु जातां स्वस्थळासी । पाळी देवहूती सतीधर्मा ॥१॥
तोषवी सेवेनें पाळूनियां आज्ञा । पतीस्तव प्राणां तुच्छ लेखी ॥२॥
पार्वती - शंकरांसम तें दांपत्य । देवहूती शुद्ध अंतर्बाह्य ॥३॥
औदार्य, गांभीर्य, इंद्रियविजय । सद्गुणवास्तवय नित्य तेथें ॥४॥
स्वैराचार, दंभ, वैर, लोभ, पाप । गर्वादि अलिप्त दुर्गुणेंसी ॥५॥
दीर्घकाल ऐसी करितां शुश्रूषा । देहासी कृशता येई तिच्या ॥६॥
वासुदेव म्हणे दयाळु कर्दम । पाहूनि सत्कर्म द्र्वला मनीं ॥७॥
११५
देवहूती पती मानूनियां श्रेष्ठ । कांता निष्कपट करी सेवा ॥१॥
व्रतें उद्यापनें झिजविला देह । अद्यापि न भाव पूर्ण केला ॥२॥
चिंतूनियां ऐसें कर्दम बोलती । अकृत्रिम चित्तीं प्रेम तुझ्या ॥३॥
पाहूनि ही सेवा जाहलों संतुष्ट । तुच्छ प्रिय देह लेखिसी हा ॥४॥
विविध भोगेच्छा जाणतों मी तव । मजप्रति दिव्य भोगप्राप्ति ॥५॥
कांते, तुज आतां देतों दिव्यदृष्टि । भोग हे अवलोकीं दिव्य माझे ॥६॥
शाश्वत न चक्रवर्तीतेंही प्राप्य । कल्पनाही त्यास नसे यांची ॥७॥
वासुदेव म्हणे अनासक्त सेवा । करितां थोर ठेवा लाभतसे ॥८॥
११६
कर्दमवचनें लज्जायुक्त सती । विनये पतीसी वदली मोदें ॥१॥
प्रभो, योगमायाधीशा हें वचन । करा आतां पूर्ण परमोदारा ॥२॥
अपत्यचि महालाभ हा स्त्रियांसी । संगमोत्सवासी उत्सुक मी ॥३॥
यास्तव निर्मावीं सकल साधनें । देह अन्नपानें पुष्ट होवो ॥४॥
रम्य मंदिरही अवश्य निर्मावें । हेतु पुरवावे ऐसे मम ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि कर्दम । निर्मिती विमान एक दिव्य ॥६॥
११७
इच्छेसम गति जेथ इच्छापूर्ती । रत्नस्तंभ भित्ती हीरकांच्या ॥१॥
रत्नद्वारें,इंद्रनीलांचीं शिखरें । कलश शोभले कनकमय ॥२॥
रत्नपीठें बहु पर्यक रत्नांचे । शुभ्र शय्या जेथें विराजल्या ॥३॥
तोरणें व्यजनें बहुविध स्थानें । सुरम्य प्रांगणें सभोंवार ॥४॥
हंस मयुरादि पक्षी हुबेहुब । रत्नमय तेथ शोभा देती ॥५॥
पाहूनि तयांसी नभचारी पक्षी । प्रत्यक्षचि येती तयास्थानीं ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसें तें विमान । साधन संपन्न निर्मियेलें ॥७॥
११८
अंतर्ज्ञानें मुनि बोलले कांतेसी । दासींस्तव चित्तीं न करीं चिंता ॥१॥
बिंदुसरोवरीं करुनियां स्नान । शोभवीं विमान त्वरितचि हें ॥२॥
सकलही तव पुरतील काम । पूर्ण तें वचन करी साध्वी ॥३॥
सहस्त्र तरुणी पाहिल्या विमानीं । साशंकित मनीं होई तदा ॥४॥
देवहूतीप्रति वंदिती त्या स्त्रिया । म्हणती गणाच्या दासी आम्हीं ॥५॥
होईल जें आज्ञा करुं तेचि पूर्ण । स्तब्धचि ऐकून देवहूती ॥६॥
भावज्ञ दासींनीं सुगंधी तैलांनीं । न्हाणिलें मर्दूनि स्वामिनीतें ॥७॥
वासुदेव म्हणे षड्रसान्नें पेयें । भोजनही झालें अत्यानंदें ॥८॥
११९
त्रयोदशगुणी तांबूल अर्पिला । विविधालंकारां तेजवूनि ॥१॥
दिव्य महावस्त्रें यथेच्छ अर्पूनि । आदर्श आणूनि पुढती केला ॥२॥
आधींच लावण्य, अभ्यंग त्यामाजी । बहु झळाळती अलंकार ॥३॥
दिव्यवस्त्रयुक्त ऐसी देवहूती । वर्णवेन शोभा तदा ॥४॥
पाहूनि आदर्श, स्मरण पतीचें । होतांचि तो जेथें तेथ जाई ॥५॥
वासुदेव म्हणे विस्मित अंतरीं । इच्छा जे जे करी पूर्ण तेचि ॥६॥
१२०
विमानीं तीं दोघें बैसूनि आनंदें । जाती नभोमार्गे यथाकाम ॥१॥
स्वर्गांतूनि गंगा पडे भूमीवरी । शोभा ते पाहिली अति रम्य ॥२॥
‘वैश्रंभक’ ‘सुरसन’ तैं मानस’ । तें ‘पुष्पभद्रक’ ‘चैत्ररथ्य’ ॥३॥
‘नंदनवना’ दि देवउद्यानें तीं । पाही देवहूती परम हर्षे ॥४॥
कामाधीन मनीं न होती कर्दम । त्रैलोक्यांत स्थान नुरलें रम्य ॥५॥
वासुदेव म्हणे संचार करुनि । दीर्घकाळें मुनि सदनीं येती ॥६॥
१२१
रतिसुखास्तव उत्सुक ते सती । लाभावी संतति इच्छी बहु ॥१॥
जाणूनि हें मुनि शतवर्षे क्रीडा । करी क्षण साचा वाटे तयां ॥२॥
पतिपत्नीप्रेम असे जरी शुद्ध । प्रजाही तरीच श्रेष्ठ होई ॥३॥
ऐशाभावें मुनि अर्धांग आपुलें । मानूनि प्रियेतें सौख्य देती ॥४॥
आसक्त न परी होती ते कदाहि । पुढती गर्भ राही सतीलागीं ॥५॥
योग्यवेळीं तिज कन्या होती नऊ । मुनिवचें बहु दु:ख तिज ॥६॥
वासुदेव म्हणे कन्या सुकोमल । अंग रक्तोत्पलसम त्यांचें ॥७॥
१२२
देवहूनि दु:ख आंवरुनि प्रेमें । विनम्रवचनें मुनिसी वदे ॥१॥
पतिराया, एक प्रार्थना चरणीं । बोध मज कोणी केला नाहीं ॥२॥
विषयसंगति धरिली मीं चित्तीं । बोध न कांहीचि त्वत्संगानें ॥३॥
सज्जनसंगानें मूढरी उद्धरे । हेतु पुरवावे हेचि माझे ॥४॥
ब्रह्मवेत्ता एक पुत्र द्या मजसी । जोडितें करांसी विनती एक ॥५॥
वासुदेव म्हणे विनम्र भावना । धरुनि वचना बोले सती ॥६॥
१२३
धर्मसाधक न ऐसी । क्रिया व्यर्थ मानवाची ॥१॥
अथवा वैराग्यसाधक । होई न तें कर्म व्यर्थ ॥२॥
जेणें ईशपदीं प्रेम । उपजे न ऐसें कर्म ॥३॥
घडे जन्म त्याचा व्यर्थ । असतां जिवंत तो प्रेत ॥४॥
प्रभो, सामर्थ्य तुम्हांसी । घडो मज मोक्षप्राप्ति ॥५॥
आजवरी भ्रमलें मन । मायापाश हा दारुण ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसी । प्रार्थीतसे देवहूती ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2019
TOP