धर्मादीनि, ये तु धर्मादीनि । गुह्यकाक्रान्तो हि देशो
यथा आक्रन्दनशब्दबहुलो भवति, तादृशम् ।
सटीक च. वि. ३-६ ते १२ पान ५०६, ५०७
व्यक्तीव्यक्तींच्या प्रकृति बलाबल इत्यादि भाव जरी एकमेकापेक्षां वेगवेगळे असले तरी कांहीं भाव सर्वाच्याशीं सारखेच संबंधित असतात. वायू, जल, देश, काल या चार गोष्टी अशा आहेत किं जनपदातील व्यक्तिभेद कसाही असला तरी त्यांच्याशी यांचा संबंध सामान्यत: सारखाच असतो. त्यामुळें कोणत्याहि कारणानी जल, वायु, देश, काल यांच्यापैकी एक वा अधिक भाव विकृत झाले. त्यांचे स्वरुप निसर्ग क्रमाप्रमाणे मानवी शरीराला हितकर राहिले नाही, म्हणजे त्याचा परिणाम सर्व व्यक्तिवर सारखाच होतो. कारणातील विकृतीच्या एकरुपतेमुळें वा सारखेपणामुळें कार्यस्वरुप जो व्याधी तोही एकरुपच असतो, समान लक्षणात्मक असा असतो, अलौकिक स्वरुपाची व्याधि क्षमता एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा वायु देश जलाच्या सामान्य विकृतीमुळें बहुसंख्य व्यक्ती समानव्याधीनेच पीडीत होतात.
या चारीहि जनपदोध्वसंक कारणाच्या विकृतीचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.
(१) अनारोग्यकर वायु
ज्या ऋतूमध्यें ज्या स्वरूपाचा वारा वहांवा त्यापेक्षां त्यांच्या सीतोष्णस्पश व गति यांच्यांमध्यें विषमता असणें, वायू अगदीं पडणें, (मुळीच न वहाणें) फार वाहणें, वातावरण अतिशीत अतिउष्ण अतिरुक्ष अतिअभिष्यंदी (दमट) होणें, भयंकर स्वरुपाची वादळें उत्पन्न होणें वार्याची गति परस्पर विरुद्ध असणें वातचके (वावटळी) निर्माण होणें, वायूबरोबर अहितकर असा गंध येणें, वातावरणामध्यें बाष्प (वाफ) धूळ, धूर, इतर रजःकण यांचे प्रमाण अधिक असणें या सर्व कारणांनी वातावरण रोगकारक होते.
(२) अनारोग्यकर जल
पाण्याच्या नित्याचा असा नैसर्गिकपणा नष्ट होऊन त्यास विकृतगंध वर्ण रस स्पर्श प्राप्त होणें. ते गढूळ मलिन होणे (क्लेदबहुल), पाण्यामध्यें नेहमीं रहाणारे जलचर (मासे कासव) पक्षी यानी त्या जलाशयाचा त्याग करणें, या लक्षणांनी पाण्याचे स्वरुप अहितकर झाले आहे असे समजावे.
(३) अनारोग्यकर देश
त्या त्या प्रदेशातील जल वायु वा मातीचेब स्वरुप-वर्ण रस स्पर्श गंधयांनी विकृत होणे. दलदलवाढणे, साप विंचू ढेकूण डांस पिसवा माशा टोळ किदे उंदीर घुबडे गिधाडे ससाणे कोल्हे इत्यादी प्राण्यानी वा कृमिकीटकानी तो प्रवेश व्यापला जाणे, गवत वेली झाडे झुडपे अनिंर्बधपणे वाढ होणे, प्रदेशाचे स्वरुप एकदम पालटणे, पिके एकाएकी वाळणे जळणे कोळपणे, धुरकट वारा वहाणे, टोळधाडी येणे, कोल्ही कुत्री ओरडू लागणे, प्रदेशातील निरनिराळे पशुपक्षी यानां एकाएकी रोग होऊन ते मरुन पडणें, वा पशुपक्षी तो प्रदेश सोडून पळून जाणे, जलाशय फार सांचून क्षुब्ध होऊन बांघारे फुटून वाहणे, फार उल्कापात होणे, भूकंप होणे, प्रदेशाचे स्वरूप उध्वस्त ओसाड भयंकर असे होणे, सूर्य चन्द्र तारका यांच्यावर रूक्ष ताम्र अरूण कृष्णवर्ण अशा मेघांचे पटल पडलेलें असणें, गोंधळ , गडबड, रडारड, चोर्यामार्या यांचे प्रमाण वाढणे, धर्म सत्य लज्जा सदाचार सत्शील हे नागरिकांच्या अंगी आवश्यक असलेलें गुण टाकलेले वा नष्ट झालेले दिसणे, नेहमी अंधावरून अशा गोष्टी वरचेवर अधिक प्रमाणांत घडूं लागल्या म्हणजे तो भूप्रदेश आरोग्याच्या दृष्टीनें अहितकारक होतो.
(४) अनारोग्यकर काल
योग्यऋतू योग्यवेळीं न येता त्यात विपरीत स्वरूपामध्यें फार आधिक्य वा फार न्यूनता उत्पन्न होणे हे कालाच्या विकृतीचे लक्षण आहे.
तथा शस्त्रप्रभवस्यापि जनपदोद्ध्वंसस्याधर्म एव हेतु-
र्भवति । येऽतिप्रवृद्धलोभरोषमोहमानास्तेदुर्बलानवमत्यात्म-
स्वजनपरोपघाताय शस्त्रेण परस्परमभिक्रामन्ति, परान्
वाभिक्रामन्ति, परैर्वाभिक्राम्यन्ते ।
च.वि ३-२५ पान ५१०.
जनपदाचा उध्वंस करणा~या वायुजलदेशकाल या चार कारणासवेच युद्ध हेहि पांचवे कारण आहे. या कारणाचे संख्यान केले नसले तरी उल्लेख केलेला आहे. व तो महत्वाचा आहे.
उद्धामध्ये होणारा रक्तपात, हिंसा, पराकाष्ठेचे मिथ्याचरण, यांचा परिणाम म्हणून अनेक प्रकारचे साथीचे रोग बळावतात.
वैगुण्यमुपपन्नानां देशकालानिलाम्भसाम् ।
गरीयस्त्वं विशेषेण हेतुमत् संप्रवक्ष्यते ॥
वाताज्जलं जलाद्देशं देशात् कालं स्वभावत्: ।
विद्याद्दुष्परिहार्यत्वाद्गरीयस्तरमर्थवित् ॥
वाय्वादिषु यथोक्तानां दोषाणां तु विशेषवित् ।
प्रतीकारस्य सौकर्ये विद्याल्लाघवलक्षणम् ॥
वैगुण्यमित्यादिना -दुष्टानां वातादीनां यस्य य उत्कर्षो येन
च हेतुना तदाह । स्वभावतो विद्याद् दुष्परिहार्यत्वादिति
स्वभावादेव वातापेक्षया जलं दुष्परिहरं भवति, जलाच्च देश:
देशाच्च काल:, वातो हि निवातदेशसेवया दुष्ट: परिक्रियते
न तथा जलम् तद्धि देहवृत्त्यर्थमवश्यं सेव्यम् । जलमपि
च यदि महता प्रयत्नेन परिहर्तु युज्यते, देशस्तु जला-
पेक्षया दुष्परिहरो भवति, तदव्यतिरेकणावस्थातुमशक्यत्वात्
देशोऽपि यदि देशान्तरगमनेन परिहर्तु युज्यते, कालस्तु
त्यक्तुमशक्य इति सर्वेष्वेव गरीयान् । "गरीय: परम् "
पाठे यद् यत: परम्, तत्ततो गरीयो विद्यादिति योजना ।
ततद्विपर्ययेन लाघवमाह वाय्वादिष्वित्यादि) 'प्रतीकारस्य
सौकर्य" इति यथोक्तविधया बातादिपरित्यागस्य सुकरत्वे-
नेत्यर्थ: ।
सटीक च. वि. ३-१३ ते १५ पान ५०८
या जनपदांच्या विध्वंस करणार्या रोगांना कारणीभूत होणार्या चौर गोष्टी उत्तरोत्तर अधिक बलवान् आहेत. परिणामाच्या दृष्टीनें आणि टाळता येणें सोपे असण्याच्या दृष्टीनें वाय़ूपेंक्षा जल जलपेंक्षा देश व देशापेंक्षा काल अधिकाधिक दुष्परिहार्य आहेत. तसेंच त्यांना हितकर करणे हे ही अधिकाधिक अवघड आहे. या चार गोष्टी विकृत न होतील असे जेवढे कांहीं करणें माणसाच्या स्वाधीन असेल तेवढे त्यानें केले पाहिजे. विशेषत: जल आणि देश यांच्या विकृति उत्पन्न करण्यास मनुष्य हा कारण असूं शकतो. आणि त्यामध्यें उत्पन्न झालेल्या विकृति नाहींशा करणे हे बव्हंशी तरी माणसाच्या हातांत असूं शकते. एका व्यक्तींकडून दुसर्या व्यक्तीकडे रोगाचे संक्रमण होण्याचे जे मार्ग आयुर्वेदीय ग्रंथकारांनीं सांगितले आहेत, त्याच मार्गानें जलसेशांच्या माध्यमांच्या द्वारानेंही रोगसंक्रमण होऊं शकते. यासाठीं रोगसंक्रमणाची कारणें न घडतील आणि त्यांना जलदेशांचे माध्यम न मिळेल अशी काळजी व्यक्तीपुरती व समष्टीपुरतीही घेतली गेली पाहिजे. रोगाची सर्वसामान्य कार्यकारणमीमांसा व्यावहारिक दृष्टीनें वा स्थूलदृष्टीनें जी सर्वास माहित असते तिच्यापेक्षां रोगोत्पतीच्या अगदीं मूलभूतकारणांचा विचार फारच वेगळ्या आणि मूलगामी दृष्टिकोनातून चरकाचार्यानी केलेला आहे. दिक्दर्शनापुरते त्याचे विवेचन आवश्यक वाटतें.
प्रागपि चार्धमादृते नाशुभोत्पत्तिरन्यतोऽभूत् । आदिकाले
हि अदितिसुतसमौजसौऽतिविमलविपुलप्रभावा; प्रत्यक्ष-
देवदेवर्षिधर्मयज्ञविधिविधाना: शैलेन्द्रसारसंहतस्थितशरीरा:
प्रसन्नवर्णेन्द्रिया: पवनसमबलजवपराक्रमाश्चारुस्फिचोऽभि-
रुपप्रमाणाकृतिप्रसादोपचयवन्त: सत्यार्जवानृशंस्यदान-
दमनियमतउपवासब्रह्मचर्यव्रतपरा व्यपगतभयरागद्वेषमोह-
लोभक्रोधशोकमानरोगनिद्रातन्द्राश्रमक्लमालस्यपरिग्रहाश्च
पुरुषा बभूवुरमितायुष: । तेषामुदारसत्वगुणकर्मणामचिन्त्य-
रसवीर्यविपाकप्रभावगुणसमुदितानि प्रादुर्बभूवु: शस्यानि,
सर्वगुणसमुदितत्वात् पृथिव्यादीनां कृतयुगस्यादौ ।
भ्रश्यति तु कृतयुगे केषाञ्चिदत्यादानात् । साम्पन्निकानां
शरीरगौरवमासीत् सत्वानाम् । गौरवाच्छ्रम: श्रमादालस्यम्,
आलस्यात् सञ्चय:, सञ्चयात् परिग्रह:, परिग्रहाल्लोभ:
प्रादुर्भूत: कृते ।
ततस्त्रेतायां लोभादभिद्रोह:, अभिद्रोहादनृतवचनम्,
अनृतवचनात् कामक्रोधमानद्वेषपारुष्याभिघातभयतापशोक-
चिन्ताद्वेगादय: प्रवृत्त: । ततस्त्रेतायां धर्मपादोऽन्तर्ध्दानम-
गमत् । तस्यान्तर्धानात् युगवर्षप्रमाणस्य पादह्नास: ।
पृथिव्यादीनां च गुणपादप्रणाशोऽभूत् । तत्प्रणाशप्रकृतश्च
शस्यानां स्नेहवैमल्यरसवीर्यविपाकप्रभावगुणपादभ्रंश: ।
ततस्तानि प्रजाशरीराणि हीयमानगुणपादैश्चाहारविहारै-
रयथापूर्वमुपष्टभ्यमानान्यग्निमारुतपरीतानि प्राग्व्याधिभिर्ज्व-
रादिभिराक्रान्तानि । अत: प्राणिनो ह्नासमवापुरायुष:
क्रमश इति ।
च. चि. ३-२८, २९, ३० पान ५११
विकृतीची कारणें बाहेर असतात आणि त्याचा शरीराशी संबंध आला म्हणजे व्याधी उत्पन्न होतो हे मानणें प्रत्यक्षगामी असले व आयुर्वेदीयांनीं मर्यादितपणे या दृष्टिकोनाचा स्वीकार केला असला तरी व्याधीच्या उत्पत्तीला व्याधिक्षमतेचा अभाव हे अत्यंत महत्वाचे कारण आहे. यावर आयुर्वेदीयांचा भर अधिक आहे. व्याधिक्षमता ही शरीरांच्या आणि मनाच्या सम्यक्-स्थितींवर अवलंबून असतें. अनुवंशाचाहि त्यांत मोठा भाग आहे. यासाठीं पूर्णनिरोगिता पाहिजे असल्यास शरीराचे आणि मनाचे संरक्षण वर्षानुवर्ष पिढयान्पिढ्या केले पाहिजे. असा आयुर्वेदीय सिद्धांत आहे. फार वर्षापूर्वी ज्यावेळीं मानसिक व शारीरिकदृष्टया लोक संपूर्णपणें अविकृत होते. त्यावेळीं लोकांची शरीरे उंच धिप्पाट सुडौल तेजस्वी कणखर बलशाली कार्यक्षम चपळ आणि दीर्घायुषी अशी होती. त्यांची वृत्ति आणि मुद्रा सर्वदा आनन्दी व प्रसन्न असे. वागणे प्रामाणिक संयत आणि उदार असे होते. भीति हावरेपणा तिरस्कार क्रोध अहंकार आळस हे विकार त्यांच्या मनाला स्पर्श करीत नसत. थकवा आणि रोग यांचे नांवहि त्यांना ठाऊक नव्हते. झोप त्यांच्यावरे मात करीत नसे. सर्वांची वागणूक सरळ व नम्र असे. खोटेपणा व हिंसा कोठेहि आढळत नसे. देवाच्या विषयीं जशी आपण कल्पना करावी तशीच आकृति व वागणूक त्याकाळीं सर्वांची होती. पृथ्वी ही चांगली सुपीक व समृद्ध असून औषधी वनस्पती धान्यें फुले फळें कन्दमुळें उत्तम गुणाची रसवीर्य विपाकप्रभावानी संपन्न अशी होती. असे अगदीं सौम्य स्वरुपाचा अधर्म जो अधिक खाणे त्याचा अवलंब कांहीं लोकामध्यें दिसूं लागला. या अधिक खाण्याचा परिणाम म्हणून शरीराला जडपणा आला. शरीर लठ्ठ दिसूं लागलें (कदाचित् त्यामुळें आपण अधिक भारदस्त दिसतो आहो असा भ्रमहि लोकानी आपल्या मनाशी बाळगला असेल आणि खाणे तसेंच चालू ठेवले असेल) देहाच्या या जडपणामुळें पूर्वीसारखेच श्रम होईनासे झालें. कामानें थकवा येऊं लागला. कामाने थकवा येतो हे लक्षांत आल्यावर आळस वाढूं लागला आळसाचा परिणाम म्हणून काम अधिक अधिक कमी होऊं लागलें. माणसाच्या चतुर बुद्धीनें त्यावर संचयाचा तोडगा काढला. उपभोगाची साधनें सांचवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढूं लागली. त्या साधनांविषयीचा जिव्हाळा वाढून तो पुढे पुढे लोभांत परिणत झाला. लोभामुळें गरज नसतांनाहि वस्तूं-संचय करावा असे वाटूं लागलें. अर्थातच त्यामुळें कोणाला कोणाशी तरी विरोध पत्करण्याची परिस्थिती उत्पन्न झाली. विरोध होईल तितका टाळावा म्हणून माणसे खोटे बोलूं लागली आणि या खोटेपणातून मग काम, क्रोध, अहंकार, द्वेष, कठोरपणा सूडबुद्धि भीति संताप शोक चिन्ता उद्वेग असे अधिकाधिक विकृतभाव माणसाच्या मनांत घर करुन राहिलें. विकृतमनाचा परिणाम होऊन शरीरही तसेच विकृत बनले. औषधीचे व पिकांचे गुणही हीनवीर्य होऊं लागलें आणि स्वस्थवृत्ताचा आदर्श हा जणूं ग्रंथापुरताच मर्यादित राहून माणसे दुबळी रोगी व्यथित जर्जर कुढी हळवी चिडचिडी लोलुप अशी होऊं लागली. जीवन दु:खी झालें. आयुष्य घटूं लागलें. अशारीतीनें कोणत्याही स्वरुपाचे मिथ्याहारविहार हे रोगाचे मूलभूत कारण असल्यानें आयुर्वेदीयानीं रोगकारणांत व रोगोपचारांत आहारविहारावर प्रामुख्यानें भर दिलेला आहे. आणि स्वस्थवृत्ताच्या आदर्शाप्रमाणें जगावयाचे असल्यास त्याचा अवलंब करणे आजही आवश्यक आहे.
जनपदोध्वंसनीय व्याधीवरील उपचार यासाठीच चरकाचार्यानीं सामान्यांना कल्पना येईल त्यापेक्षां वेगळे सांगितले आहेत.
चतुर्ष्वपि तु दुष्टेषु कालान्तेषु यदा नर: ।
भेषजेनोपपाद्यन्ते न भवन्त्यातुरास्तदा ॥
येषां न मृत्युसामान्यं सामान्यं न च कर्मणाम् ।
कर्म पञ्चविधं तेषां भेषजं परमुच्यते ॥
रसायनानां विधिवच्चोपयोग: प्रशस्यते ।
शस्यते देहवृत्तिश्च भेषजै: पूर्वमुद्धृतै: ॥
सत्यं भूते दया दानं बलयो देवतार्चनम् ।
सद्वृत्तस्यानुवृत्तिश्च प्रशमो गुप्तिरात्मन: ॥
हितं जनपदानां च शिवानामुसेवनम् ।
सेवनं धर्मशास्त्राणां महर्षीणां जितात्मनाम् ॥
धार्मिकै: सात्विकैर्नित्यं सहास्या वृद्धसंभतै: ।
इत्येतद्भेषजं पोक्तमायुष: परिपालनम् ॥
येषामनियतो मृत्युस्तस्मिन् काले सुदारुणे ।
च. वि. ३-१६ ते २२ पान ५०८
साथीच्या रोगामध्यें सुद्धां चांगल्या वागणुकीमुळें व्यक्तीला निरोगी रहाता येणें शक्य असतें. पंचकर्मोपचारानें शरीर शुद्ध ठेवणे. रसायनोपचारानें धातूंचे बल चांगले राखणे. आपल्या प्रकृतीचा व दोषांचा विचार करुन औषधांचा उपयोग करणें व आहार घेणे, स्वत:च्या शरीराचे सर्व दृष्टीनें रक्षण करणे, दूषित जल, वायु, देश, काल आणि रुग्णाशी गात्रस्पर्श, रुग्णाची वस्त्रे प्रावरणे भांडी यांचा उपयोग, रोग्याच्या उच्छ्वासाशी आपल्या श्वासाचा संबंध, रोग्याशी एकशय्या असणे - या रोगांचे संक्रमण करणार्या गोष्टीचा परित्याग करावा सदाचारानें व संयमानें वागावें. रोगग्रस्त प्रदेश टाकून निरोगी प्रदेशांत स्थलांतर करावे. खाणे, पिणे, बोलणे, वागणे हे सात्विक ठेवावे. सात्त्विकांच्या संगतीत राहावें. या नियमाचे पालन केले असतां शरीर व मन प्रसन्न रहाते आणि व्याधीचा प्रतिकार करतां येतों. साथीचे रोग एकदा सुरु झाले म्हणजे मग यातील कांहीं गोष्टीचा उपयोग होतो असे नसून या गोष्टी नेहमीच आचरणांत असलेला मनुष्य साथीला सहसा बळी पडत नाही हे लक्षांत ठेवावें. अर्थात अहितदेशत्याग आणि रोगसंक्रामक परिहार हे नियम त्याला त्यावेळीहि उपयोगी पडणारे आहीत. जनपदोध्वंसक रोग ज्या स्वरुपांत व्यक्त होतील त्या स्वरुपांत त्यांची चिकित्सा करावी. त्यांची दोषदूष्ये सर्व सामान्य व्याधीप्रमाणेच असतांत. रसवह स्त्रोतस हे सर्वच व्याधीचे मूलस्थान असल्यामुळें विशिष्ट व्याधीनिरपेक्ष जनपदोध्वंसक विकारांचा उल्लेख आम्ही या प्रकरणांत केला आहे. जे रोग संक्रामक कारणानी होतात म्हणून सांगितले आहे. त्यातीलच रोग बहुधा साथीच्या स्वरुपानें आढळतात. ज्वर, विसूचिका, कास, मसूरिका, शीतला, रोमांतिका, नेत्राभिष्यंद कुष्ठ (पामा ददु) स्नायुक, कृमी, बालग्रह, हे व्याधी कांहीं कांही वेळा साथीच्या स्वरुपांत आढळतात.