रसवहस्त्रोतस् - रसाचें स्वरुप
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
तत्र पाञ्चभौतिकस्य चतुर्विधस्य षड्रसस्य द्विविधवीर्यस्याष्ट
विधवीर्यस्य वाऽनेकगुणस्योपयुक्तस्याहारस्य सम्यक्परि
णतस्य यस्तेजोभूत: सार: परमसूक्ष्म: स `रस: इत्युच्यते,
तस्य हृदयं स्थानं, स हृदयाच्चतुर्विशतिधमनीरनुप्र-
विश्योर्ध्वगादशदशाधोगामिन्यश्चतस्त्रश्च तिर्यग्गा: कृत्स्नं
शरीरमहरहस्तर्पयति वर्धयति धारयति यापयति चादृष्ट-
हेतुकेन कर्मणा ।
यस्य शरीरमनुसरतोऽनुमानाद्गतिरुपलक्षयितव्या क्षयवृद्धिवैकृतै: ।
तस्मिन् सर्वशरीरावयवदोषधातुमलाशयानुसारिणि रसे जिज्ञासा-
किमयं सौम्यस्तैजसं इति ।
अत्रोच्यते-स खलु द्रवानुसारी स्नेहनजीवनतर्पणधारणादिभिर्विशेषै:
सौम्य इत्यवगम्यते ।
सु.सू. १४-३ पान ५९
सहा रसांनीं युक दोन वा आठ प्रकारचें वीर्य असलेल्या, अनेक गुणयुक्त अशा चार प्रकारांनीं घेतल्या गेलेल्या पांचभौतिक आहाराचें उत्तम रीतीनें पचन झाल्यानंतर अग्नीच्या संस्काराचा परिणाम म्हणून जो सूक्ष्मस्त्रोतोगामीं असा सारभाग उत्पन्न होतो त्यास रस असें म्हणतात. सतत फिरत राहतो यामुळें गतिवाचक धातूपासून रस हा शब्द निर्माण झाला आहे (सु.सू. १४-१३).
घेतलेल्या आहारापासून एक दिवसानंतर रस उत्पन्न होतो (सु.सू. १४-१५ डल्हणटीका).
या रसाचे पोषक व पोष्य किंवा पोषक व स्थायी असें अवस्थाभेदानें दोन प्रकार आहेत (सू.सू. १४-१० टिप्पणी).
महास्त्रोतसामध्यें अन्नापासून निर्माण होऊन ग्रहणीद्वारां शोषला जाण्याच्या अवस्थेंर्त त्यास आहाररस म्हणावें वा पोषक रस म्हणावें आणि हृदयांतून व्यानाच्या प्रेरणेनें रसवाहिनींच्या द्वारां तीन दिशांनीं सर्व शरीराचें तर्पण, वर्धन, धारण, जीवन (यापन) करीत संचार करणार्या रसाच्या स्वरुपास, पोष्य किंवा स्थायी रस, रसधातू अशी संज्ञा आहे. याचा कांहीं भाग इतर धातूंच्या दृष्टीनें स्वरुपाचाहि असतो. रसक्षय, रसवृद्धी व रसदुष्टी या स्वरुपांची शरीरांत संचार करणार्या रसाची तीन प्रकारची स्थिती असतें असें अनुमान करता येतें. हा रस शरीराचे सर्व अवयव, दोष, धातू, मल, आशय यांमध्यें संचार करीत राहून पुन: हृदयामध्यें परत येतो. गतीच्या परिवर्तनाचें हें चक्र सतत फिरत रहातें.
(च.चि.१५-२१).
हा रस द्रवगुणाचा असून सौम्यस्वभावी (शीतवीर्य) असा आहे. शरीराचें स्नेहन त्याच्यामुळें होतें. प्रकृत स्थितींतील कफाचे व रसाचे कांहीं गुण सारखेच असतात. रसाचेहि इतत धातूंप्रमाणेंच मलरुप, स्थूलरुप व अणूरुप असे तीन भाग आहेत. आहाररसावर रसधातूच्या अग्नीची परिणमनक्रिया होऊन कफ हा मलभाग निर्माण होतो, धातुरुप वा पोष्य रसरुपानें रसाचा स्थूलभाग असतो आणि सूक्ष्म-अणू-भागापासून पुढें रक्त तयार होतें. रसापासूनच स्त्रियांमध्यें स्तन्य व रज हे भाव उत्पन्न होतात. वृद्धांमध्यें रसाचे धातूच्या पोषणाचे व अभिवहनाचें कार्य मंदावतें व त्यामुळें म्हातारपणी शरीराचें व्हावें तसें प्रीणन होत नाहीं. रसाचें महत्त्व सांगत असतांना सुश्रुतानें म्हटलें आहे कीं -
तत्रैतेषां धातूनामन्नपानरस: प्रीणयिता ।
रसजं पुरुषं विद्याद्रसं रक्षेत् प्रयत्नत: ॥
अन्नात्पानाच्च मतिमानाचाराच्चाप्यतन्द्रित: ।
सु.सू. १४-११,१२ पान ६२
सर्व धातूंचें पोषण व प्रीणन अन्नापानापासून साररुपानें उत्पन्न झालेल्या रसापासूनच होतें म्हणून पुरुषाची उत्पत्ती रसापासूनच होते असें मानावें. निदान शुक्रशोणितसंयोगानंतर तरी प्रत्येक अवस्थेंत शरीराच्या धारण पोषणासाठीं अपरिहार्यपणें रसाची आवश्यकता असते म्हणून प्रयत्नपूर्वक रसधातूचें रक्षण करावें. तत्परतेनें, अत्यंत दक्ष राहून अन्न, पान, विहार यामुळें रसाला विकृतस्थिती प्राप्त होणार नाहीं अशी काळजी घ्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : July 24, 2020
TOP