स्वरुप
अस्थि हा शरीरांतील इतर सर्वधातूंच्या मानानें अधिक स्थिर व अधिक कठिण असा धातू आहे. याची उत्पत्ती मेदानंतर आहाररसापासून होते. इतर धातंतील क्षय वृद्धी जशी त्वरित व स्पष्टपणें प्रत्ययाला येते तशी स्थिर व कठीण गुणामुळें अस्थि धातूंत दिसत नसली तरी अस्थिधातूचीही भरण-पोषण-क्षरणादिक्रिया इतर धातूप्रमाणेंच होत असते म्हणून इतर धातूप्रमाणेच अस्थिधातूच्या स्त्रोतसाचें वर्णन केलें आहे.
अस्थिवहानां स्त्रोतसां मेदोमूलं जघनं च
च. वि. ५-१२.
अस्थिवह स्त्रोतसांचें मूल मेद हा धातू व जघन हा शरीरातील विशिष्ट भाग यांच्यामध्ये असतें. शरीराचें स्थैर्य नितंब प्रदेशांतील अस्थिच्या प्रकृत व स्थिर अशा संघटनेवर विशेष करुन अवलंबून असल्यामुळे जघनास अस्थिवहस्त्रोतसाचें मूलाधार म्हटलें आहे. तसेंच अस्थीच्या आहे. तसेंच अस्थीच्या भोवतीं प्रकृत स्वरुपांत असलेल्या मेदाचा अस्थीच्या पोषणाशीं निकटचा संबंध असावा असें अस्थिवह स्त्रोतसाला मेदोमूल म्हणण्यांत दिसून येतें.
श्लेषक कफ
(१) संधिस्थ: श्लेष्मा, सर्वसंधिसंश्लेषात् सर्वसंध्यनुग्रहं
करोति ।
संधीच्या मध्यें राहून संधिनिर्मितीस कारणीभूत होणार्या अवयवांना एकत्र ठेवणें आणि संधीमध्यें होणारी हालचाल घर्षणानें पीडाकर न होऊं हें कार्य श्लेषक कफाचें आहे, असें अनुग्रह ह्या शब्दानें स्पष्ट होतें. हालचाल व घर्षण या दृष्टीनें अस्थि-संधी मध्यें श्लेषक कफ सुस्थिर व कार्यक्षम राखतो. त्यामुळें अस्थिव्यतिरिक्त इतर शरीरांतही श्लेषक कफाचें कार्य महत्वपूर्ण आहे.
अस्थि देहधारणं मज्ज्ञ: पुष्टिंच
सु. सु. १७/७
शरीराचें धारण करणें, शरीराच्या आकाराला सांगाडयासारखा आधार पुरवणें आणि मज्जा या धातूची पुष्टी करणें (मज्जेचें रक्षण करणें) हें अस्थि धातूचें कार्य आहे. केश, लोम व नखें हे भाग अस्थींचे मल आहेत.
(च. चि. १५-१९ टीका)
अस्थिसार
पार्ष्णिगुल्फजान्वरत्निजत्रुचिबुकशिर:पर्वस्थूला: स्थूला-
स्थिनखदन्ताश्चस्थिसारा: । ते महोत्साहा: क्रियावन्त:
क्लेशसहा: सारस्थिरशरीरा अवन्त्यायुष्मन्तश्च ॥१०७॥
च. वि. ८/१०७ पा. ५८४
अस्थिसार माणसाचे पार्ष्णि (टांच) गुल्फ (घोटा) जानु (गुडघा), अरत्नि (कोपरापुढील हात) जत्रु, हनुवटी, डोकें, पेरी, सांधे हे अवयव आकारानीं मोठे असतात. नखे व दांतहीं मोठे असतात. त्यांचें शरीर दणकट, श्रम, सहन करणारें असें असतें. अस्थिसार लोक उत्साही, उद्योगी व दीर्घायुषी असतात.
(अस्थि) स्त्रोतोदुष्टीची कारणें
व्यायामादीतसंक्षोभादस्थ्नामतिविघट्टनात् ।
अस्थिवाहीनि दुष्यन्ति वातलानां च सेवनात् ।१७॥
च. वि. ५/१७ पा. ५२८.
व्यायामामुळें, उत्तेजित करणारा आहार, विहार व मानसिक कारणें यामुळें हाडांच्यावर आघात झाल्यामुळें वा वातवर्धक अशा रुक्षादि गुणांनीं युक्त अशा द्रव्यांच्या सेवनानें अस्थिवह स्त्रोतसें दुष्ट होतात.
अस्थिक्षयाची लक्षणें
केस, रोम, दाढी, मिशा गळणें, दांत पडणें, नखें खुरटणें, संधि शिथिल होणें, थकवा येणें, शरीर रुक्ष होणें, हाडें दुखणें, वाकणें, मृदु होणें अशीं लक्षणें अस्थिक्षयामुळें होतात.
(च.सू. १७-६७ सु. सू. १५-१६).
अस्थिक्षये स्यात् अंतिमंद चेष्टा । वीर्यस्य मांद्यं किल मेदस: क्षय: ॥
विसंज्ञता कंपनता च कार्श्यम् । तथांगभंगो वचनं कठोरता ॥
दोषस्य शैथिल्यमताऽपि शोफिता । विकंपनं शोष रुजश्च जायते ॥
हारीत तृतीय ९ पान २६७.
अस्थिक्षयांत हालचाली अत्यंत उणावणें, शक्ती व उत्साह कमी होणें, मेद झडणें, विसंज्ञता, कंप, कृशता, अवयव वाकडे होणें, छर्दी, कठोंरपणा, शोथ, दोष शिथिल होणें, शोष, वेदना अशीं लक्षणें होतात.
अस्थिवृद्धीचीं लक्षणें
हाडावर हाड वाढणें, दातांवर दांत येणें,
(सु. सू.१५-१७).
अस्थिदुष्टीचीं लक्षणें
अध्यस्थिदन्तौ दन्तास्थिभेदशूलं विवर्णता ।
केशलोमन्रवश्मश्रुदोषाश्चास्थिप्रदोषजा: ॥१६॥
च. सू. २८/३० पा. ३७९.
दातांवर दांत वाढणें, हाडावर हाड वाढणें, दांत हाडें दुखणें, सळसळणें, फुटल्यासारखी वाटणें, शरीराचा प्रकृत वर्ण जाणें, केस, लोम, नखें, श्मश्रु यांच्या ठिकाणीं विकृति उत्पन्न होणें ही लक्षणें अस्थिवह स्त्रोतसाच्या दुष्टीमध्यें आढळतात.