स्कंध ३ रा - अध्याय ३ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१७
रामासवें कृष्ण गेला मथुरेसी । वधिलें कंसासी पराक्रमें ॥१॥
माता-पित्यालागीं आनंदित केलें । सांदीपनी झाले गुरु त्यांचे ॥२॥
धनुर्विद्या वेदवेदांगनिपुण । होती, जाण अल्प यत्नें ॥३॥
मृत पुत्र देती आणूनि गुरुसी । सांदीपनी ऋषि तदा तुष्ट ॥४॥
पुढती जाहलें रुक्मिणीहरण । सत्येस्तव पण जिंकियेला ॥५॥
अपमानक्रुद्ध नृपाळ युद्धासी । येतां जिंकी त्यांसी लीलामात्रें ॥६॥
वासुदेव म्हणे सत्येसवें कृष्ण । हर्षित होऊन सदनीं येई ॥७॥
१८
अदितिमातेचा कुंडलापहार । करी भौमसुर एकावेळीं ॥१॥
प्रार्थितां इंद्रानें भामेसवें कृष्ण । दैत्यासी वधून कार्य साधी ॥२॥
भामेस्तव तदा पारिजातवृक्ष । आणितां शचीस क्रोध येई ॥३॥
कांतावचे इंद्र कृष्णावरी येई । फजित तो होई परी अंतीं ॥४॥
भौमासुरपुत्रा अर्पूनियां राज्य । षोडश सहस्त्र कन्यामुक्ति ॥५॥
करुनि, तयांसी नेई द्वारकेतें । भिन्न भिन्न रुपें वरिलें तयां- ॥६॥
अलौकिक ऐसा दाविला प्रभाव । होती दशपुत्र प्रत्येकीसी ॥७॥
वासुदेव म्हणे ईश्वरावांचून । लीला ऐशा कोण करुं शके ॥८॥
१९
यवन शाल्य ते जरासंधादिक । जिंकूनि भक्तांस रक्षियेलें ॥१॥
पांडवांनिमित्त क्षत्रियसंहार । करुनि भूभार हरिला बहु ॥२॥
भक्तांचाचि जय, करुनि हें सिद्ध । अर्पियेलें राज्य पांडवांसी ॥३॥
उत्तरेचा गर्भ रक्षूनि संकटी । गेला द्वारकेसी अत्यानंदें ॥४॥
पद्मपत्र जळीं तैसा अनासक्त । राहूनि समस्त विषय भोगी ॥५॥
पुढती यादवां होईअ विप्रशाप । प्रभास तीर्थास करिती दानें ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्ण भगवान । अतर्क्यचि जाण खेळ करी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP