व्याख्या
पांडुत्व, पांडुरकेपणा, फिकटपणा हें प्रधानलक्षण ज्या व्याधींत रुग्णशरीरावर दिसून येतें त्या व्याधीस पांडुरोग असें म्हणतात.
स कामलापान्किपाण्डुरोग:
कुम्भाह्वयो लाघ [व] रकोऽलसाख्य: ।
विभाष्यते ।
सु. उ. ४४-६ पान ७५
सुश्रतानें कामला, पानकी, पांडुरोग, कुंभाह्वय, लाघरक, अलस, असे पांडुरोगाचे पर्याय म्हणून दिलेले आहेत परंतु प्राचीन ग्रंथांत या नांवानें पांडुची अवस्थांतरें उपद्रव वा स्वतंत्र व्याधी वर्णन केलेले आहेत त्यामुळे पांडुरोगाचे पर्याय म्हणून या संज्ञांचा उल्लेख करणें योग्य नाहीं. टीकाकारानेंही (सु. ३.४४.१० टीका) पर्यायापेक्षां अवस्थांतरें मानण्यास थोडया आडवळणानें संमति दर्शविली आहे.
स्वभाव - दारुण
मार्ग - अभ्यंतर
प्रकार
पाण्डुरोगा: स्मृता: पञ्च वातपित्तकफैस्त्रय: ।
चतुर्थ: सन्निपातेन पञ्चमो भक्षणान्मृद: ॥
मा. नि. पांडु १ पान ११२
वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक आणि मृजन्य असें पांडुरोगाचे पांच प्रकार आहेत. हेतु भेदानें रोगभेद करणें योग्य नसलें तरी चिकित्सावैशिष्टयामुळें या ठिकाणीं मृत्तिकाभक्षणज असा पांडुचा एक पांचवा प्रकार स्वतंत्रपणें मानलेला आहे. सुश्रुतानें मात्र दोषज आणि सान्निपातिक असे चारच प्रकार मानलें आहेत. कायचिकित्सेंतील रोगाचा विस्तार नको म्हणून सुश्रुतानें हा संक्षेप केला असावा असें मत मधुकोशकारानें मांडलें आहे. मृद्भक्षणामुळेंहि शेवटी माती ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणें दोषप्रकोप होतोच म्हणून दोषज वा सान्निपातिक प्रकारांतच मृद्भ क्षणजन्य पांडुचा अंतर्भाव सुश्रतास अभिप्रेत असावा. चरकानें पांडूचें प्रकार पांच असल्यानेंच सांगितलें आहे.
हेतु
क्षाराम्ललवणात्युष्णविरुद्धासात्म्यभोजनात् ।
निष्पावमाषपिण्याकतिलतैलनिषेवणात् ॥
विद्ग्धेऽन्ने दिवास्वप्नाद्व्यायामान्मैथुनात्तथा ।
प्रतिकर्मर्तुवैषम्याद्वेगानां च विधारणात् ॥
कामचिन्ताभयक्रोधशोकोपहतचेतस:
च. चि. १६- ७ ते ९ पान १२१७
क्षार, अम्ल, अतिउष्ण, तीक्ष्ण, विरुद्ध, असात्म्य असें अन्न सेवन केल्यामुळें; शिंबीधान्य (पावटा, उडीद) तिळाची पेंड, तिळाचे तेल असे पदार्थ अधिक खाल्ल्यामुळें, अन्नाचा विदाह झालेला असतांनाहि दिवसां झोपल्यामुळें, व्यायाम, व्यायाम वा मैथुन केल्यामुळें, पंचकर्माचे मिथ्यायोग, ऋतुवैषम्य, वेगविधारण, काम, चिंता, भय, क्रोध, शोक यांनी मन व्याकुळ होणें हीं कारणें पांडुरोगाच्या उत्पत्तीस कारण होतात.
संप्राप्ति
समुदीर्ण यद पित्तं हृदये समवस्थितम् ।
वायुना बलिना क्षिप्तं संप्राप्य धमनीदर्श ॥
प्रपन्नं केवलं देहं त्वड्वांसान्तरमाश्रितम् ।
प्रदूष्य कफवातासृक्तवड्वांसानि करोति तत् ॥
पाण्डुहारिद्रहरितान् वर्णान्बहुविधांस्त्वचि ।
स पाण्डुरोग इत्युक्त: ॥
च. चि. १६-९ते ११ पान १२१७
दोषा: पित्तप्रधानास्तु यस्य कुप्यन्ति धातुषु ।
शैथिल्यं तस्य धातूनां गौरवं चोपजायते ॥
ततो वर्णंबलस्नेहा ये चान्येऽप्योजसो गुणा: ।
व्रजन्ति क्षयमत्यर्थ दोषदूष्यप्रदूषणात् ॥
सोऽल्परक्तोऽल्पमेदस्को नि:सार: शिथिलेन्द्रिय: ।
वैवर्ण्य भजते ।
(च चि. १६-४ ते ६ पान १२१७)
पित्त प्रकुपित होऊन तें रसरक्ताचे आश्रयस्थान जें हृदय त्याचा आश्रय करतें. वायूच्या प्रेरणेनें रसवाहिन्यांतून सर्व शरीर व्यापतें. त्वचा व मांस यांच्या आश्रयानें कफ, वात, रक्त, त्वचा, मांस या शरीरभावांना दुष्ट करुन शरीरावर दोषभेदानुरुप वा अवस्थानुरुप निरनिराळे वर्ण (त्वचेवर) उत्पन्न करते. या वर्णामध्यें पांडुता ही सर्ववर्णसामान्य अशी असते, पांडुवर्ण अधिक प्रमाणांत असतो (पांडुत्व तेषु चाधिकम् । वा. नि. १३.३) म्हणूनच या व्याधीला पांडुरोग असे म्हणतात. पित्तामुळें प्रथमत: रसाची दुष्टी होऊन सर्व धातूंमध्यें शैथिल्य येतें, शरीरांत जडपणा जाणवतो, शरीरांतील वर्ण, बल, स्नेह हे भाव वा ओजाचे स्थिर, मृदु, प्रसन्न इत्यादि गुण नाहींसे होऊ लागतात. पित्ताचा रसधातूवर परिणाम झालेला असल्यामुळें रक्तपोषक अशा रसभागाची विकृती होऊन रक्ताची उत्पत्तीच होत नाहीं, इंद्रियें शिथिल होतात, मेद कमी होत जातो, त्वचा विवर्ण होते. व्याधीचा उद्भव रसवह स्त्रोतसांत होतो, अधिष्ठान रक्तां असतें आणि संचार सर्व शरीरभर विशेषत: हृदय यकृत प्लीहा, त्वचा व मांस या ठिकाणीं असतो. सुश्रुतानें पांडुरोगाच्या संप्राप्तींत ``विदूष्य रक्तं कुर्वति दोषा: त्वचि पांडुभावम् ।'' असें म्हणून रक्तदुष्टीचा प्रामुख्यानें उल्लेख केला आहे. त्यामुळें पांडूच्या सामान्यसंप्राप्तींतील दोष जरी पित्त हा असला तरी दूष्य कोणते, रस कीं रक्त, अशी शंका उत्पन्न होणें स्वाभाविक आहे. रसदुष्टीच्या प्रकरणांत सुश्रुतानेंहि स्पष्टपणें चरकाप्रमाणेंच पांडुरोग उल्लेखिलेला आहे. रसदुष्टीच्या प्रकरणांत सुश्रुतानेंहि स्पष्टपणें चरकाप्रमाणेंच पांडुरोग उल्लेखिलेला आहे. (सु. सू. २४,९) त्यामुळें पांडुरोगाच्या सामान्य संप्राप्तींत दूष्य म्हणून रसधातूच मानावा आणि रसदुष्टीचा परिणाम रक्तक्षयांत होतो असें समजावें. सुश्रुताचा रक्तस्त्रावोत्पन्न पांडूशी संबंध वरचेवर येत असावा, कारण तो शस्त्रवैद्य होता आणि म्हणून त्यानें रक्ताचा उल्लेख केला असावा; असें मात्र नाहीं कारण सुश्रुताचें वचन व्यवायादि निज कारणानें उत्पन्न होणार्या पांडुरोगाचेंच आहे हें स्पष्ट दिसतें. चिकित्सेमध्यें रक्तधातूच्या दृष्टीनें विशेषचिकित्सा करावी लागत असल्यानें संप्राप्तीमध्यें सुश्रुतानें व्यवहारोपयोगी दृष्टीनें रक्ताला महत्व दिलें असावें. रस व रक्त हे समान अधिष्ठानाचे असल्यानें या उल्लेखामुळें रसदुष्टीचें महत्व बाधित होतें असें मानावयाचें कारण नाहीं.
पूर्वरुपें
प्रागूपमस्य हृदयस्पन्दनं रुक्षता त्वचि ।
अरुचि: पीतमूत्रत्वं स्वेदाभावोऽल्पवह्निता ।
साद:श्रम: ।
वा. नि. १३-८ पान ५१८
त्वक्स्फोटान् ष्टीवनगात्रसादौ मृद्भक्षणं प्रेक्षणकूटशोथ: ।
विण्मूत्रपीतत्वमथाविपाको भविष्यतस्तस्य पुर:सराणि ॥
सु. उ. ४४-५ पान ७२९
पिपासारुचिहृल्लासैरुरोदाहोऽड्गगौरवम् ।
रक्तलोचनता तस्य पूर्वरुपस्य लक्षणम् ॥
वंगसेन पांडु पान १९५
पांडुरोगाच्या पूर्वरुपामध्यें हृत्स्पंद (छातींत धडधडणें), रुक्षता, अक्षिकूटशोथ, वरचेवर थुंकावेसें वाटणें, अरुचि, अग्निमांद्य, अविपाक, अंगसाद, श्रम त्वचा रुक्ष होणें, मलमूत्रांना अल्प पीतत्व येणें अशीं लक्षणें दिसतात.
रुपें
तेन गौरवम् ।
धातूनां स्याच्च शैथिल्यभोजसश्च गुणक्षय: ॥
ततोऽल्परक्तमेदस्को नि:सार: स्याच्छ्लथेन्द्रिय: ।
मृद्यमानिअरिवाड्गैर्ना द्रवता हृदयेन च ॥
शूनाक्षिकूट: सदन: कोपन: ष्टीवनोऽल्पवाक् ।
अन्नद्विद शिशिरद्वेषी शीर्णरोमा हतानल: ॥
सन्नसक्थो ज्वरी श्वासो कर्णक्ष्वेडी भ्रमी श्रमी ।
वा. नि. १३- ४ते ६ पान ५१८
संभूतेऽस्मिन् भवेत सर्व: कर्णक्ष्वेडी हतानल: ।
दुर्बल: सदनोऽन्नद्विट् श्रमभ्रमनिपीडित: ॥
गात्रशूलज्वरश्वासगौरवारुचिमान्नर: ।
मृदितैरिव गात्रैश्च पीडितोन्मथितैरिव ॥
शूनाक्षिकूटो हरित: शीर्णलोमा हतप्रभ:
कोपन: शिशिरद्वेषी निद्रालु: ष्ठीवनोऽल्पवाक् ॥
पिण्डिकोद्वेष्टकट्यूरुपादरुक्सदनानि च ।
भवन्त्यारोहणायासैर्विशेषश्चास्य वक्ष्यते ॥
च. चि. १६-१३ ते १६ पान १२१८
पांडूच्या सामान्यरुपांत अक्षिकूटशोथ, हृत्स्पंद, रुक्षता, नख, नेत्र, त्वचा, ओष्ठ, तालू यांचे ठिकाणीं पांडुता, कानांत आवाज होणें, अग्नि मंद होणें, दौर्बल्य, अंग गळून गेल्यासारखें वाटणें, अन्नद्वेष, श्रम, भ्रम, ज्वर, श्वास, गौरव अरुचि, शरीर ठेचले गेल्याप्रमाणें वेदना, पिडिकोद्वेष्ट, कंबर, मांडया, पाय गळून जाणें व त्या ठिकाणीं वेदना होणें, चढणें श्रमाचें वाटणें [चढण्याच्या श्रमानें मांडया, पाय गळून जाणें, भरुन येणें], केस गळणें, निस्तेजपणा येणें, हृदय द्रवणें [पातळ होऊन आकारानें मोठें होणें] अशीं लक्षणें दिसतात. रोगीं त्रासिक व चिडचिडा होतो. त्याला थंडी नकोशी होते, झोंप येते, फार बोलूं नयेसें वाटतें.
वातज पांडु
आहारैरुपचारैश्च वातलै: कुपितोऽनिल: ।
जनयेत्कृष्णपाण्डुत्वं तथा रुक्षारुणाड्गताम् ॥
अड्गमर्दरुजं तोदं कम्पं पार्श्वशिरोरुजम् ।
वर्च: शोषास्यवैरस्यशोफानाहबलक्षयान् ॥
च. चि. १६-१७, १८ पान १२१८
वातकर आहारविहारांनी वायू प्रकुपित होऊन पांडुरोग उत्पन्न होतो. या प्रकारामध्यें त्वचा, वदन, नेत्र, नख, मूत्र, पुरीष यांचा वर्ण श्याव, कृष्ण, अरुण यांच्या छटांनीं युक्त असा पांडुर असतो. त्वचा अधिक रुक्ष होते. रुजा, तोद, अंगमर्द, कंप, पार्श्वशूल, शिर:शूल, पुरीष शुष्क होणें, मुखवैरस्य, शोथ, आनाह, बलक्षय अशीं लक्षणें असतात. सुश्रुतानें `युक्तं तथाऽन्यैस्तदुपद्रवैश्च ।' (सु. उ. ४४,७) असें म्हणून वाताच्या इतर लक्षणांचाही समावेश यांत करावा असें सांगितलें आहे.
पित्तज पांडु
पित्तलस्याचितं पित्तं यथोक्ते: स्वै: प्रकोपणै: ।
दूषयित्वा तु रक्तादीन पाण्डुरोगाय कल्पते ॥
स पीतो हरिताभो वा ज्वरदाहसमन्वित: ।
तृष्णामूर्छापिपासार्त: पीतमूत्रशकृन्नर: ॥
स्वेदन: शीतकामश्च न चान्नमभिनन्दति ।
कटुकास्यो न चास्यौष्णमुपशेतेऽम्लमेव च ॥
उद्गारोऽम्लौ विदाहश्च विदग्धेऽन्नेऽस्य जायते ।
दौर्गन्ध्यं भिन्नवर्चस्त्वं दौर्बल्यं तम एव च ॥
च. चि. १६-१९ ते २२ पान १२१८-१९
पित्तकर आहार विहारानें प्रकुपित झालेलें पित्त रक्तादीनां दुष्ट करुन पांडुरोग उत्पन्न करतें. या प्रकारच्या पांडुतेंत पिवळट हिरवट छटा दिसते. नख, नेत्र, मूत्र, त्वचा इत्यादींचा वर्ण पिवळसर असतो. ज्वर, दाह, तृष्णा, मूर्च्छा, पिपासा, स्वेद, शीतेच्छा, कटुकास्यता, अम्लोद्गार, विदाह, दुर्गंधी द्रवमल प्रवृत्ति, दौर्बल्य, तम [अंधारी येणे] ही लक्षणें असतात. विदाह हें लक्षण अन्नाच्या विदग्धावस्थेनें उत्पन्न होतें. आंबट व उष्ण पदार्थ रोग्यास सोसत नाहींत. हारीतानें आम उत्पन्न होणें [अन्न न पचणें] कोरड पडणें, मोह आणि शोथ अशीं लक्षणें सांगितली आहेत [हारीत तृतीयस्थान ८ पृ. २५८.
कफज पांडु
विवृद्ध श्लेष्मलै: श्लेष्मा पाण्डुरोगं स पूर्ववत् ।
करोति गौरवं तन्द्रां छर्दि श्वेतावभासताम् ॥
प्रसेकं लोमहर्षं च सादं मूर्च्छा भ्रमं क्लमम् ।
श्वासं कासं तथाऽऽलस्यमरुचिं वाक्स्वरग्रहम् ॥
शुक्लमुत्राक्षिवर्चस्त्वं कटुरुक्षोष्णकामताम् ।
श्वयथुं मधुरास्यत्वमिति पाण्डुवामय: कफात् ॥
च. चि. १६-२३ ते पान १२१९
कफकर आहारविहारांनी प्रकुपित झालेला कफ पांडुरोग उत्पन्न करतो या प्रकारामध्ये जडपणा, मंदता, छर्दि, प्रसेक रोमहर्ष, गात्रसाद, मूर्च्छा, भ्रम, क्लम, श्वास, कास, आलस्य, अरुचि, वाग्रह, शोथ, मधुरास्यत्व अशीं लक्षणें असतात. त्वचेचा वर्ण अधिक पांढरा असतो. नख, मूत्र, मल यांचा वण श्वेत असतो. रुग्णाला तिखट, रुक्ष, उष्ण असे पदार्थ खावेसे वाटतात.
सान्निपातिक पांडु
सर्वान्नसेविन: सर्वे दुष्टा दोषास्त्रिदोषजम।
त्रिदोषलिड्गं कुर्वन्ति पाण्डुरोगं सुदु:सहम् ॥
च. चि. १६-२६ पान १२१९
तन्द्रालस्यं श्वयथुवमथू कासह्रुल्लासशोषा।
विष्ठाभेद: परुषनयने सज्वरो वै क्षुधार्त्त:॥
मोह्स्तृष्णाक्लममय नरस्याशु पश्येत्सुदूरं।
त्याज्यो वैद्दैर्निपुणमतिभि: सन्निपातोत्थपाण्डु:॥
हारित पान २५९
सर्व प्रकारच्या मिथ्याहार विहारानें प्रकुपित झालेले दोष सन्निपातज पांडु उत्पन्न करतात. त्यामध्यें तीनही दोषांची लक्षणें दिसतात. तंद्रा, आलस्य, शोथ, छर्दि, कास,ह्रुल्लास, शोष, द्रवमलप्रवृत्ति, नेत्ररुक्षता, ज्वर, क्षुधा, मोह, तृष्णा क्लम अशीं लक्षणें असतात.
मृज्जन्य पांडु
मृत्तिकादशनशीलस्य कुपत्यन्यतमो मल: ।
कषाया मारुतं, पित्तमूषरा, मधुरा कफम् ॥
कोपयेन्मृद्रसादींश्र्व रौकाक्ष्यादभुक्तं विरुक्षयेत् ।
पूरयत्यविपक्वैव स्त्रोतांसि निरुणद्धि च ॥
इन्द्रियाणां बलं हत्वा तेजो वीर्योजसी तथा ।
पाण्डुरोगं करोत्याशु बलवर्णाग्निनाशम् ॥
शूनगण्डाक्षिकूटभ्रु: शूनपान्नाभिमेहन: ।
क्लिमिकोष्ठोऽतिसार्येत मलं सासृक् कफान्वितम् ॥
च. चि. १६-२७ ते ३० पान १२१९-२०
...... विदेहे तु पठ्यते - `मृद्भक्षणाद्भवेत् पाण्डुस्तन्द्रालस्य-
निपीडित: । सश्वासकासशोषार्श: सांदारुचिसमन्वित: ।
शूनपादाननकर: कृष्णाड्ग: कृशपावक:'' इति ।
मा. नि. पांडु ११ - म. टीका पान ११५
नेहमी माती खाणार्या व्यक्तीमध्यें (बालकें व अडाणी स्त्रिया यामध्यें माती खाण्याची संवय फार असते) माती तुरट, खारट, मधुर रसाची असेल त्याप्रमाणें वात, पित्त, कफ या दोषांचा अनुक्रमें प्रकोप होतो. माती ही आपल्या रुक्ष गुणानें आहाररसाचेंहि रुक्षण करते आणि त्या आम आहाररसाबरोबर स्त्रोतसामध्यें शिरुन स्त्रोतोरोध उत्पन्न करते. इंद्रियांचें बल कमी होतें. शरीराचे तेज, वीर्य, ओज नाहीसे होतात. बल, वर्ण, अग्नि यांचा नाश होतो, आणि पांडुरोग उत्पन्न होतो. या प्रकारामध्यें अक्षिकूट, गंडप्रदेश यावर असणारी सूज अधिक प्रमाणांत असते. पाय, नाभी, शिस्न (उपस्थ) हींहि सुजतात. मलप्रवृत्ति कफयुक्त, रक्तयुक्त आणि द्रव अशी होतें. उदरामध्यें कृमीहि होतात. कांहीं लोक हीं लक्षणें मृजन्य पांडूची न मानतां पांडुरोगाची एक विशेष अवस्था मानतात. तें योग्य वाटत नाहीं. कृमिकोष्ठ या पदावरुन आणि कृमीच्या कारणांतील मृद्भक्षण विचारांत घेऊन हें वर्णन मृजन्य पांडूचेंच आहे असें मानणें अनुभवास धरुन होईल.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
हृद्रोग, गुल्म, अर्श, प्लीहावृद्धि, श्वास, कास, मूढवात
(च.चि.१६-४५, ४६)
रक्तपित्त, ज्वर, दाह, शोथ, भगंदर, अर्श, असृग्दर (प्रदर).
(च. चि. १६-४९)
हृद्रोग, कुष्ठ, अर्श. कामला (च. चि. १६-७१).
कास, यक्ष्मा, विषमज्वर, अजीर्ण, प्रमेह, शोष, अपस्मार
(च.चि.१६-८६)
ग्रहणी, शोथ, मूत्रकृच्छ्र, अश्मरी, प्रमेह, कामला (च.चि. १६-११०)
ज्व्र, विस्फोट, शोथ (वंगसेन).
कर्णदोष, दृष्टिदोष, वातरक्त, रक्तीपत्त, शूल, गलरोग (वंगसेन २००)
उरुस्तंभ, कृमी, उदर, हलीमक (यो. र. पृ. २९३)
वृद्धि, स्थान, क्षय
त्वचा निस्तेज होत जाणें, पांडुता वाढणें (नखनेत्रांदींची). शोथ, दौर्बल्य वाढणें हीं पांडुरोग वाढत असल्याची लक्षणें आहेत. त्वचेची कांती वर्ण प्रकृत होऊं लागणें, हालचालीनंतर विशेषत: चढल्यानंतर दम न लागणें, हृत्स्पंद न होणें, शोथ नाहींसा होणें या लक्षणांनीं पांडुरोग कमी होतो आहे असें समजावें.
उपद्रवास्तेष्वरुचि: पिपासा
छर्दिर्ज्वरो मूर्धरुजाऽग्निसाद: ।
शोकस्तथा कण्ठगतोऽबलत्वं
मूर्च्छा क्लमो हृद्यवपीडनं च ॥
सु. उ. ४४-१३ पान ७३०
उपद्रव
अरुचि, तृष्णा, छर्दि; ज्वर, शिर:शूल, अग्निमांद्य, शोथ, दौर्बल्य, मूर्च्छा, क्लम, हृद्रोग, घसा सुजणें हे विकार पांडुरोगामध्यें उपद्रव म्हणून होतात. हृद्विकार, अग्निमांद्य, शिर:शूल, कर्णनाद, कामला.
व्याधिमुक्तीची लक्षणें
पांडुता, दौर्बल्य, श्रम, हृदय, हीं लक्षणें नष्ट होणें, त्वचेची कांति पूर्वीसारखी होणें, नख, नेत्र, टाळु व जिव्हा हे स्वभावत: आरक्तवर्ण असलेले अवयव पुन: पूर्वीसारखे दिसूं लागणें व उत्साह वाटणें हीं व्याधिमुक्त झाल्याची लक्षणें समजावीत.
साध्यासाध्यत्व
पाण्डुरोगश्चिरोत्पन्न: खरीभूतो न सिध्यति ।
कालाप्रकर्षाच्छूनानां यो वा पीतानि पश्यति ॥
बद्धाल्पविट् सहरितं सकफं योऽतिसार्यते ।
दीन: श्वेतातिदिग्धाड्गश्छर्दिमूर्छातृडर्दित: ॥
स नास्त्यसृक्क्षयाद्यश्च पाण्डु: श्वेतत्वमाप्नुयात् ।
पाण्डुसंघातदर्शी च पाण्डुरोगी विनश्यति ॥
अन्तेषु शूनं परिहीणमध्यं म्लानं तथाऽन्तेषु च मध्यशूनम् ।
गुदे च शेफस्यथ मुष्कयोश्च शूनं प्रताम्यन्तमसंज्ञकल्पम् ॥
विवर्जयेत्पाण्डुकिनं यशोऽर्थी तथाऽतिसारज्वरपीडितं च ।
मा. नि. पांडु १२ ते १५ पान ११५
पांडुरोग उत्पन्न होऊन फार दिवस झाले असल्यास तो गंभीर झाला असल्यास असाध्य होतो. सर्वांगावर शोथ येणें आणि सर्व वस्तू पिवळ्या दिसूं लागणें हें असाध्यतेचें द्योतक आहे. मलप्रवृत्ती द्रव, कफयुक्त, हिरवट रंगाची व थोडी थोडी थांबून थांबून होणें, दीनता येणें, त्वचा अत्यंत पांढरी फटक होणें, छर्दि, मूर्च्छा, हीं लक्षणें असणें, रक्तक्षय अतिशय झाल्यामुळें पांडुता श्वेतता येणें अशा स्थितींत रोग जगत नाहीं. दांत, नखें, डोळे पांढरे होणें आणि सगळीकडे पांढरेच दिसणें हीं लक्षणें असाध्यतेची आहेत. हातपाय सुजलेले असणें पण कोष्ठावर सूज नसणें किंवा कोष्ठांगावर सूज असून हातपाय कृश असणें; गुद, शिस्न, वृषण यांवर सूज असणें, अंधारी येणें मूर्च्छित होणें, ज्वर व अतिसार असणें या लक्षंणांनी युक्त पांडुरोग्याची चिकित्सा यशस्वी होत नाहीं.
रिष्ट लक्षणें
पांडुरोगं श्वयथुमान् पीताक्षिनखदर्शन: । व. शा. ५. ९१
सर्वांगावर पुष्कळ प्रमाणांत सूज येणें, नखनेत्र पिवळे दिसूम लागणें हीं लक्षणें पांडुरोगाची मारकता सूचवितात.
चिकित्सा सूत्रें
तत्र पाण्ड्वामयी स्निग्धस्तीक्ष्णैरुर्ध्वानुलोमिकै: ।
संशोध्या मृदुभिस्तिक्तै: कामली तु विरेचनै: ॥
ताभ्यां संशुद्धकोष्ठाभ्यां पथ्यान्यन्नानि दापयेत् ।
शालीन् सयवगोधूमान् पुराणान् यूषसंहितान् ॥
मुद्गाढकीमसूरैश्च जाड्गलैश्च रसैर्हितै: ।
यथादोषं विशिष्टं च तयोर्भैषज्यमाचरेत् ॥
पञ्चगव्यं महातिक्तं कल्याणकमथापि वा ।
स्नेहनार्थ घृतं दद्यात्कामलापाण्डुरोगिणे ॥
च. चि. १६-४० ते ४३ पान १२२१-२२
साध्यं च पाण्ड्वामयिनं समीक्ष्य स्निग्धं घृतेनोर्ध्वमधश्च
शुद्धम् ।
सम्पादयेत्क्षौद्रघृतप्रगाढैर्हरीतकीलोहरज:प्रयोगै: ॥
यो. र. पान १४१
हरेश्च दोषान् बहुशोऽल्पमात्रान् ।
श्वयेद्धि दोषेष्वतिनिर्हृतेषु ॥
सु. उ. ४४-१८ पान ७३१
यथादोषं प्रकुर्वीत भैषज्यं पाण्डुरोगिणाम् ।
क्रियाविशेष एषोऽस्य मतो हेतुविशेषत: ॥
च. चि. १६-१२३
वातिके स्नेहभूयिष्टं पैत्तिके तिक्तशीतलम् ।
श्लैष्मिके कटुतिक्तोष्ण विमिश्रं सान्निपातिके ॥
च. चि. १६-११६
पांडुरोगामध्यें प्रथमत: स्नेहन देऊन मग बलाबल असेल त्याप्रमाणें तीक्ष्ण अशी वमन विरेचन द्रव्यें वापरावीत. कोष्ठ शुद्ध झाल्यानंतर पुराणशाली, गोधूम, यूष, जांगलमांस असा हितकर आहार वापरावा. स्नेहनासाठीं पंचगव्यवृत, महातिक्तकधृत किंवा कल्याणघृत वापरावें. लोहभस्म हें गोमूत्र व हरीतकीक्वाथभावित वापरावें. पांडुरोगामध्यें दोषशोधन हें थोड्या थोड्या प्रमाणांत पण वरचेवर करावें. अधिक प्रमाणांत एकदम दोषांचे शोधन झाल्यास शोथ येण्याची भीति असते. पांडुरोगावर स्नेहन, रक्तवर्धक व अग्निदीपन अशी चिकित्सा करावी. पांडुरोगामध्यें दोष लक्षणें वा अवस्था असतील त्याप्रमाणें चिकित्सा करावी. वातप्राधान्य असतांना स्नेहप्रधान, पित्तासाठीं तिक्तरसात्मक व शीतवीर्य आणि कफप्रकोपासाठीं कटुतिक्तरसात्मक व उष्णवीर्य अशा द्रव्यांनीं चिकित्सा करावी.
निपातयेच्छरीरात्तु मृत्तिकां भक्षितां भिषक् ।
युक्तिज्ञ: शोधनैस्तीक्षणै: प्रसमीक्ष्य बलाबलम् ॥
शुद्धकायस्य सर्पीषि बलाधानानि योजयेत् ।
व्योषं बिल्वं हरिद्रे द्वे त्रिफला द्वे पुनर्नवे ॥
च. चि. १६-११८ पान १२३०
मृद्भक्षणामुळें शरीरांत झालेला उपलेप नाहींसा करण्यासाठीं शोधनद्रव्यें वापरावीत. तीं तीक्ष्ण असावींत कां मृदु असावींत हें बलाबल पाहून ठरवावें. शरीर शुद्ध झाल्यानंतर बलवर्धक अशी सिद्धघृतें वापरावींत.
श्वासातिसारारुचिकासमूर्च्छा
तृद्छर्दिशूलज्वरशोफदाहान् ।
तथाऽविपाकस्वरभेदसादान्
जयेद्यथास्वं प्रसमीक्ष्य शास्त्रम् ॥
सु. उ. ४४-३८ पान ७३३
पांडुमध्यें श्वास, अतिसार, अरुचि, कास, मूर्च्छा, तृषा, छर्दि, शूल, ज्वर, शोथ, दाह, अविपाक, स्वरभेद, गात्रसाद हे विकार उत्पन्न झाले असल्यास शास्त्राप्रमाणें त्यावर यथायोग्यरीतीनें उपचार करावेत.
कल्प
दाडिम, आमलकी, फालसा, द्राक्षा, करवंद, आंबा [कलमी], गोदुग्ध, घृत, गुडूचि, शतावरीं, काडेचिराईत, अश्वगंधा, लोह, अभ्रक, ताम्र, सुवर्ण, माक्षिक, वंग यांची भस्में, मुक्तापिष्टी, यकृत्रस. आरोग्यवर्धिनी, सूतशेखर, योगराज, ताप्यादि लोह, नवायसचूर्ण, नवजीवन लक्ष्मीविलास, लोहपर्पटी, लोहासव, द्राक्षासव, दशमूलारिष्ट, यकृतप्राश.
यवगोधूमशाल्यन्नं रसैर्जाड्गलजै: शुभै: ।
मुद्गाढकीमसूराद्यै: पाण्डौ भोजनमिष्यते ॥
यो. र. पान २९८
वह्निमातपमायासमन्नपानं च पित्तलम् ।
मैथुनं क्रोधमध्वानं पाण्डुरोगी सदा त्यजेत् ॥
यो. र. पान २९८
अन्न
फलरस, यूष; जीर्ण शाली, पुराण गोधूम, जांगलमांस, यकृतरस.
विहार
श्रम, धावणें, चढणें वर्ज्य करावे.
अपथ्य
पित्तकर, अन्न, अग्निसेवन [उन्हांत हिंडणें], व्यायाम करणें, श्रम करणें, चालणें, रागावणें, मैथुन या गोष्टी वर्ज्य कराव्यात.