अन्नवहस्त्रोतस् - शूल

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


आमाशये रुजं कुरुत इति योज्यम् ।
स्तिमितकोष्ठमिति बद्धकोष्ठता, सूर्योदये प्रात:, पुष्पागमे वसन्ते,
एतेषु कालेष्वति विशेषेण कुप्यति ।
मा. नि. शूल ९,१० आ. टीकेसह पान २२३-२४

शुलेनोत्पीड्‍यमानस्य हृल्लास उपजायते ।
अतीव पूर्णकोष्ठत्वं तथैव गुरुगात्रता ॥
एतच्ल्छेष्मसमुत्थस्य शुलस्योक्तं निदर्शनम् ।
सु. उ. ४२-८५, ८६ पान ७२३

आनूप वा जलज मांस, खरवस, ताकाची निवळ, दुधाचे निरनिराळे पदार्थ (पेढे, बर्फी, खवा, बासुंदी) ग्राम्य प्राण्यांचे मांस, साखर, गूळ, काकवी, वा त्यांनीं बनविलेली पक्वान्नें, पिठूळ पदार्थ, खिचडी, तीळ, करंज्या या सारखीं कफवर्धक, स्निग्ध, अभिष्यंदी द्रव्यें या कारणांनीं कफ प्रकुपित होऊन वातानुग होऊन शूल उत्पन्न करतो. कफज शूलामध्यें मळमळणें, तोंडाला पाणी सुटणें, अरुचि, अंग गळून जाणें, आमाशयामध्यें अन्न गच्च बसल्या सारखें वाटणें, पोटांत जडपणा वाटणें, शरीर जड वाटणें, डोकें जड झाल्यासारखें वाटणें. वेदना फारशा तीव्र नसणें जेवल्यानंतर लगेच शूल वाढणें अशीं लक्षणें असतात. हा शूल सकाळीं थंडीचे दिवसांत किंवा वसंत ऋतूंत वाढतो.

सान्निपातिक शूल
सर्वेषु दोषेषु च सर्वलिड्गं विद्याद्भिषक सर्वभवं हि शूलम् ।
सकष्टमेनं विषवज्रकल्पं विवर्जनीयं प्रवदान्ते तज्ज्ञा: ॥
सान्निपातिकमाह - सर्वेष्वित्यादि । त्रिदोषाणां मिलितैर्लक्षणै-
स्त्रिदोषजं जानीयात् । सुकृष्टं असाध्यम् विषवज्रतुल्यं
मारणात्मकत्वात् ।
सटिक मा.नि. शुल ११ पान २३४

सर्वाणि दृष्टवा रुपाणि निर्दिशेत्सान्निपातिकम् ।
सान्निपातसम्तुत्थानमसाध्यं तं विनिर्दिशेत् ॥
शूलानां लक्षणं प्रोक्तं ।
सन्निपातिकशूललक्षणमाह - सर्वाणीत्यादि ।
ननु, कैश्चित् पूर्वाचार्यैर्दोषभेदेन नियतं स्थानं
शूलस्योक्तम् ।
तथाहि, ``वातात्मकं बस्तिगतं वदन्ति, पित्तातिकं
चापि वदन्ति नाभ्याम् ।
हृत्पार्श्वकुक्षौ कफसन्निविष्टं, सर्वेषु देशेषु च सन्निपातात्-''
इति । तत् कथमत्र तथा नोक्तम् । सत्यं कुपितदोषाणां
स्वाशये पराशये च व्याध्युत्पादकत्वान्न नियतं
स्थानमस्ति, अतस्तथा नोक्तम् ।
सटिक सु. उ. ४२-८७ पान ७२३

सान्निपातिक शूलामध्यें सर्व दोषांची लक्षणें दिसतात. तीव्र शूल, ज्वर, अरति, मूर्च्छा, अन्नद्वेष, अंगसाद हीं लक्षणें विशेष असतात. व्याधी मरणप्राय आहे म्हणून त्यास `विष वज्र कल्प' असें नांव दिलेलें आहे. कांहीं ग्रंथकार शूलाची विशेष विशेष स्थानें सांगतात. वायूचा शूल बस्ति प्रदेशीं विशेष होतो. पित्ताच शूल विशेषत: हृद्‍, पार्श्व, कुक्षी या प्रदेशामध्यें पीडा उत्पन्न करतो. सन्निपाताचा शूल सर्व ठिकाणीं पीडाकर होतो. सुश्रुताच्या टीकाकारानें दोष हे स्वत:च्या व इतरांच्या स्थानांतहि व्याधी उत्पन्न करुं शकत असल्यानें तदुत्पन्न व्याधीचें निश्चित स्थान सांगणें हें शक्य नाहीं. यासाठीं सुश्रुतानें अशा स्वरुपानें स्थान निर्देश केले नाहींत; असें म्हटले आहे. डल्हणाचें हें मत विचार करण्यासारखें आहे. आमाशय हें शूलाचें मुख्यत: अधिष्ठान असल्यानें, वातज शूल बस्तिगत असतो हें म्हणण्यांत विशेष स्वारस्य नाहीं. बस्ति प्रदेश हा वायूचा संचय प्रकोपाचें क्षेत्र असला तरी, शूल या व्याधीचें अधिष्ठान तेथें नसतें. सामान्यसंप्राप्तींतील वात या दोषामुळें शूलाचा स्वभाव संचारी असतो त्यामुळें आमाशयगत शूलासवेंच बस्ती भागींहि वेदना जाणवतात.

द्वंद्वज शूल
बस्तौ हृत्पार्श्वपृष्ठेषु स शूल कफवातिक: ।
कुक्षौ हृन्नाभिमध्येषु स शूल: कपपैत्तिक: ॥
दाहज्वरकरो घोरो विज्ञेयो वातपैत्तिक: ।
मा.नि.शूल १३ पान २२४

वातकफज शूल, हृदय, पार्श्व, पृष्ठ या ठिकाणीं विशेषें करुन होतो. वात पित्तज शूलामध्यें दाह आणि ज्वर हीं लक्षणें तीव्र स्वरुपांत असतात. व्याधी दारूण स्वभावाचा असतो. कफ पित्तज शूल, कुक्षी, हृदय आणि नाभी यांचा मध्य भाग या ठिकाणीं होतो. द्वंद्वज शूलामध्यें त्या त्या दोन दोषांच्या इतर लक्षणांचेहि अस्तित्व संभवतें.

आमज शूल
आटोपहृल्लासव मीगुरुत्वस्तैमित्यकानाहकफप्रसेकै: ।
कफस्य लिड्गेन समानलिड्गमामोद्भवं शूलमुदाहरन्ति ॥
मा.नि. शूल १२ पान २२४

आमज शूलामध्यें बहुतेक सर्व लक्षणें कफज शूलासारखीं असतात. विशेषत: पोटामध्यें गुडगुडणें, मळमळणें, छर्दी, जडपणा वाटणें, अन्न पोटामध्यें गच्च बसल्यासारखें वाटणें, पोटांत गुबारा धरणें, चिकट लाळ सुटणें अशीं लक्षणें असतात. आमज शूलामध्यें कफज शूलापेक्षां विशेष म्हणजे शूल हें लक्षण तीव्र स्वरुपाचें असतें.

परिणाम शूल
स्वैर्निदानै: प्रकुपितो वायु: संनिहितस्तदा ।
कफपित्ते समावृत्य शूलकारी भवेद्वली ॥
भुक्ते जीर्यति यच्छूलं तदेव परिणामजम् ।
तस्य लक्षणमप्येतत्समासेनाभिधीयते ॥
परिणामशूलमाह - स्वैरित्यादि । स्वै: कारणै: कुपितो
बलवान्वात: सन्निहितो निकटो यदा उभे कफपित्ते समा-
वृत्य व्याप्य तिष्ठेत्, तदा शूलकारी भवेत् । अस्य च
त्रिदोषजस्यापि नियतपरिणामकालसंबद्धत्वेन पितोल्बणत्वं
द्रष्टव्यम् । यदुक्तमन्यत्र - `बलास: प्रच्युत: स्थानात्पित्तेन
सह मूर्च्छित: वायुमादाय कुरुते शूलं जीर्यति भोजने ॥
कुक्षौ जठरपार्श्वेषु नाभ्यां बस्तौ स्तनान्तरे ।
पृष्ठमूलप्रदे शेषु सर्वेष्वेतेषु वा पुन: ॥
भुक्तमात्रेऽथवा वान्ते जीर्णे चान्ने प्रशाम्यति ।
षष्टिकव्रीहिशालीनामोदनेन विवर्धते ।
परिणामभवं शूलं दूर्विज्ञेयं महागदम् ।
तमाहू रसवाहानां स्त्रोतसां दुष्टिहेतुकम् ।
केचिदन्नद्रवं प्राहुरन्ये तत्पक्तिदोषजम् ।
पक्तिशूलं वदन्त्येके केचिदन्नविदाहजम्'' - इति ।
तस्य सामान्यलक्षणमाह - भुक्त इति ।
आहारे पच्यमाने ॥
मा.नि. शूल १५,१६ आ. टीकेसह पान २२५

अन्नाच्या परिणमन कालीं हा शूल वाढतो वा उत्पन्न होतो म्हणून याला परिणाम शूल असें म्हणतात. निरनिराळ्या मिथ्याहारविहारांनीं दोष प्रकोप पावतात. वायु हा कफपित्तासह मूर्च्छित होऊन शूल उत्पन्न करतो. तीन दोष प्रकुपित होत असले तरी त्यांत पित्ताचें प्राधान्य असतें. या शूलामध्यें कुक्षि, जठर, पार्श्व, पृष्ठ, नाभी, उर, बस्ती या ठिकाणीं वा यांतील कांहीं ठिकाणीं वेदना होतात. पित्त दुष्टीसवेंच रसहस्त्रोतसेंहि या व्याधींत दुष्ट होत असल्यानें रसाच्या सामानाधिष्ठानामुळें आणि पित्ताला आश्रयभूत असल्यामुळें रक्तहि दुष्ट होतें व रक्तदुष्टीचा परिणाम म्हणून वेदना अधिक तीव्र होतात. त्यांना चिरकारिता येते. व्रणोत्पत्तीहि आंत्रामध्यें होते. पित्तप्रकोपाच्या काळीं विशेषत: जेवण पचत असतांनाच्या काळीं हा शूल फार वाढतो. कांहीं खाल्लें वा प्यालें किंवा खाल्लेल्या अन्नाची उलटी झाली तर तेवढयापुरतें बरें वाटतें. पोट अगदीं रिकामें असतांना म्हणजे संपूर्ण अन्न पचून गेल्यानंतरहि, आरंभीं तरी, शूल नसतो, पुढें पुढें मात्र, शूल नसणें हा काल कमी कमी होत जातो. व्रीही सारख्या अम्लविपाकी पदार्थानें (भात) हा शूल वाढतो. ग्रंथांतरीं याच शूलाला `पक्तिशूल `अन्नद्रव शूल' असें नांव दिलें असलें तरी माधव निदानाच्या लक्षणाप्रमाणें अन्नद्रव शूल निराळा आहे. परिणाम शूलाला अन्नद्रव शूल हें नांव देतां येणार नाहीं. याचे पुन्हां दोष प्राधान्यारुप प्रकार केलेले आहेत.

आध्मानातोपविण्मूत्रविबन्धारतिवेपनै: ॥
स्निग्धोष्णोपशमप्रायं वातिकं तद्वदेद्‍भिषक् ।
तृष्णादाहारतिस्वेदं कट्वम्ललवणोत्तरम् ॥
शूलं शीतशमप्रायं पैत्तिकं लक्षयेद्‍बुध: ।
छर्दिहृल्लाससंमोहं स्वल्परुग्दीर्घसन्तति ॥
कटुतिक्तोपशान्तं च तच्च ज्ञेयं कफात्मकम् ।
संसृष्टलक्षणं बुघ्द्वा द्विदोषं परिकल्पयेत् ॥
त्रिदोषजमासाध्यं तु क्षीणमांसबलानलम् ।

वातिकमाह - आध्मानेत्यादि । आध्मानं ध्मातमिव वातेनोदर-
पूरणम् । आटोपो गुडगुडाशब्दवत् विण्मूत्रयोरप्रवृत्ति:,
अरति: सुखाभाव:, वेपनं कंप: । स्निग्धैरुष्णैश्च शान्तिं व्रजेत् ।
पैत्तिकमाहतृष्णेत्यादि । आहारे पच्यमाने ।
तृष्णादाहाऽरुचिस्वेदा यस्मिन् तत्तृष्णादाहारुचिस्वेदं, कट्वम्ल-
लवणोत्तरं कट्वम्ललवणैर्वृद्धम् शीतशमप्रायं शीतोपशयबहुलम् ।
श्लेष्मिकमाहछर्दीत्यादि । छर्दिहृल्लाससंमोहा यस्मिन्
तच्छर्दिहृल्लाससंमोहं स्वल्पा रुक् यस्मिन्, दीर्घसंतति
चिरानुबन्धि । कटुतिक्तै रसैरुपशममेति ।
द्विदोषजसान्निपातिकमाह - संसृष्टमित्यादि ।
क्षीणं मांसं बलं अनलो वह्निर्यत्र तत् क्षीणमांसबलानलम् ।
मा. नि. शूल १७ ते २० पान २२५ आ. टीकेसह

परिणामशूलामध्यें कफ प्राधान्य असतांना आध्मान आटोप, पुरीषमूत्रसंग, अरति, कंप, स्निग्धोष्ण उपचारानें बरें वाटणें अशीं लक्षणें असतात. पित्त प्रधान्य असतांना तृष्णा, दाह, अरति, स्वेद, कटू, अम्ल, लवण रसानें शूल वाढणें; शीतानें कमी होणे अशीं लक्षणें असतात. कफ़ प्रधान असताना शूलामध्यें छर्दी, हृल्लास, मोह, वेदनांचें अल्पत्व, चिरकालीन ,कटू तित्कानें बरें वाटणें अशीं लक्षणें असतात.  द्वंद्वजामध्यें दोन दोषांची व त्रिदोषजन्यामध्यें तीन दोषांचीं लक्षणें असतात.
या व्याधीला तो चिरकारी झाला असतांना आंत्रामध्यें व्रण उत्पन्न होणें, तीव्र वेदना व रक्तपित्त अशी लक्षणें होतात.

अन्नद्रवशूल
जीर्णे जीर्यत्यजीर्णे वा यच्छूल्मुपजायते।
पथ्यापथ्यप्रयोगेण भोजनाभोजनेन च॥
न शमं याति नियमात्सोऽन्नद्रव उदाहृत:।
मा. नि. शूल २१,२२ पान २२६

तदप्यसाध्यं नित्यत्वात् , उक्तं वैद्य विशारदै:।
यो. र.पान ५०३

सतत तीव्र स्वरुपाचा शूल होत राह्तो. अन्न खाल्लें असतां, अन्न पचत असतां, अन्न पचल्यानंतर उत्पन्न होणार्‍या   अवस्थाभेदानें,शूलावर विशेष परिणाम होत नाहीं. अमुक एक पदार्थ, खाऊन बरें वाट्तें.आणि अमुक एक पदार्थ , खाऊन शूल वाढ्वतो असें या शूलासबंधी सांगता येत नाहीं. लंघनानें व आहार घेतल्यानें बरें वाटेल असा कोणताही नियम सांगता येत नाहीं. या शूलाला अन्न द्रव शूल असें म्हणतात. द्रव शब्दाचे धांवणें, पातळ होणें व हल्ला करणें असे अर्थ आहेत. अन्नामुळें या तीनहि गोष्टी अन्नवहस्त्रोतसामध्यें घडतात असा अर्थ `अन्न द्रव' या नामकरणामागें अभिप्रेत असण्याची शक्यता आहे. अन्नद्रवशूल हा बहुधा स्वतंत्रपणें उत्पन्न होत नाहीं. शूल वा परिणाम शूलाची ती असाध्य अशी अंतीम अवस्था आहें असे आम्हांस वाटतें.

कुक्षी शूल
प्रकुप्यति यदा कुक्षौ वह्निमाक्रम्य मारुत: ।
तदाऽस्य भोजनं भुक्तं सोपस्तंभं न पच्यते ॥

उच्छ्रवंसित्यामशकृशता शूलेनाहन्यते मुहु: ।
नैवासने न शयने तिष्टन् वा लभते सुखम् ॥
कुक्षिशूल इति ख्यातो वातादामसमुद्भव: ।
कुक्षिशूलमाह - प्रकृप्यतीत्यादि । आक्रम्य मन्दीकृत्य ।
सोपस्तम्भं स्तब्धतान्वितम् । उच्छ्‍वसिति उच्छूवासं
करोति `पुरुष' इति शेष: ।
आमशकृता अपक्वपुरीषेण । तिष्ठेन् उर्ध्वीभवन् ।
सटिक सु. उ. ४२-१२३ ते १२५ पान ७२५

वायुमुळें अग्निमांद्य होऊन वायू कुक्षीमध्यें प्रकुपित होतो. त्यावेळीं खाल्लेल्या अन्नाला स्तब्धता प्राप्त होतें (तडस लागते) अन्न पचत नाहीं. श्वास लागतो. पुरीष अपक्व असते (द्रव, दुर्गंधी, पिच्छिल) शूलाचे वरचेवर वेग येतात. बसणें, निजणें, उभे रहाणें या कोणत्याहि स्थितींत बरें वाटत नाहीं. आम आणि वायु यांच्यामुळें हा कुक्षी शूल उत्पन्न होतो.

अन्नदोषजशूल
अतिमात्रं यदा भुक्तं पावके मृदुतां गते ।
स्थिरीभूतं तु तत्कोष्ठे वायुरावृत्य तिष्ठति ॥
अविपाकगतं ह्यन्नं शूलं तीव्रं करोत्यति ।
मूर्च्छाऽऽध्मानं विदाहश्च हृदुत्क्लेशो विलम्बिका ॥
विरिच्यते छर्दयति कम्पतेऽथ विमुह्यति ॥
अविपाकोद्भवेच्छूलस्त्वन्न्दोषसमुद्भव: ।
अतिमात्रमित्यादि । अविपाकगतम् अविपाकं प्राप्तम् ।
सटिक सु. उ. ४२.१४२ ते १४४ पान ७२६

अग्नि मंद झाला असतांना अन्न अधिक प्रमाणांत घेतलें गेल्यामुळें प्रकुपित झालेला वायू अन्नाला कोष्ठामध्येंच (अन्नवहस्त्रोतस्, आमाशय, पच्यमानाशय) आडवून स्थिर करतो. न पचलेलें हें अन्न अत्यंत तीव्र शूल उत्पन्न करते. या व्याधीमध्यें मूर्च्छा, आध्मान, विदाह, उत्क्लेश, अतिसार, छर्दी, कंप, मोह अशीं लक्षणें असतात. आशयाची दुष्टी अधिक असल्यास छर्दि, अतिसार या लक्षणांचे ऐवजीं विलंबिका हें लक्षण दिसतें. सुश्रुतोक्त अन्नवहस्त्रोतसाशीं संबंधित असलेलें `कुक्षी शूल' व `अन्न दोषजशूल' पूर्णपणें स्वतंत्र नसून आमज शूलाचेच अवस्था भेदानें वर्णिलेले ते प्रकार आहेत असें आम्हांस वाटतें. आमजशूल वातानुबंधी असतांना, कुक्षीशूल हा प्रकार होतो, पित्तानुबंधी असतांना `अन्न दोषज' शूल हा प्रकार होतो. अन्न दोषज शूलामध्येंच पित्तासह वाताचाहि अनुबंध उत्कटतेनें असतो. त्यावेळीं दोषांचें अनुलोमन न होतां विलंबिका लक्षण युक्त असा अन्नदोषजशूल उत्पन्न होतो.

वृद्धिस्थानक्षय
शूलाची तीव्रता वाढणें, अरति, अन्नाला स्तब्धता येणें, उद्गार दुर्गंधी असणें हीं लक्षणें शूल व्याधी वाढत चालल्याची आहेत. साध्या शूलाची परिणाम शूलांत व परिणाम शूलाची अन्न द्रव शूलांत परिणती होते. हीहि व्याधीची वृद्धीच आहे. शूलाची तीव्रता विशेष न वाढतां त्याला दीर्घकालीनता येणें ही स्थानस्थिती आहे. शूल असण्याचा काल कमी होणें व शूल नाहीं असा काल वाढणें हें व्याधी कमी होऊं लागल्याचें लक्षण आहे.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
प्लीहा, अर्श, ग्रहणी, श्वास, कास (काश्यप ३४७ पान)
हृद्‍ग्रह, मूत्रग्रह, व्रण
आटोप, आनाह, गुल्म, (काश्यप पान ३४६)
उदावर्त, मूत्रकृच्छ्र, हृद्‍रोग - काश्यप ३४७)
विषमज्वर, हृद्‍ग्रह, पांडु, वात गुल्म - काश्यप ३४७
कृमी, हिक्का - काश्यप ३४८

कटिशूल, पृष्ठशूल, मूढवात, अर्श, पुरीषग्रह, मूत्रग्रह, गुदशूल, प्रवाहिका -- काश्यप ३४८
आढ्यवात, उदावर्त, वृद्धी, कुंडल (वात कुंडल).
मूत्र कृच्छ्र -- काश्यप, ३४९

उपद्रव
वेदनातितृषा मूर्च्छा ह्यानाहो गौरवारुची ।
भ्रमो ज्वर: कृशत्वं च बलहानिस्तथैव च ॥
कास: श्वासश्च हिक्का च शूलस्योपद्रवा स्मृता: ।
यो. र. पान ४९५

तीव्र शूल, तृष्णा, मूर्च्छा, आनाह, गौरव, अरुचि, भ्रम, ज्वर, दौर्बल्य, कृशता, कास, श्वास, हिक्का हे शूलाचे उपद्रव आहेत.

उदर्क
अन्न दव शूल.

साध्यासाध्यविवेक
एकदोषोत्थित: साध्य: कृच्छ्रसाध्यो द्विदोषज: ।
सर्वदोषोत्थितो घोरस्त्वसाध्यो भुर्युपद्रव: ॥
मा. नि. शूल १४ पान २२४

एक दोषज शूल साध्य, द्विदोषज कृच्छ साध्य, त्रिदोषज व उपद्रवयुक्त शूल असाध्य. परिणाम शूलामध्यें कष्टसाध्यता असते. (कृच्छ्रेण निरुपद्रव: । यो.र. ५०३) दौर्बल्य, अग्निमांद्य, कृशता हीं लक्षणें असल्यास वा त्रिदोषज असल्यास परिणाम शूल असाध्य असतो.

रिष्ट लक्षणें
रक्त पित्त, छिद्रोदर
विलंबिका, विषूचिका.

चिकित्सा सूत्रें
वमनं लघनं स्वेद: पाचनं फलवर्तय: ।
क्षारश्चूर्णश्च च गुटिका: शस्यन्ते शूलशान्तये ॥
यो. र. पान ४९५

लड्घनं प्रथमं कुर्याद्वमनं च विरेचनम् ।
बस्तिकर्म परं चात्र पक्तिशूलोपशान्तये ॥
यो.र.पान ५०३

स्निग्धोष्णाम्लान् शीलयेद्वातशूली । वातघ्नैर्वा साधितं क्षीरमुष्णम् ॥
तैलं शुक्तं मस्तु सौवीरकं च । पिबेच्छूली सह सौवर्चलेन् ॥
हृद्या: शीता मधुरा भेदनीया: । पेया: सिद्धा: शीतला वा कषाया: ॥
क्षौद्रोन्मिश्रा: स्वादव: पित्तशूल - । स्योच्छेदार्थं शर्कराचूर्णयुक्ता: ॥
कुर्यात् कामं वमनं श्लेष्मशूले वान्तं चैनं लड्घितं सुप्रतान्तम् ।
क्षारोपेतं पाययेत् पाचनीयं ॥ पिप्पल्यादिक्वाथमुष्णं सहिड्गु ॥
काश्यप ३४६ पान

बुभुक्षाप्रभवे शूले लघु संतर्पणं हितम् ।
उष्णै: क्षीरैर्यवागूभि: स्निग्धैर्मासरसैस्तथा ॥
सु. उ. ४२ - १०० पान ७२४

शूलासाठीं, वमन, लंघन, स्वेदन, पाचन, फलवर्ती असे उपचार करावे. पाचनासाठीं क्षार, चूर्णे, गुटिका वापराव्यात. प्रथम लंघन करावे मग वमन द्यावें. त्यानंतर विरेचन व शेवटीं बस्ती, असें उपचार विशेषत: परिणाम शूलामध्यें करावेत. शूलामध्यें वात प्राधान्य असतांना स्निग्ध, उष्ण, अम्ल अशीं द्रव्यें वापरावींत. वातघ्न द्रव्यांनीं सिद्ध केलेलें दूध, तेल, कांजी वा मद्य वापरावें. शूलामध्यें पित्त प्राधान्य असतांना, मधुर, शीत, व सरगुण युक्त द्रव्यें वापरावीं. कफासाठीं वमन व लंघन करावें. उष्ण, तीक्ष्ण, क्षारगुण युक्त, रुक्ष अशीं द्रव्यें शमनासाठीं वापरावींत. सर्व शूलामध्यें वायू हा मूलभूत असल्यानें वातांचे शमन होईल. प्रकोप होणार नाहीं असें उपचाराचें धोरण असावें. त्यासाठीं स्नेहन, व बस्ती यांचा युक्तीनें उपयोग करावा. भूक लागेल त्यावेळीं शूलामध्यें दूध, यवागू व मांसरस वापरावे.

सुश्रुताचे वचन जरी वात शूलाच्या प्रकरणांत आलें असलें तरी सर्वच शूल प्रकरणामध्यें त्याचा उपयोग करावा असें आमचें मत आहे. दोषभेदानें रसवीर्य लक्षांत घ्यावें इतकेंच आहार लघु व द्रव असावा, व एकावेळीं अल्प मात्रेंत असावा. हा कोणत्याहि शूलामध्यें पाळावयाचा निरपवाद नियम मानला पाहिजे.

कल्प
सुंठ, पिंपळी, चित्रक, पिंपळमूळ, जिरे, हिंग, ओवा, खुरासनी ओवा, भांग, कुचला, धोत्रा, अहिफेन, शतावरी, अश्वगंधा, मंडूर, माक्षिक, गैरिक, द्राक्षा, निशोत्तर आरग्वध, हारितकी, शंखवटी, सामुद्रादि, लशुनादिवटी, हिंगाष्टक, प्र. पंचामृत, कामदुधा, संजीवनी. आमपाचन वटी, पंचकोलासव, दशमूलारिष्ट, शतावरीमंडूर शतावरी घृत, त्र्यूषणादि घृत.

आहार
दूध, तूप, गहू.

विहार
अजीर्ण, अध्यशन, दिवस्वाप, जागरणश्रम वर्ज्य करावें.

अपथ्य
डाळी, मिष्टान्नें, तळलेले पदार्थ, रुक्ष, शुष्क, गुरु गुणांचीं द्रव्यें.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP