रुक् पार्श्वोदरहृन्नाभेस्तृष्णोद्गारविसूचिका: ।
कास: कण्ठास्यशोषश्च श्वासश्चामाशयस्थिते ॥
मा.नि. वातव्याधि १३ पान १९६
वात प्रकोप होऊन त्यानें आमाशयाचा आश्रय केला असतां पार्श्व, हृदय उदर, नाभी याठिकाणीं वेदना होतात. तहान लागते, ढेकरा येतात, विषूचिकेप्रमाणें दोष ऊर्ध्व वा अधोमार्गानें बाहेर येतात. कास, कंठशोष, मुखशोष, श्वास हीं लक्षणें असतात. आमाजीर्ण विसूचिका वा अलसक याप्रमाणें चिकित्सा करावी. प्राचीन संहिताग्रंथकारानें वा माधवासारख्या विषय-विभाग-दृष्टया संग्रह करणार्या ग्रंथकारानें निरनिराळ्या प्रकरणांत समाविष्ट केलेल व्याधी, त्यांचें स्थानसंश्रय लक्षांत घेऊन आम्ही याठिकाणीं अन्नवहस्त्रोतसांतील प्रकरणांत समाविष्ट केले आहेत. मूळचीं प्रकरणें तोडून व्याधीचें पुन्हां नवीन वर्गीकरण करण्यांत थोडीशी अडचण झाली असली आणि स्थूलदृष्टया आगम विपरीत रचना करावी लागत असली तरी, विषय संकलितपणें दृष्टीसमोर उभा रहाण्याकरितां ही मांडणी आम्हांस अत्यंत सोयीची वाटत आहे. वेग निग्रहामुळें उत्पन्न होणारा उदावर्त, मिथ्याहारामुळें उत्पन्न होणारा उदावर्त, आनाहाच्या प्रकारांपकीं एक आमानाह, आध्मान, प्रत्याध्मान, कोष्ठ गतवात, आमाशय गत वात व मागें उल्लेखिलेले शूल यामध्यें केवळ लक्षणांच्याच्य दृष्टीनें पाहिलें तर फारच थोडें अंतर आहे. माधवाच्या टीकाकारानें एके ठिकाणीं ``भवति ही धर्मातरयोगात् कस्यचित् विकारस्य रोगान्तरत्वम् ।'' (मा.नि. वातव्याधी ५७ म. टीका) कांही थोडया लक्षण भेदामुळें वा संप्राप्ती भेदामुळें सारख्याच विकारांना वेगवेगळे रोग मानले जातें असें म्हटलें आहे. व्यवहाराच्या सोईच्या दृष्टीनें त्याचें हें विधान स्वीकार्य मानलें पाहिजे. कारण मूळांत रोगभेद जे केले गेले ते याच दृष्टीकोनांतून केले गेले आहेत. कारणभेद, स्थानभेद, गतिभेद स्वरुपभेद या सर्वामुळें रोगांना विविध नांवें प्राप्त होतात. त्या दृष्टीनें वर वर पहातांना सारखेपणा भासला तरी या व्याधींच्यामध्यें क्वचित् लक्षण सादृश्य असलें तरी संप्राप्ती दृष्टया विचार करतां कांहीं वेगळेपणा आहे असें मानावें लागतें. वातव्याधीच्या प्रकरणांत समाविष्ट केलेले कोष्ठगत वात, आमाशय गत वात, आध्मान, प्रत्याध्मान, यामध्यें स्थान दुष्टी प्रकर्षानें असते आणि तिच्या व्यापकतेंतील कमी अधिकपणानें व लक्षणानें व्याधिभेद उत्पन्न होतो. आमच्या मतानें कोष्ठगतवात हें आध्मान या व्याधींचें कारण आहे किंवा आध्मान हा व्याधी कोष्ठगतवात या विकाराची पुढची अधिक परिणत (अवयव दुष्टी दृष्टया) अशी अवस्था असून अत्यंत तीव्र वेदना हें त्यांचें व्यक्त स्वरुप आहे. कोष्ठगत वातामध्यें जी इतर लक्षणें वा उपद्रव सांगितले आहेत ते वायूच्या वा शूलाच्या संचाराचें कार्यक्षेत्र दाखवतात. आमाशयगत वात व प्रत्याध्मान यांचा संबंधहि असाच मानावा. त्याचप्रमाणें उदावर्ताचेच आनाह हें एक चिरकारी स्वरुप आहे. वातव्याधिप्रकरणांत ज्या व्याधींचा समावेश आहे अशा कोष्ठमाशयगतवात व आध्मान या व्याधींत स्थानाला प्राप्त झालेली दुष्टी जशी महत्त्वाची त्याप्रमाणें उदावर्त व्याधींत स्थान दुष्टीच्या अपेक्षेनें प्रकुपित वायूची प्रतिलोम गतीं अधिक महत्त्वाची त्याप्रमाणें उदावर्त व्याधींत स्थानदुष्टीच्या अपेक्षेनें लक्षणें उत्कट असतात कोष्ठगत वातात परिस्थिति नेमकी या उलट असते. त्यामुळें स्थानाला बल देणें व दोषांचें अनुलोमन करणें या दोन चिकित्सेंतील उपचारांचें वैशिष्टय या व्याधींत लक्षांत ठेविलें पाहिजे. दोष आणि स्थान सामान्यत: एकच असल्यामुळें या शूलादि सर्व व्याधींना परस्परांचे उपद्रव हें स्वरुप केव्हांहि प्राप्त होऊं शकतें. कोष्ठगत वात व उदावर्त या व्याधीमध्यें आलेल्या कोष्ठ शब्दाचा अर्थ आम्ही `अन्नवहस्त्रोतस्' त्यांतहि विशेषत: ग्रहणी एवढाच केलेला आहे. (टीकाकाराचा यास आथार आहे). `कोष्ठ' या शब्दाचा `ग्रहणी' हा अर्थ ग्रंथांतरी मान्य आहेच.