स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८८

मुनि म्हणे माते, काम्यकर्मफल । कथितों सकल घेईं ध्यानीं ॥१॥
चारा घालूनियां दुग्ध जैं धेनूचें । काढावें हें तैसें काम्यकर्म ॥२॥
चारा दुग्ध, चारा दुग्ध, ऐसें चक्र । कामनापूर्वक कर्म तेंवी ॥३॥
त्यजूनियां यज्ञ भागवतधर्म । पाळूनि, नियम करी बहु ॥४॥
चंद्रलोकही त्या लाभेल त्या पुण्यें । पुण्यक्षयें येणें फिरुनि घडे ॥५॥
द्रव्य देऊनियां वस्तु संपादितां । संबंध तयाचा सुटे जेंवी ॥६॥
दैनंदिन होतां प्रलय जे नष्ट । ऐसे पुण्यलोक काम्यकर्मे ॥७॥
वासुदेव म्हणे अनासक्त कर्म । करितां न जन्म-मरण पुन्हां ॥८॥

१८७
अभेद भक्ति ते मूर्तिमंत मुक्ति । अनासक्त भक्ति करी ब्रह्मा ॥१॥
परी सृष्टीकर्ता ऐसा अभिमान । न सुटेचि जाण अंतरींचा ॥२॥
तेणें पुन: सृष्टि निर्माणसमयीं । विरंचीही येई पुनर्जन्मा ॥३॥
अधिकारस्थित तैसेचि ते ऋषि । अभिमानें घेती पुनर्जन्म ॥४॥
विरंचीआदिकां जेथ ऐसी स्थिति । काय इतरांची क्षति तेथ ॥५॥
वासुदेव म्हणे आतां काम्यकर्म । मातेसी कथन करिती मुनि ॥६॥

१८८
फलकामास्तव कथिलीं तीं काम्य । न करावीं जाण ऐसें नसे ॥१॥
उपयोग इच्छा धरुनियां मनीं । रमती काम्यकर्मी त्यजूनि देवा ॥२॥
अर्थकार्यास्तव आचरिती धर्म । नामसंकीर्तन नावडे त्यां ॥।३॥
विष्टाचि जयांसी रुचे त्यां मधुरान्न । अर्पियचि जाण तैसेंचि हें ॥४॥
ईशकथामृत टाकूनियां गोष्टी - । प्रापंचिक त्यांसी रुचती बहु ॥५॥
सत्य सत्य माते, दुर्दैवी ते जन । श्रीहरीचे गुण रुचती न ज्यां ॥६॥
वासुदेत म्हणे संकीर्तनीं दंग । तयासी श्रीरंग मुक्त करी ॥७॥

१८९
षोडश संस्कारें पितृलोकप्राप्ति । पुनरपि त्यासी स्वकुळीं जन्म ॥१॥
पुण्यक्षयें होई तयासी पतन । ऐसें काम्यकर्म धोका देई ॥२॥
माते, यास्तव तूं निष्काम भजन । करुनियां मन स्थिर करीं ॥३॥
तेणें इंद्रियांचा खटोटोप संपे । दृश्यद्रष्टाऐक्यें परमानंद ॥४॥
परब्रह्म तेंचि उपनिषदोक्त । परमात्मा योगशास्त्रीं नाम ॥५॥
सांख्याचा पुरुष भक्तां भगवंत । सकळही मार्ग वैराग्याचे ॥६॥
वासुदेव म्हणे प्रपंच हा मिथ्या । बोध कपिलांचा मातेप्रति ॥७॥

१९०
अनासक्त चित्तें आचरावा योग । भक्ति अंतरांत धरुनि माते ॥१॥
निर्गुण ज्ञान कीं निष्काम ते भक्ति । योग्यता तयाची एक असे ॥२॥
रुप, रस, गंध, स्पशादिकें जेंवी । साक्षात्कार होईअ पदार्थांचा ॥३॥
भिन्न भिन्न मार्गे तैसाचि ईश्वर । देई साक्षात्कार साधकासी ॥४॥
सगुण ते त्रिधा तैसीच निर्गुण । चतुर्विध जाण भक्ति ऐसी ॥५॥
कालगतीही ते निवेदिली तुज । अतर्क्य सामर्थ्य कालाचें त्या ॥६॥
वासुदेव म्हणे स्वस्वरुपभ्रम । संसारनिमग्न जीवाप्रति ॥७॥

१९१
दुरभिमानी दुष्ट उद्धत दुष्कर्मा । गूढतत्त्वज्ञाना अपात्र तो ॥१॥
यास्तव तें कदा न कथावें त्यासी । लोभी भक्तद्वेषी तोही त्याज्य ॥२॥
विषयनिमग्न अपात्रचि एथ । निवेदितों पात्र कोण तेंही ॥३॥
आस्तिक्य, नम्रता, तत्त्वज्ञाननिष्ठा । भगवंतीं ज्याचा प्रेमभावे ॥४॥
निर्मत्सर सदा सेवी गुरुजनां । वैराग्यही जाणा विषयांचें ज्या ॥५॥
तोचि उपदेशपात्र या विषयीं । श्रवणाचें पाहीं श्रेष्ठ फल ॥६॥
पठणही याचे सद्‍गतिदायक । वासुदेव चित्त द्यावें म्हणे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP