स्कंध ३ रा - अध्याय ४ था
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
२०
पुढती यादव भोजन करुनि । मदिरा प्राशूनि धुंद झाले ॥१॥
मदिराधुंद ते करितां प्रलाप । कलहकारक वदले वाणी ॥२॥
परस्पराघात करुनि समस्त । दग्ध वेणुवृंद तैसे नष्ट ॥३॥
ऐसा निर्निमित्त होऊनि कलह । नष्ट झाले सर्व यादववीर ॥४॥
वासुदेव म्हणे माया ईश्वराची । पार न कोणासी लागे तिचा ॥५॥
२१
पाहूनि तें सर्व कृष्ण लीलाधारी । सरस्वतीतीरीं निघूनि जाई ॥१॥
पवित्र त्या जळें करी आचमन । अश्वत्थ पाहून बसला खालीं ॥२॥
बदरिकाश्रमीं जावें ऐसें मज । कथिलें पूर्वीच श्रीहरीनें ॥३॥
परी तो वियोग साहवे न मज । गेलों मागोमाग तयास्थानीं ॥४॥
चतुर्भुज पीतवसन तैं हरी । शोभला मुरारी पूर्वींहुनि ॥५॥
वामपादावरी दक्षिण चरण । अश्वत्था टेंकून बसला होता ॥६॥
स्वानन्दनिमग्न होता तदा देव । ध्यान वासुदेव करी त्याचें ॥७॥
२२
इतुक्यांत गुरुबन्धु श्रीव्यासांचे । मैत्रेय, भक्तीचें भवन येती ॥१॥
कृष्णभगवान बोलला तैं मज । दुर्मीळ तें तुज देतों आतां ॥२॥
अष्टवसूंमाजी उद्धवा, तूं एक । पूर्वजन्मीं तप केलें बहु ॥३॥
एकान्तीं तूं ऐशा समयीं आलासी । जन्म-मरणभीति चुकली तेणें ॥४॥
पुरा जें ब्रह्मयासी कथियेलें ज्ञान । निवेदितों जाण तेंचि तुज ॥५॥
भागवत तया बोलताती ज्ञाते । कथूनियां मातें अवलोकिलें ॥६॥
वासुदेव म्हणे होतां कृपादृष्टि । रोमांच ठाकती उद्धवातें ॥७॥
२३
कांहीं काळ ऐसा होतों रुद्धकंठ । विदुरा, प्रभूस वदलों मग ॥१॥
देवा त्वद्भक्तांसी लाभती पुरुषार्थ । परी देईं मज चरणसेवा ॥२॥
असूनि निरिच्छ केलींस तूं कर्मे । अजन्माचि जन्मे भक्तांस्तव ॥३॥
काळाच्याही काळा भयें लपलासी । संसार केलासी आत्मारामा ॥४॥
ऐशा या विरुद्ध क्रियांसी पाहून । होती मोहमग्न परम ज्ञाते ॥५॥
सर्वज्ञा, प्रसंगीं अग्रबुद्धासम । पुशिलेंसी ज्ञान मजलागींही ॥६॥
आश्चर्य तयाचें वाटे मज नित्य । करीं आतां बोध मजसी कृष्णा ॥७॥
वासुदेव म्हणे उद्धववचनें । ज्ञान नारायणें दिधलें त्यासी ॥८॥
२४
प्रदक्षिणा तया प्रभु दामोदरा । घालूनि विदुरा, गेलों सुखें ॥१॥
वियोग तयाचा साहवे न आतां । जातों बदरिका आश्रमासी ॥२॥
कल्पान्तपर्यंत नरनारायण । करितील जाण तप तेथें ॥३॥
ऐकूनि विदुर आंवरुनि दु:ख । म्हणे तें कृष्णोक्त ज्ञान कथीं ॥४॥
उद्धव तयासी म्हणे त्वत्स्मरण । झालें होतें जाण श्रीकृष्णासी ॥५॥
मैत्रेयांनीं बोध करावा हा तुज । बोलला गोविंद ऐसें तयां ॥६॥
पुढती उद्धव बदरिकाश्रमीं । गेला आंवरुनि दु:खभार ॥७॥
वासुदेव म्हणे परीक्षितप्रश्न । शुकासी सुजाण करी ऐका ॥८॥
२५
मुने, उद्धवचि राहिला तो कैसा । यादवकुळाचा नाश होतां ॥१॥
मुनि बोलले तैं राया, उद्धवासी । आज्ञा श्रीहरीची संरक्षक ॥२॥
ज्ञानसंरक्षणा योग्य हा उद्धव । जाणूनि केशव संरक्षी त्या ॥३॥
उद्धवगमनें स्मरुनि वृत्तान्त । होई खिन्नचित्त विदुर बहु ॥४॥
आठवण माझी केली नारायणें । द्रवला या स्मरणें चित्तीं क्षता ॥५॥
वासुदेव म्हणे मैत्रेयआश्रमीं । गेला तो निघूनि गंगाद्वारीं ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP