अग्नीचें स्वरुप
शरीरामध्यें घेतलेल्या आहाराचें शरीरभावांत रुपांतर करण्याचें कार्य ज्याच्या द्वारां होतें त्यास अग्नि असें म्हणतात. अन्न कितीहि सर्व गुणसंपन्न असलें व धातूचें योग्य तें पोषण करणारें असलें तरी अग्निचें कार्य जर उत्तम होत नसेल तर आहारापासून शरीरांतील धातूपधातू चांगल्या प्रकारें तयार होणार नाहींत. (च.चि. १५-५) यामुळें शरीराचें बल, स्वास्थ्य, वर्ण, कांती, उत्साह, वृषता ओज, आयुष्य हें सर्व अग्निवरच अवलंबून आहे (च.चि.१५-३) स्वास्थ्य शब्दानें प्रसन्नात्मेंद्रियमनस्त्व अभिप्रेत असल्यानें अग्नीच्या कार्यक्षमतेवरच शारीरभावाप्रमाणेंच मनुष्याचें बौद्धिक, मानसिक प्रसन्नत्वहि, अवलंबून असतें असें म्हटलें पाहिजे. अग्नि हें नांव दिलें असलें तरी शारीरद्रव्यांचा विचार करतां तो पित्तापेक्षां वेगळा नाहीं. शक्तीत: वा कार्यत: विशिष्ट स्थानांतील व कार्यातील पित्ताचें कर्म लक्षांत घेऊन त्यासच तेवढयापुरतें अग्नि नांव दिलेलें आहे आणि मग जेथें पचन व्यापाराचा उल्लेख आला तेथें बहुधा अग्नीचा पित्त निरपेक्ष उल्लेख, अग्नीचें पित्तापेक्षां वेगळेपण सिद्ध करण्याकरितां नसून, पित्ताचें विशेषकर्म जें पचन तिकडे वाचकांचें लक्ष वेधावें एवढयाच हेतूनें असतो. सुश्रुतानें अत्यंत स्पष्ट शब्दांत पित्त हेंच अग्नि आहे असें सांगितलें आहे.
तत्र जिज्ञास्यं किं पित्तव्यतिरेकादन्योऽग्नि: ? आहोस्वित्
पित्तमेवाग्निरिति ? `अत्रोच्यते न खलु पित्तव्यतिरेकादन्योऽ
ग्निरुपलभ्यते, आग्नेयत्वात् पित्ते दहनपचनादिष्वभिप्रवर्त-
मानेऽग्निवदुपचार: क्रियतेऽन्तरग्निरिति; क्षीणे ह्याग्निगुणे
तत्समानद्रव्योपयोगात्, अतिवृद्धे शीतक्रियोपयोगात्, आग-
माच्च पश्यामो न खलु पित्तव्यतिरेकादन्योऽग्निरिति ।
सु.सू. २१-९ पान १००
परंतु सुश्रुताच्या स्पष्टार्थ बोधक वचनावर टीका लिहितांना डल्हणानें उगीचच एक वाद उपस्थित केला आहे असें वाटतें. ग्रंथांत कोठेंतरी पित्त व अग्नि यांचें एकाच ठिकाणीं एका वचनामध्यें एकत्र आलेले उल्लेख उदधृत करुन तो म्हणतो; ज्याअर्थी पित्त आणि अग्नि असे दोन शब्द एकत्र आले आहेत त्याअर्थी दोन्ही एकमेकापेक्षां वेगळे असले पाहिजेत. परमार्थत: त्यांचें वेगळेपण निश्चित आही. केवळ चिकित्सादृश्यानें दोघांचें एकत्व वरील वचनांनीं सांगितलें आहे. डल्हणाची ही टीका आम्हाला अयोग्य वाटते. सुश्रुताची पित्तालाच अग्नि म्हणण्याची पद्धती स्पष्ट आहे. पित्ताच्या प्रकारांना तो पाचकपित्त रंजकपित्त असें न म्हणतां पाचकाग्नि, रंजकाग्नि असें म्हणतो. भौतिक उत्पत्तीच्या दृष्टीनेंही अग्निपासूनच पित्ताची उत्पत्ति आहे. अर्थात् पित्त आणि अग्नि यांचें एकत्र उल्लेख भिन्नत्व बोधक नसून ब्राह्मण वशिष्ठ न्यायानें महत्व ख्यापक आहेत असेंच मानले पाहिजे. अष्टांगसंग्रहकाराने पित्त म्हणजेच अग्नि असें स्वत:चें मत सांगून पुढें दोष, धातुमल या सर्वांच्या संयोगांतून जन्मणारी विशेष स्वरुपाची जी अंतर उष्णता तीं म्हणजे `अग्नि' असें एकीय मत सांगितलें आहे. उष्णता म्हणजेच जर अग्नि मानावयाचा असेल तर उष्णता हा गुण असल्यामुळें तो कोणत्यातरी द्रव्याच्या आश्रयानेंच रहाणें अवश्य आहे. आणि तें द्रव्य पित्ताशिवाय दुसरें संभवत नाहीं. हाच पाचक अग्नि (किंवा पाचक पित्त) महास्त्रोतसांत राहून सर्व शरीरांतील पित्ताचें पोषण करतो. अग्नि हा वेगळा मानावयाचा आग्रहच असेल तर तो गुण रुप मानावा लागेल. द्रव्यरुप मानतां येणार नाहीं. पित्ताच्या तापानें, उष्म्यानें पचन झालें, पाक झाला. [पित्तोष्मोपरागात् शोणित्वमापद्यते । (शा.प्र. ६-१० टीका पान ७०) पाचिता: पित्ततापेन । शा.प्र. ६-११] अशी भाषा अनेक ठिकाणी वापरली जाते. गुण गुणी यांची भिन्न सत्ता नैय्यामिक मानतातच. सांख्य प्रकियेंत मात्र त्यांचा परमार्थत: अभेदच असतो हेंहि या प्रकरणीं लक्षांत ठेवावें. अग्नीचें हें स्वरुप लक्षांत घेऊन त्याचें मुख्य कर्म जें पचनव्यापार त्याचा विचार केला पाहिजे. जाठराग्नीची क्रिया आमाशय व पच्यमानाशय या ठिकाणीं होत असतांनाच जाठरग्नीच्याच आश्रयानें असणारेच पांच भूतांचे अग्नि आहारांतील आपापल्या गुणांचें पचन करुन शारीरभावामध्यें रुपांतरित होण्याची सुलभता आहाररसाला आणून ठेवतात. हा आहार-रस जसजसे संस्कार होत जातील तसतसा रस वाहिन्यांमध्यें समान वायूच्या प्रेरणेनें शोषला जातो. हें कार्य लघ्वंत्रामध्यें होते.
अव्यापन्ने त्वधिष्ठाते जाग्रत: स्वपतोऽपि वा ।
प्रेर्यमाण: समानेन प्रश्वासोच्छवासयोगत; ॥
धम्यमान उदानेन सम्यक पचति पाचक: ।
का.सं. पान ३६६
निरोगी स्थितींत जागेपणी वा झोंपेत पचनाचा व्यापार श्वासोच्छ्वासाप्रमाणें सतत चालूं असतो. श्वासोच्छ्वासाला कारण असणार्या प्राणोदानाच्या प्रेरणेनेंच समानवायू अग्नीच्या संधुक्षणाचें कार्य करतो आणि हा संधुक्षित अग्नि अन्नाचे चांगल्या रीतीनें पचन करीत रहातो. आहार-रस ग्रहणाच्या या विशेषस्वरुपाच्या ग्रहण-क्रियेमुळेंच लघ्वंत्रालाच `ग्रहणी' अशी कार्यवाचक विशेष संज्ञा प्राप्त झाली आहे. पचन संस्कार विशेषत: याच ठिकाणीं होत असल्यामुळें लघ्वंत्रालाच पच्यमानाशय असेंहि म्हणतात. अन्नापासून आहाररस तयार झाला म्हणजे स्थूल स्वरुपांत पचन झाले. या आहार - रसावर पाचक-अग्नीचेंच अंश असलेल्या धात्वाग्नीचे संस्कार होतात आणि पोषक अशा आहाररसापासून पोष्य स्वरुपाचे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि मज्जा, शुक्र असे धारणगुण - प्रधान सप्तधातू उत्पन्न होतात. या धातूंची उत्पत्ती होत असतांनाच शरीराच्या व्यापाराच्या दृष्टीनें नियंत्रणाचें असाधारण सामर्थ्य असलेले दोष उत्पन्न होतात. सर्वात क्रियाशील व बलवान, असा वायू स्थूल स्वरुपाच्या पचनाचे वेळींच महास्त्रोतसांत उत्पन्न झालेला असतो. पुढें आहाररसापासून पोष्य अशा रसधातूची निर्मिती होते. त्यावेळीं `कफ' हा दोष किट्ट रुपानें उत्पन्न होतो. पुढें आहाररसावर रक्तधात्वग्नीचा संस्कार होतो. त्यावेळीं रक्त-धातू उत्पन्न होत असतानांच किट्टभागापासून पित्त दोषाची उत्पत्ती होते. नंतर क्रमाक्रमानें पुढच्या पुढच्या धात्वग्नींचे संस्कार आहाररसावर होत राहातात आणि मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे धातु उत्पन्न होतात. रसापासूनच उपधातू म्हणून स्तन्य, रसरक्तापासून उपधातू म्हणून रज, रक्तमांसापासून कंडरा सिरा, मांस भेदापासून - त्वचा स्नायू, अशा उपधातूंची उत्पत्ती होते. यांतहि कांहीं भाग धातूमध्यें परिणत न होणारा असा किट्ट स्वरुप राहातोच. त्यांतूनच मांसाचा मल म्हणून नेत्र कर्णांतील मल, मेदाचा मल म्हणून स्वेद, अस्थिचा मल म्हणून केस, नख, मज्जेचा मल - म्हणून त्वचानेत्राची स्निग्धता उत्पन्न होते. शुक्र हे शुद्धप्रसाद रुप आहे. कांहीं ठिकाणीं केवळ उपचारानें ओजाला शुक्राचा मल असें म्हटलें आहे. (च.वि.१५).
आहाररसाची धातूमध्यें ही होणारी परिणती सुश्रुताच्या मताप्रमाणे' शब्दार्चिजलसंतानवत् असते. संतान या शब्दाचा अर्थ सातत्य असा असून शब्दाप्रमाणें सर्व गामी ज्योतीप्रमाणें ऊर्ध्वगामी व जलाप्रमाणें अधोगामी स्वरुपांत आहार रसाचा संचार होतो व धातूंची उत्पत्ती होते (सु.सू.१४-१६) असे सुचविण्यांत आले आहे. शब्द अर्चि जल यांच्या वहनकालाच्या दृष्टीनें मध्य तीक्ष्ण व मंद असा आहार परिणाम काल सांगितला आहे असें कांही टीकाकार म्हणतात (सु-सू-१४-१६-) चक्रदत्तानें चरकाच्या-आहार-पचन सूत्रांवरील आपल्या टीकेंत रस परिणामासंबंधीं तीन प्रकारचे न्याय उल्लेखिले आहेत. यांतील कोणता न्याय अधिक चांगला यासंबंधी भरपूर चर्चाहि केलेली आहे. आमच्या मतें पचन व्यापाराची संपूर्ण कल्पना येण्याच्या दृष्टीनें केदार कूल्यान्याय, खले कपोत न्याय' आणि क्षीर दधि न्याय हे तीनहि न्याय अवश्यक मानले पाहिजेत. आहार रसाचें अभिवहन केदार कूल्या न्यायानें होतें आणि एका आळ्यांतून दुसर्या आळ्यांत जाणार्या जलप्रमाणें एका धातूंतून दुसर्या धातूकडे आहाररस वाहिन्यातून वाहात जातो. अर्थात् पुढील धातूकडे जाण्यापूर्वी मागील धातूच्या अग्नीचा संस्कार त्यावर झालेला असतोच. भौतिकाग्नी जसे आपापल्या अंशाचेंच पचन करतात त्याप्रमाणें आहाररसांतून सर्व धातूंच्या पोषणाला आवश्यक असे भाव वाहत असतांना धात्वग्नी हे त्यांतील आपापले भाव निवडून त्यावर संस्कार करतात आणि त्यामुळें त्या त्या धातूंची उत्पती होते. निवड करण्याचे हें वैषिष्टय स्पष्ट होण्यासाठीं खले कपोतन्यायाचा अवलंब केला जातो. निरनिराळ्या ठिकाणीं जवळ वा दूर राहाणार्या कपोतांनीं (कबुतरांनीं) एकाच खळ्यांतून आपापला वांटा उचलावा त्याप्रमाणें धात्वग्नीं आपापला वांटा उचलावा त्याप्रमाणें धात्वग्नी आपापला वांटा आहारसांतून घेतात. असे हा न्याय सूचवितो. घेतलेल्या या अंशाचें परिणमन त्या त्या धातूंमध्यें व्हावयाचें असतें. या परिणमन क्रियेच्या स्पष्टीकरणासाठीं `क्षीर दधि न्याय' हा उपयोजिला आहे. रस-गुण-स्वरुप-दृष्टया अगदीं भिन्न रुप असलेल्या दुधाचें जसें दहीं बनतें त्याप्रमाणें तांदूळ, गहूं, डाळी यासारख्या अन्नाचे अग्निसंस्कारानें सप्त धातू बनतात. या परिणमनाला उत्पत्तीच्या दृष्टीनें कांहीं काल नियम हा असलाच पाहिजे. चक्राच्या फेर्याप्रमाणें एकानंतर दुसरें दुसर्यानंतर तिसरें, असें अखंड परिणमन जरी चालूं असलें आणि रोज नवीन आहाररस उत्पन्न होत असल्यामुळें परिणमाच्या सर्व अवस्था निरनिराळ्या स्थलीं शरीरामध्यें एकाच वेळीं होत असल्या तरी एका दिवशीं घेतलेल्या आहारापासून उत्पन्न होणार्हा धातूंच्यामध्यें कांही कालानुक्रम असतोच. रसापासून एकेक दिवसाच्या अंतरानें धातू उत्पन्न होत होत सहाव्या दिवशीं शुक्र बनतें असें एक मत आणि तिसाव्या दिवशीं शुक्र बनते असें दुसरें मत. नेमका काल सांगणें कठीण असलें तरी दुसरें मत अधिक ग्राह्य वाटतें. रसक्षय व्रणरोपण, व्रणांत दिसणारी मांसाकुरोत्पत्ती आस्थिभंग या परिस्थितींत धातुत्पत्तींची ही नियतकालिकता विचारांत घ्यावी लागते. आयुर्वेदांतली पचन व्यापारसंबंधीची ही मार्मिक वर्णनें लक्षांत घेतली म्हणजे अग्निमांद्याचे स्वरुप सर्व शरीरावर परिणाम करण्याइतके गंभीर व पीडाकर कसे होते तें लक्षांत येईल.
अग्निमांद्याचीं कारणें
अभोजनादजीर्णाति भोजनाद्विषमाशनात् ।
असात्म्यगुरुशीतातिरुक्षसंदुष्टभोजनात् ॥
विरेकवमनस्नेह विभ्रमाद्व्याधिकर्षणात् ॥
देशकालर्तुवैषम्याद्वेगानां च विधारणात् ॥
दुष्यत्यग्नि:, स दुष्टोऽन्नं न तत् पचति लघ्वपि ।
अपच्यमानं शुक्तत्वं यात्यन्नं विषरुपताम् ॥
च.चि. १५-४२ ते ४४ पान ११९३
मुळींच न जेवणें, अति प्रमाणांत जेवणें, विषमाशन करणें, असात्म्य (संवयीचे नसलेले) गुरु, अति शीत, अति रुक्ष दुष्ट (शिळें, नासलेले किंवा विषयुक्त) असें अन्न खाणें, पंचकर्मोपचारांचा मिथ्यायोग होणें, निरनिराळ्या व्याधींनीं क्षीण होणें, देश, काल, ऋतू यांचें वैषम्य होणें, वेग-विधारण करणें, चिंता शोक भयादि मानसिक व्यथा असणें यामुळें अग्नि दुष्ट होतो.
प्रकार
तत्र तीक्ष्णोऽग्नि: सर्वापचारसह:, तद्विपरीतलक्षणस्तु मन्द:
समस्तु खल्वपचारतो विकृतिमापद्यतेऽनपचारतस्तु प्रकृता-
ववतिष्ठते समलक्षणविपरीतलक्षणस्तु विषम इति ।
एते चतुर्विधा भवन्त्यग्नयश्चतुर्विधानामेव पुरुषाणाम् ।
तत्र समवातपित्तश्लेष्मणां प्रकृतिस्थानां समा भवन्त्यग्नय:,
वातलानां तु वाताभिभूतेऽग्न्यधिष्ठाने विषमाभवन्त्यग्नय:,
पित्तलानां तु पित्ताभिभूते ह्यग्न्यधिष्ठाने तीक्ष्णा भवन्त्त्यग्नय:,
श्लेष्मलानां तु श्लेष्माभिभूतेऽग्न्यधिष्ठाने मन्दा भवन्त्यग्नय: ॥
च.वि. ६-१२ १३ पान ५३६
मन्दस्तीक्ष्णोऽथ विषम: समश्चेति चतुर्विध: ।
कफपित्तनिलाधिक्यात्तत्साम्याज्जाठरोऽनल: ॥
मा.नि. अग्निमांद्य १ पान ९९
कफामुळें मंदाग्नि, पित्तामुळें, तीक्ष्णाग्नि, आणि वातामुळें विषमाग्नि असे अग्निमांद्याचे दोषदृष्टया तीन प्रकार आहेत तीनहि दोषांच्या साम्यावस्थेंमुळें सम असणें हा अग्निचा स्वभाव होय. ती प्रकृति आहे. त्यामुळें अग्निचे जरी प्रकार चार असले तरी अग्निमांद्याचे प्रकार तीनच आहेत. अग्नीचे प्रकार प्रकृतिभेदानेहि संभवतात.
व्याख्या
अग्नीचें पचनसामर्थ्य विकृत धातूंचें पोषण नीट होत नाहीं, धातु पोषणाची क्रिया मंदावल्यामुळें या व्याधीस अग्निमांध्य असें म्हणतात.
स्वभाव
चिरकारी, भिषग् मोहकर,
मार्ग
अभ्यंतर
संप्राप्रि
आहारविहारहारादि कारणांनीं दोष प्रकुपित होऊन अग्नीला विगुण करतात. दोषांनाहि विगुण करणारा अग्नि असतो. (ते च प्रायशो दुष्यंति अग्निदोषात् ।
अ.सं.शा. ६ पान ३३२
इतर रोगांना उत्पन्न करणारे दोष जरी अग्निवैगुण्यामुळें उत्पन्न होत असले तरी अग्नि अग्निमांद्य हें मूलत: दोषामुळेंच उत्पन्न होतें. दोष दुष्टी व अग्नि वैगुण्य यांचा संबंध ``बीज वृक्ष'' न्यायानें असल्याचें आम्ही मागें सांगितलेंच आहे.
रुपें
विषमो वातजान् रोगान् तीक्ष्ण: पित्तनमित्तजान् ।
करोत्यग्निस्तथा मन्दो विकारान् कफसंभवान् ॥
समा समाग्नेरशिता मात्रा सम्यग्विपच्यते ।
स्वल्पाऽपि नैव मन्दाग्नेर्विषमाग्नेस्तु देहिन: ।
कदाचित्पच्यते सम्यक्कदाचिन्न विपच्यते ।
तीक्ष्णाग्निरिति तं विद्यात्समाग्नि: श्रेष्ठ उच्यते ।
मात्राऽतिमात्राऽप्यशिता सुखं यस्य विपच्यते ॥
प्रतिलोमतन्त्रयुक्त्या तेषां रुपमाह - विषम इत्यादि ।
वातजान् रोगानिति वातजनानात्मजानामशीतेरन्यतमान्,
सामान्यजांश्च ज्वरातीसारादीन्, एवं पित्तनानात्मजानामोष
चोषादीनां चत्वारिंशतोऽन्यतमान्, एवं कफनानात्मजानां
विंशतेरालस्यादीनामन्यतमान् । एते च विकारश्चरके
महारोगाध्याय (च.सू.स्था.अ.२०)
एव द्रष्टव्या: । समेत्यादि । समा उचिता, मात्रा आहारस्य
सम्यग्यस्य विपच्यते स समाग्नि: ।
तीक्ष्णाग्निरिति तं विद्यादिति छेद; । मात्राऽतिमात्रेत्युप-
लक्षणं, तेनाजीर्णगुरुभोजनादिकमपि लक्षणीयम् ।
तदुक्तमन्यत्र-``अतिमात्रमजीर्णेऽपि गुरु चान्नमथाश्नत: ।
दिवाऽ पि स्वपतो यस्य पच्यतेसोऽग्निरुत्तम:'' इति ।
तीक्ष्णग्रहणेन भस्मकस्यावरोध:; अत्यन्ततीक्ष्णाग्निरेव
भस्मक इत्युच्यते ।
यदुक्तं चरके, ``नरे क्षीणकफे पित्तं कुपितं मारुतानुगम् ।
स्वोष्मणा पावकस्थाने बलमग्ने: प्रयच्छति । तदा लब्ध-
बलो देहं विरुजेत् सानिलोऽनल: । अभिभूय पचत्यन्नं तैक्ष्ण्या-
दाशु मुहुर्मुहु: ॥
पक्त्वान्नं स ततो धातून् शोणितादीन् पचत्यपि ।
ततो दौर्बल्यमातड्कान् मृत्युं चोपानयेन्नरम् ॥
भुक्तेऽन्ने लभते शान्ति जीर्णमात्रे प्रताम्यति ।
तृट्कासदाहमूर्च्छा: स्युर्व्याधयोऽत्यग्निसंभवा: ।
(च.चि.स्था.अ.१५)'' इति ।
मा.नि.अग्निमांद्य २ ते ४ पान १०० म.टीकेसह
थोंडेहि अन्न खाल्लें असतां तें न पचणें हें मंदाग्निचें वा कफज अग्निमांद्याचें लक्षण असून यांतूनच पुढें निरनिराळे कफजविकार उत्पन्न होतात. अन्न केव्हां तरी पचणें, केव्हां तरी न पचणें हें विषमाग्निचे वा वातज अग्निमांद्याचें स्वरुप असून यामुळें निरनिराळे वातज विकार उत्पन्न होतात. कितीहि प्रमाणांत अन्न खाल्लें असतां तें पचून भस्म होणें वा विदाह होणें हें तीक्ष्णाग्निचें स्वरुप आहे. यांसच पित्तज अग्निमांद्य असें म्हणावें. तीक्ष्णाग्नि व पित्तज अग्निमांद्य यामध्यें भेद करणेंहि व्यवहारदृष्टया उचित होईल. निरनिराळें पित्तविकार या अवस्थेमध्यें उत्पन्न होतात. तीक्ष्णाग्नि ही विकृती कां मानावी अशी एक शंका येणें शक्य आहे. चरकानें तीनहि दोषांच्या अग्निचा परिणाम कसा होतो हें सांगतांना पुढील सूत्र लिहिलेलें आहे.
विषमो धातुवैषम्यं करोति विषमं पचन् ।
तीक्ष्णो मन्देन्धनो धातून् विशोषयति पावक: ॥
च.चि. १५-५० पान ११९४
विषम अग्नि विषम पचनामुळें धातु वैषम्यास कारणीभूत होतो. तीक्ष्ण अग्नि हा नेहमींच प्रदीप्त होत असल्यामुळें (त्याच्या पचन सामर्थ्याला पुरेशी टिकून राहील अशी आहार मात्रा मिळत राहणें दुर्घट असल्यामुळें) तो धातूंचे विशोषणच करतो. मनुष्याचें अन्न घेण्याचें प्रमाण कोणत्याहि स्थितींत एक विशिष्ट मर्यादा ओलांडू शकत नाहीं. अग्निच्या तीक्ष्णतेमुळेंहि निरुपायानें मर्यादित होणारी मात्रा कमी पडते आणि धातुक्षयामध्यें तिची परिणती होते. अग्निच्या चार प्रकारांपैकी समाग्नि हा श्रेष्ठ आहे. चरकानें अग्निमांद्याचा परिणाम अन्नविषामध्यें होतो असें सांगून त्यामुळें उत्पन्न होणार्या विकारांचें वर्णन केलें आहे.
धोरमन्नविषं च तत् ॥
संसृज्यमानं पित्तेन दाहं तृष्णां मुखामयान् ।
जनयत्यम्लपित्तं च पित्तजांश्चापरान् गदान् ॥
यक्ष्मपीनसमेहादीन् कफजात्न् कफसड्गतम् ।
करोति वातसंसृष्टं वातजांश्च गदान् बहून् ॥
मूत्ररोगांश्च मूत्रस्थं कुक्षिरोगान् शकृद्गतम् ।
रसादिभिश्च संसृष्ट कूर्याद्रोगान् रसादिजान् ॥
च.चि. १५-४६ ते ४९ पान १९९३
`रोगासर्वेऽपि मंदेऽऽग्नौ' या नियमाप्रमाणें अग्निमांद्य हें सर्व रोगांना कारणीभूत होत असले तरी त्याची स्वत:ची म्हणून कांहीं विशिष्ट लक्षणें असतातच. निरनिराळ्या रोगांच्यामध्यें अग्निमांद्याचीं प्रवृत्ती स्वभावत:च होत असल्यानें ग्रंथांतरी मात्र अग्निमांद्याचें स्वतंत्र लक्षणांनीं युक्त असे वर्णन केलेलें आढळत नाहीं. विशिष्ट रोगोत्पत्ती स्पष्टपणें झालेलीं नाहीं पण अग्निमांद्य मात्र आहे अशी स्थिती पुष्कळ वेळां असते. या स्थितींत पुढील लक्षणें दिसतात. भूक न लागणें, उदरगौरव, आलस्य, अरति (अल्प प्रमाणांत), उदरांत वातसंचय, किंचित् करपट ढेकर येणें, वातदुर्गंधी शिथिल अशीं मल प्रवृत्ति, अल्पनिद्रा, स्वभावांत चिडचिडेपणा, मुखदुर्गंधी, अशीं लक्षणे आढळतात. यांतील कांही लक्षणें अजीर्ण या व्याधींत समाविष्ट होणारी आहेत हें खरें. परंतु अजीर्ण हा व्याधी आशुकारी, विशिष्ट कारणांनीं घडलेला आणि थोडया काळांतल्या लंघनादि उपचारांनीं बरा होणारा असतो. वरील लक्षणें मात्र मधून मधून अस्पष्ट प्रमाणांत पण सतत (आलटून पालटून) पीडाकर होत रहाणें, हें अग्निमांद्याचें द्योतक आहे. अजीर्णाचीं बहुतेक सर्व लक्षणें अपक्व अन्नाच्या प्रभूतेमुळें बहुधा महास्त्रोतसाच्या आश्रयानें प्रकट होतात. अग्निमांद्यांवस्थेंत मात्र अजीर्णाच्या मानानें उत्पन्न झालेल्या आम द्रव्यांचें स्वरुप सौम्य असतें. शरीरांतील, इतर व्यापार कार्यक्षम असल्यानें नेंहमीप्रमाणें आहाररसाच्या शोषणांत अद्यापि व्यत्यय आलेला नसतो. त्यामुळें उत्तम रीतीनें न पचलेल्या अशुद्ध स्थितींतील आहाररसाचेंहि शोषण होत रहाते. प्रकुपित झालेले दोष या बरोबर असतातच म्हणूनच त्यांना साम दोष ही संज्ञा प्राप्त होते. रसवहस्त्रोतसांतून त्याचा सर्व शरीरभर संचार होतो व अनेक विकारें उत्पन्न होतात. चरकानें अग्निमांद्याला ग्रहणी रोग म्हणावें असें सुचविलें आहे.
यश्चाग्नि: पूर्वमुद्दिष्टो रोगानीके चतुर्विध: ।
तं चापि ग्रहणीदोषं समवर्ज प्रचक्ष्महे ॥७१॥
च.चि. १५-७१ पान १९१६
एका दृष्टीनें तें योग्य वाटतें. कारण अग्निमांद्य व ग्रहणी यामध्यें कित्येक वेळां व्यवच्छेद करणें फार कठिण जातें. अग्निमांद्य व ग्रहणी हे रोग हे जणूं एकमेकाच्या पूर्वोत्तरावस्थेसारखे असतात वाग्भटाच्या टीकाकारानें या अग्नीच्या तीन प्रकारांनाच ग्रहणीरोगाभास असें म्हटलें आहे. ( वा.नि. ८-२९ टीका) आमच्या मतें ग्रहणीच्या केवल कार्याची विकृति दिसत असेल तेव्हां अग्निमांद्य म्हणावें आणि अवयवविकृतीची लक्षणें दिसावयास लागली तर ग्रहणी रोग म्हणावें.
उपद्रव व उदर्क
अनेक प्रकारचे व्याधी अग्निमाद्यांचे उपद्रव म्हणून होतात.
साध्यासाध्य विवेक
व्याधी कष्टसाध्य आहे.
चिकित्सा सूत्रें
प्रथम संपूर्ण लंघन करावें. नंतर द्रव आहार घ्यावा. मग पंचोकर्मोपचारानें दोषांचें शोधन करावें. नंतर अग्नीच्या संधुक्षणासाठीं प्रथम तिक्त, मग कटु, नंतर अम्ल व मधुर अशा द्रव्यांनी सिद्ध केलेलें घृत सेवन करावें. आहार लघु, अल्प द्रव असा असावा. गुरु, अभिष्यंदी, विदाही पदार्थ वर्ज्य करावें. पुढें योग्य प्रमाणांत व्यायाम घ्यावा.
कल्प
त्रिकटु, गुडूचि, कुचला, ताम्र, अभ्रक, आरोग्यवर्धिनी, अग्नितुंडी, कुमारी आसव, द्राक्षासव, पंचकोलासव.
अपथ्य
अजीर्ण अध्यशन विषमाशन