गांधी उठतात. अविपाक हृल्हास, उत्क्लेश अशीं लक्षणें होतात. उलटी झाल्यावर बरे वाटते.
अधोग अम्ल पित्त
तृड्दाहमूर्च्छा भ्रममोहकारि प्रयात्यधो वा विविधप्रकारम् ।
हृल्लासकोठानलसादहर्षस्वेदाड्कपीतत्वकरं कदाचित् ॥
तस्य कदाचित् कायोर्ध्वाधोगमनभेदाद्विविधस्याधोगतिं
तावदाह-तृडित्यादि । अधो विविधप्रकारं कदाचित्प्रयाति,
तथा तृड्दाहकारि, तथा हृल्लासादिकरं, मूर्च्छा सर्वथा
ज्ञानशून्यत्वं, मोहोऽत्र विपरीतं ज्ञानम् । प्रयात्यधो वेत्यत्र
वाशब्दो भाव्यूर्ध्वगमना पेक्षया; विविध प्रकारमिति हरित-
पीतकृष्णरक्तादिबहुवर्णत्वदुर्गन्धित्वयोगान्नानाविधम् ।
कदाचिदिति न सर्वकालम् ।
मा.नि. अम्ल - ३ पान ३४६ आ. टीकेसह
अधोग अम्ल पित्तामध्यें द्रव मल प्रवत्ती हें महत्त्वाचें लक्षण आहे. मलप्रवृत्ति चोथा पाणी अशा स्वरुपाची व हिरवट पिवळी, काळसर, लाल दुर्गंधीयुक्त आंबुस वास असलेली अशी होते. तृष्णा, दाह, मूर्च्छा, भ्रम, मोह, हृल्हास, अग्निमांद्य अशीं लक्षणें असतात. अंगावर गांधी उमटतात. घाम येतो. अंगावर, रोमांच उभे रहातात. क्वचित नख नेत्रादींच्या ठिकाणीं पीत वर्ण येतो.
संग्रहामध्यें अम्ल पित्तासंबंधी पुढील वर्णन आढळतें.
पच्यमानं विदाह्यन्नं रक्तादीन् कोपयेद्यदा ।
पित्तं च कोपये पित्तं च कोपयेदाशु कफस्यानानिलेरितम्
तदा भवति हृद्शूल मुखवैरस्य सादनम् ।
लवणं तिक्तमंम्लंच सततं छर्दयत्यगि ।
दाहोति निद्रा विट्संगो वैवर्ण्य कार्श्यमेवच ।
अरोचकोह्युत्सुकिता प्रसेकश्लेष्मणस्तथा ।
सर्वमैतानि लिंगानि निर्दिशेत् तत्प्रमीलकम् ।
पर्यायादम्लपित्तं च तथा पित्तविषूचिके ॥
अ.सं.सू. ५ पा. ३०-३१ इन्दुटीका.
संग्रहानें केलेला रक्तदुष्टीचा उल्लेख धातुगतावस्थेचा द्योतक मानावा. प्रमीलक आणि पित्तविषुचिका हे त्यानें अम्लपित्ताचें पर्याय म्हणून सांगितले आहेत.
दोषभेदानुरुप प्रकार
सानिलं सानिलकफं सकफं तच्च लक्षयेत् ।
दोषलिड्गेन मतिमान् भिषड्वोहकरं हि तत् ॥
कम्पप्रलापमूर्च्छाचिमिचिमगात्रावसादशूलानि ।
तमसो दर्शनविभ्रमविमोहहर्षाण्यनिलकोपात् ॥
कफनिष्ठीवनगौरवजडातारुचिशीतसादवमिलेपा: ।
दहनबलसादकण्डूनिद्राश्चिह्नं कफानुगते ॥
उभयमिदमेव चिह्नं मारुतकफसंभवे भवत्यम्ले ।
(तिक्ताम्लकटुकोद्गारहृत्कुक्षिकण्ठदाहकृत् ॥)
भ्रमो मूर्च्छारुचिश्छर्दिरालस्यं च शिरोरुजा ।
प्रसेको मुखमाधुर्य श्लेष्मपित्तस्य लक्षणम् ॥
तस्मिन्ननिलकफसंसर्गमाह-सानिलमित्यादि । तच्चाम्लपित्तं
सानिलं सवातं, सानिलकफं, सवातकफं, लक्षयेत् ।
दोषलिड्गेन वातपित्तकफलिड्गेनेत्यर्थ: । यतस्तद्भिषड्वोहकरं
वैद्यभ्रान्तिजनकं, तस्योर्ध्वाध:प्रवर्तमानत्वेन छर्द्यतीसाराभ्यां
भेदस्य दुर्ज्ञेयत्वात् । सानिलस्याम्लपित्तस्य लक्षणमाह कम्पेत्यादि ।
वातयुतेऽम्लेकम्पादयस्तथा तमोदर्शनादयो भवन्ति ।
कफानुगतस्य लक्षणमाह - कफेत्यादि ।
म्ले कफनिष्ठीवनादिलिड्गं स्यात् । सादवमिलेपा इति साद:
अड्गसाद: लेप: कफलिप्तास्यता: दहनबलसादेति सादशब्दो
दहनबलाभ्यां संबन्ध्यते, अन्यत्सुगमम् ।
मा. नि. अम्ल ८ ते १२ पान ३४८ आ. टीकेसह
वातानुबंधी अम्लपित्त व्याधींत कंप, प्रलाप, मूर्च्छा, मुंग्या येणें, अंग गळून जाणें, शूल, अंधारी येणें, चक्कर येणें, मोह, रोमहर्ष अशीं लक्षणें असतात. कफानुबंधी अम्लपित्तांत थुंकींतून कफ पडणें, अंग जड वाटणें, पोट भरल्यासारखे वाटणें, तोंडाला चव नसणें, थंडी वाजणें, अंग गळून जाणें, छर्दी होणें, तोंड चिकट होणें, अग्निमांद्य, दौर्बल्य, कंडू, निद्राधिक्य हीं लक्षणें असतात. कफ वातानुबंधी अम्लपित्तांत-वर उल्लेखले कफानुबंधी व वातानुबंधी अम्लपित्ताप्रमाणें मिश्र लक्षणें असतात.
माधव-निदानाच्या या अनुबंध प्रकरणामध्यें कफपित्तानुबंधी अम्ल पित्ताचा एक प्रकार वर्णन केला आहे. परंतु ते श्लोक प्रक्षिप्त असावेत कारण टीकाकारांनीं त्यांचा उल्लेख केला नाहीं. लक्षणामध्यें कांहीं विशेष लक्षणें उल्लेखिलेलीं नाहींत. वंगसेन, योगरत्नाकर, भावप्रकाश या ग्रंथकारांनीं या कफपित्त प्रकाराचा उल्लेख केला आहे. या प्रकारामध्यें कंडू, आंबट, तिखट असे ढेकर येतात व उलटी होते. छातीची व घशाची आग होते. भ्रप (तम) मूर्च्छा, अरुचि, छर्दी, आलस्य, शिर:शूल, लाळ सुटणें, तोंड गोड होणें, हीं लक्षणें असतात. कांहीं लोक श्लेष्मपित्त हा अम्लपित्तासारखा स्वतंत्र व्याधी मानतात पण स्वतंत्र रोग मानण्याचें कारण नाहीं असें आम्हांस वाटतें. अम्लपित्त हा व्याधी बहुधा अत्यंत चिरकारी असतो. क्वचित् केव्हांतरी होणार्या जळजळीपासून पित्ताची रक्तयुक्त छर्दी होण्यापर्यंत त्याच्या अनेक प्रकारच्या सौम्य वा दारुण अशा अवस्था असतात. शिर:शूल, भ्रम, संताप, दाह अशीं दोषलक्षणेंहि अनुबंधाप्रमाणें विविध स्वरुपाची असतात. कधीं छर्दी तर कधीं अतिसार अशा विरुद्ध मार्गानीं दोष प्रकट होतात. त्यामुळें वैद्याला निदान करतांना भ्रम उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती असते.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
खालित्य (टक्कल पडणें), प्रमेह व्रण (अभ्यंतर आत्रंगत) शुक्रदोष, (वंगसेन अम्लपित्त ३२ पान ६५५)
रक्तपित्त, मूर्च्छा, श्वास (वंगसेन अम्ल ४६ पान ६५६) अन्गिमांद्य परिणाम शूल, कामला, पांडुरोग (वंगसेन ५२ पान ६५७)
ज्वर वातरक्त क्षय, कार्श्य, नपूंसकत्व, निद्रानाश (वंगसेन ६५ पान ६५८)
कास, प्रतिश्याय, पीनस, यक्ष्मा, मूत्ररोग (मूत्राघात,- वात व्याधी, अर्श (वंगसेन ७४ ते ७६ पान ६५८.)
ग्रहणी, आमवात (वंगसेन ९२ ते ९४ पान ६६० ज्वर, कुष्ठ, विसर्प, वातरक्त, विद्रधी, रक्तगुल्म विस्फोट (काश्यप पान ३३८).
छर्दी, शूल, गुल्म, कास, ग्रहणी, अतिसार, श्वास, अग्निमांद्य, हिक्का, उदावर्त (योग रत्नाकर अम्ल पान ७०५)
उपद्रव
ज्वरातीसारपाण्डुत्वशूलशोथारुचिभ्रमै: ।
उपद्रवैरिमैर्जुष्ट: क्षीणधातुर्न सिद्धयति ॥
काश्यप - पान ३३८
ज्वर, अतिसार, पांडू, शूल, शोथ, अरोचक, भ्रम, धातुक्षीणता असे उपद्रव या व्याधीमध्यें होतात.
उदर्क
शूल, व्रण. (आंत्रामध्यें)
साध्यासाध्य विवेक
रोगोऽयम्लपित्ताख्यो यत्नात् संसाध्यते नव: ।
चिरोत्थितो भवेद्याप्य: कृच्छ्रसाध्य: स कस्यचित् ॥
साध्यत्वादिकमाह - रोग इत्यादि ।
कृच्छ्रसाध्य: स कस्यचिदिति हिताहाराचारशीलिन:
कस्यचिच्चिरोत्थितोऽपि कृच्छ्रसाध्य: ।
मा.नि. अम्ल-७ पान ३४७ म. टीकेसह
अम्लपित्त व्याधी नुकताच उत्पन्न झाला असल्यास आहार-विहारादि उपचार योग्य रीतीनें केले गेले तर बरा होतो. चिरकारी व्याधी याप्य असतो. बरा होत नाहीं. कदाचित् व्याधी चिरकारी असूनहि रोगी बलवान व आहार-विहाराची पथ्यें कटाक्षानें दीर्घकाल पाळणारा असल्यास रोग कष्टसाध्य होऊं शकतो.
रिष्ट लक्षणें
उग्र स्वरुपाचें रक्तपित्त हा उपद्रव होऊन अति रक्तस्त्राव होणें मारक ठरतें.
चिकित्सा सूत्रें
व्याधिरामाशयोत्थोऽयं कफपित्ते तदाश्रये ।
तस्मादादित एवास्य मूलच्छेदाय बुद्धिमान् ॥
अक्षीणबलमांसस्य वमनं संप्रकल्पयेत् ।
नान्यो मान्य: क्र (मो) ह्यास्य शान्तये वमनादृते ॥
मूलच्छेदादिव तरो: स्कन्धशाखाविपर्यये ।
दोषशेषश्च वान्तस्य य: स्यात्तदनुबन्धकृत् ।
तस्योपशनं कुर्याल्लड्घैर्लघुभोजनै ।
सात्म्यकालोपपन्नैश्च योगै: शमनपाचनै: ॥
दोषोत्क्लेशे न सहसा द्रवमौषधमाचरेत् ।
वमनीयादृते तद्धि न सम्यक् परिपच्यते ॥
काश्यप पान ३३६, ३३७
पूर्वं तु वमनं कार्य पश्चान्मृदु विरेचनम् ।
कृतवान्तिविरेकस्य सुस्निग्धस्यानुवासनम् ॥
आस्थापनं चिरोत्थेऽस्मिन्देयं दोषाद्यपेक्षया ।
दोषसंसर्गजे कार्यमौषधाहारकल्पनम् ।
ऊर्ध्वदेहस्थिते वान्त्याऽप्यध:स्थं रेचनैर्हरेत् ।
पाचनं तिक्तबहलं पथ्यं च परिकल्पयेत् ॥
योर. र. अम्ल पान ७०१
आमाशयस्थ कफपित्ताच्या दुष्टीमुळें अम्लपित्त हा व्याधी उत्पन्न होत असल्यामुळें रोगी बलवान् असेल व कृश झालेला नसेल तर त्यास तिक्त रसात्मक द्रव्यानें वमन द्यावें. वमन हें या रोगावरील महत्त्वाचें औषध. वमनानंतर विरेचन द्यावें. त्यानंतर अनुवासन व निरुह बस्ती वापरावा. ऊर्ध्वग व अधोग अम्ल पित्तावर क्रमानें वमन व विरेचन यांचा विशेष उपयोग होतो. दोषांचें शोधन झाल्यानंतर दोषांचा अनुबंध असेल त्याप्रमाणें शमन उपचार करावे. लंघन द्यावें. नंतर लघु भोजन द्यावें, सात्म्य व काल लक्षांत घेऊन तिक्तरस प्रधान शमन, पाचन द्रव्यें वापरावीं. दोषांचा उत्क्लेश असतांना वमन करावयाचें नसलें तर सहसा द्रव पदार्थ औषधासाठीं वापरुं नयेत. कारण द्रवामुळें उत्क्लेशास साहाय्यच होतें.
कल्प
गुडुचि, काडेचिराईत, कुटकी, शतावरी, शुंठी, पिंपळी, आमलकी, हारीतकी, कदर्दिक, द्राक्षा, आरग्वध, मंडूर, दाडिम, लोहभस्म, रौप्यभस्म, सुवर्णभस्म, त्रिवंग भस्म, प्रवाळ पंचामृत, प्रवाल कामदुहा, शंख सूतशेखर शतावरी मंडूर, शतावरी घृत, अविपत्तिकरचूर्ण, नारीकेल जल, बदाम, नारळ, यष्टिमधु. उशिरासव, द्राक्षासव, चंदनासव, कुमारी आसव
आहार
दूध गहूं जीर्ण तांबडी साळ, मूग, भेंडी, दूधभोपळा, नारळ.
विहार उष्ण सेवा वर्ज्य
अपथ्य
विदाही गुरु अम्ल, अति द्रव वर्ज्य.