धातूचें स्वरुप
मेद हा शरीरामध्यें स्निग्ध, सोद, श्लक्ष्ण असा घृतसदृश पदार्थ आहे. आहार रसापासून, मांसानंतर याची उत्पत्ति होते. दोन अंजली असें मेदाचें प्रमाण सांगितलेले आहे.
द्वौ मेदस:
च. शा. ७-१४
मेद: स्नेहस्वेदौ दृढत्वं पुटीगस्थ्रां च ।
सु. सु. १५/४ पा. ६७.
मेदस: स्नेहमादाय सिरा स्नायूत्वभाग्नुपात् ।
सु. शा. ४-२९ पा. ३५०.
शुद्ध मांसस्य य: स्नेह: सा वसा परि कीर्तिता ।
सु. शा. ४.१३ पा. ३५६.
मेदो मज्जानुकारी धातुर्वसाख्या ।
सु. शा. ४.१३ टीका पा. ३५६
तृतीया मेदोधरा - मेदो हि सर्व भूतानां उदरस्यं अण्वस्थिषु च ।
सु. शा. ४-१२ पान ३५६.
मेदामुळें शरीराचें स्नेहन होतें. शरीराला दृढता येते आणि अस्थिंचें पोषण होतें. स्नेहन हें मेदाचें विशेष महत्त्वाचें असें कार्य आहें. मेदामुळें सिरा स्नायु उत्पन्न होण्यास सहाय्य होतें. सिरा स्नायूंची उत्पत्ति मांसाच्या अधिष्ठानानें होत असून मेद हा त्यांच्या संयोगास कारणीभूत होतो. ज्याप्रमाणें द्रव्यें हे क्षामधिष्टाय जायते । असे असते तरी अंबुयोनि असतें तसेंच येथेहि होते. शरीरांत मांसासह असलेला वसा नांवाचा जो उपधातू त्यास भेदाच्या स्नेहगुणामुळें पुष्टि मिळते. मेदोधराकल ही उदर व अस्थि यांच्या आश्रयानें असते.
स्वेदस्तु मेदस: ।
च. चि. १५-३०
स्वेद हा मेदाचा मल आहे.
स्त्रोतस् --
मेदोवहानां स्त्रे तसां वृक्कौ मूलं वपावहनं च ।
च. वि. ५.१२
मेदोवहानां वृक्कौ कटि च ।
सु. शा. १०-१२.
वपावहन, कटि, व वृक्क हे मेदोवहस्त्रोतसाचे मूल आहे. वपावहन हा अवयव कोणता मानावा त्यासंबंधीं क्लोमाप्रमाणेंच विद्वानांच्यामधें मतभेद आहेत. चक्रदत्तानें आपल्या टीकेंत स्निग्धवर्तिका व तैलवर्तिका अशीं वर्णनात्मक व संज्ञात्मक पदें वपावहनाला उद्देशून वापरलीं आहेत. उदर हें त्याचे स्थान सांगितलें आहे. मेदसोऽ पि यतस्थानं वसाबहुलं, तदप्यामाशयैकदेशे एव या वैद्यराज गोखले यांनीं उद्धृत केलेल्या चक्राच्या टीकेंत वसायुक्त, आमाशयाच्या जवळ असलेला अवयवविशेष भेदाचें स्थान म्हणून सांगितला आहे. (शारीरक्रियाविज्ञान २२४ पान) त्यावरुन आमाशयाच्या (जठराच्या) मागें असलेला यकृत व प्लीहा यांच्या मधील भागीं असलेला अवयव म्हणजे हा वपावहन शब्दानें उल्लेखलेला अवयव असावा असे काही तज्ञ मानतात. निर्णय कठीण आहे.
मेदसारता -
वर्णस्वरनेत्रशलोमनखदन्तौमूत्रपुरीषेषु विशेषत: स्नेहो
मेद:साराणाम् । सा सारता वित्तैश्वर्यसुखोपभोगप्रदाना-
न्यार्जवं सुकुमारोपचारतां चाचष्टे ॥
च. वि. ८-१०८ पान ५८४
मेदसार व्यक्तीचे वर्ण (त्वचा) नेत्र, केस, रोम, नख, दंत ओष्ठ हे अवयव स्निग्ध असतात. त्याचा स्वरही प्रसन्न व स्निग्ध असतो. मूत्रपुरीषांनाहि ओशटपणा असतो मेदसार व्यक्ति पैसा, ऐश्वर्य, सुखोपभोग, दातृत्व, आर्जवीपणा, सुकुमारता, यांनी युक्त असते.
स्त्रोतोदुष्टीचीं कारणें -
अव्यायामाद्दिवास्वप्नान्मेद्यानां चाति भक्षणात् ।
मेदोवाहिनी दुष्यन्ति भुक्त्वा च स्वपतां दिवा ॥१५॥
च. वि. ५-२४ पान ५२८
व्यायाम न करणे, दिवसा झोपणें स्निग्ध पदार्थ अतिशय प्रमाणांत खाणें,(मद्य पिणें) या कारणांनीं मेदोवहस्त्रोतस् दुष्ट होतें.
मेद:क्षय लक्षणें -
`मेद:क्षये प्लीहाभिवृद्धि: सन्धिशून्यता रौक्ष्यं मेदुरमांसप्रार्थना च;
सु. सू. १५-९ पान ६९
सन्धीनां स्फुटनं ग्लानिरक्ष्णोरायास एव च ।
लक्षणं मेदसि क्षीणे तनुत्वं चोदरस्य च ॥६६॥
च. सू. १७-६६ पान २१७
मेदक्षयामध्यें सांधे फुटल्यासारख्या वेदना होतात. सांधे ढिले वाटतात. गळून गेल्यासारखें वाटतें, डोळ्यांना त्रास होतो. शरीर रुक्ष होतें, अंग कृश होतें, कंबर, पोट पातळ होतें निर्जिव झाल्यासारखे वाटते (स्वानं कटया:) वा. सु. ११-१८) व प्लीहा वाढते. हारिताने मेदक्षयाचे वर्णन पुढील प्रमाणें केले आहे.
मेदक्षये मंदबलो विसंज्ञता पारुष्यमंगस्य च भंगतास्यात् ।
श्वासातिकासरुचिताऽग्निमांद्यं गतिर्विशोषश्च तथैव जायते ।
हारित तृतीय ९ पान २६७
मेदाचा क्षय झाला असतांना बल उणावणें, संज्ञानाश वा मूर्च्छा येणें, अंग खरखरीत होणें, अंग मोडून येणें, श्वास, कास, अरुचि, अग्निमांद्य गतिमंदता, शुष्कता अशीं लक्षणें होतात. हारिताच्या बंगाली प्रतीत -
``विशोषकंपो वपुषश्च शुष्कता'' असा पाठ असून कंप हें लक्षण तेथे अधिक आलें आहे.
``मेद: स्निग्धाड्गतामुदरपार्श्ववृद्धिं कासश्वासादीन्
दौर्गन्ध्यं च ।
सु. सू. १५-१४ पान ७०
मेदोवृद्धीमध्यें शरीराला स्निग्धता येते, उदर, पार्श्व, नितंब, स्तन यांचे आकार मोठे होऊन, ते अवयव लोंबकळल्यासारखे दिसतात. घामाला घाण येते. थोडयाश्या हालचालीनेंही श्वास लागतो, कास वाढतो.
विद्ध लक्षणें
तत्र विद्धस्य स्वेदागमनं स्निग्धांतता तालुशोष: स्थूलशोफता
पिपासा च ।
सु. शा. ९-१२ पान ३८६.
घाम येणें, अंग स्निग्ध होणे, तालुशोष, स्थौल्य, शोथ, तृष्णा हीं लक्षणें मेदवहस्त्रोतसाच्या वेधानें होतात.
मेदोदुष्टीचीं लक्षणें -
मेद:संश्रयास्तु प्रचक्ष्महे ।
निन्दितानि प्रमेहाणां पूर्वरुपाणि यानि च ॥१५॥
च. सू. २८-२९ पान ३७९
ग्रन्थिवृद्धि गलगण्डार्बुदमेदोजौष्ठप्रकोपमधुमेहातिस्थौल्या
तिस्बंदप्रभूतयो मेदोदोषजा:;
सु. सू. २४-९ पान ३१६
मेदोदुष्टीमुळें मांसदुष्टीप्रमाणेंच विकार उत्पन्न होतात. प्रमेहाचीं पूर्वरुपें, प्रमेह अतिस्थूलता, अल्पायुष्य, भूक फार लागणें; तहान लागणें, मैथुन न करतां येणें, (नपुंसकत्व) अशीं लक्षणें होतात.