धातूचें स्वरुप व कर्म
`तासां प्रथमा मांसधरा नाम; यस्यां मांससिरास्नायु-
धमनीस्त्रोतसां प्रताना भवन्ति ॥८॥
सु. शा. ४-८ पान ३५५
मांसं शरीरपुष्टिं मेदसश्च ।
सु.सू. १५-४
लेप: (मांसस्य श्रेष्ठं कर्म)
वा. सू. ११-४
मांसस्य बलं मेद:पुष्टिं च ।
वा. सू. ११-४ टीका
मला: खेषु (मांसमला:)
वा. शा. ३-६१
आहाररसापासून मांसधातू हा रक्तानंतर उत्पन्न होतो. सर्व शरीरांत असलेली पुष्टि, शरीराच्या अवयवांना प्राप्त होणारा घाट, डौल हें मासांवर अवलंबून आहे म्हणूनच उपलेप हें मांसाचें महत्वाचें कर्म मानलें आहे. शरीरांतील सिरा, स्नायू, स्त्रोतसें, हे सर्व अवयव मांसानेंच बनलेले आहेत. मांस हें त्यांचे घटकद्रव्य आहे. शरीराचें बल राखणें व मेदाची पुष्टी ही मुख्यत: मांसावरच अवलंबून असते. नाक, कान, जननेंद्रिय, यांवरील मल यांना मांसमल असें म्हणतात.
स्त्रोतस् -
मांसवहानां स्त्रोतसां स्नायुमूलं त्वक् च ।
च. वि. ५-१२
रुक्तवहाश्च धमन्य: ।
सु. शा. ९-१२
स्नायु, त्वचा व रक्ताचें वहन करणार्या सिरा या मांसवह स्त्रोतसाचें मूल आहेत.
विद्ध लक्षणें -
तत्र विद्धस्य श्वयथुर्मासशोष: सिराग्रंथयो मरणं च ।
सु. शा. ९-१२ पान ३८६
मांसवह स्त्रोतसाचा वेध झाला असतां सूज येणें, सिरामध्यें ग्रंथी होणें, मृत्यु अशीं लक्षणें होतात.
मांससारता --
`शंखललाटकृकाटिकाक्षिगण्डहनुग्रीवास्कन्धोदरकक्षवक्ष:-
पाणिपादनसन्धय: स्थिरगुरुशुभमांसोपचिता मांस-
साराणाम् । सा सारता क्षमां धृतिमलौल्यं वित्तं
विद्यां सुखमार्जवमारोग्यं बलमायुश्च दीर्घमाचष्टे ॥१०५॥
च. वि. ८ -- १०७ पान ५८४
मांसाहार पुरुषांतील मांसधातू उत्तम प्रकारें परिपुष्ट व बलवान् असतो. त्यामुळें त्याचीं कानशिलें कपाळ, गाल, हनुवटी, मान, खांदे, उदर, कक्षा, वक्षस्थल, हात पाय व सांधे पुष्ट, मांसानीं झांकल्यासारखे, डौलदार, वजनदार आणि स्थिर निरोगी असे असतात. या सारतेमुळें व्यक्ति धैर्यवान् निर्लोभी, श्रीमंत, विद्वान्, सुखी, सरळ, आरोग्यसंपन्न, बलवान् आणि दीर्घायुषी असते.
स्त्रोतोदुष्टीचीं कारणें --
`अभिष्यंदीनि भोज्यानि स्थूलानिच गुरुणि च ।
मांसवाहीनि दुष्यन्ति भुक्त्वा च स्वपतां दिवा ॥१५॥
च. वि. ५--२३ पान ५२८
अभिष्यंदी पदार्थ, मीठ, दही, पचावयास जड अशीं द्रव्यें खाणें वा जड पदार्थ पुष्कळ प्रमाणांत खाणें, जेवल्यानंतर दिवसा झोंपणें, या कारणांनीं मांसवह स्त्रोतस् दुष्ट होतें.
मांसक्षयाचीं लक्षणें --
मांसक्षय झाला असतांना गाल, ओठ, नितंबभाग, उपस्थ, मांडया, छाती, पोटर्या, पोट, मान हे अवयव शुष्क होतात, बारीक होतात. सर्व शरीरांत रुक्षता वाढते. टोंचल्यासारख्या वेदना होतात. सिरा शिथील होतात. सांधे दुखतात. अवयवांना ग्लानी येते.
[च. सू. १७-६५ सु. सू. १५-१३, वा. सू. ११-१८]
मांसक्षयेति कृशता चेष्टनं अंगभंगता ।
निद्रानाशोऽतिनिद्रास्य विसंज्ञो लघुविक्रम: ॥
हारित तृतीय ९ पान ६७
मांसक्षयामध्यें अत्यंत कृशता, चमका येणें, अंग मोडणें, झोप न येणें वा फार झोप येणें, मूर्च्छा येणें, बल व उत्साह कमी होणें, ही लक्षणें असतात. डल्हणानें मांसक्षयामुळें स्थूल पदार्थ व मांस खाण्याची इच्छा होते, विशेषत: हिंस्त्र प्राण्यांचें मांस खाण्याची इच्छा होते असें म्हटलें आहे.
(सु. सू. १७-३५ टीका)
मांसवृद्धीचीं लक्षणें --
`मांसं स्फिग्गण्डौष्ठोषस्थोरुबाहु जड्घासु वृद्धिं गुरुगात्रतां च ॥
सु. सू. १५-१४ पान ७०
मांसवृद्धीमध्यें नितंब, गाल, ओठ, जननेंद्रिय, दंड, मांडया, स्तन यांचे आकार बेडौलपणानें मोठे होतात, शरीर जड वाटतें.
स्त्रोतोदुष्टीचीं लक्षणें --
``अधिमांसार्बुदं कीलं गलशालूकशुण्डिके ।
पूतिमांससंघातौष्ठप्रकोपगलगण्डमालाप्रभृतयो
मांसदोषजा: ॥
सु. सू. २४-९ पान ११६
मांस वाढणें, मांसाचे गोळे बनल्यासारखे होणें, अर्बुद, मांसकील, गलशालूक (गिलायू), गलशुंडीका, पूतिमांस, अर्श अलजी, गलगण्ड, गण्डमाला, उपजिहिका, ओष्टप्रकोप असे विकार मांसदुष्टीमुळें होतात.