एक अविचारी तरुण माणूस रस्त्याने चालला असता म्हातारपणामुळे ज्याचे शरीर धनुष्यासारखे वाकले आहे असा एक माणुस त्याला दिसला, तेव्हा तो त्या म्हातार्याला म्हणाला, 'बाबा तुमचं हे धनुष्य मला विकत देता का ?' म्हातारा त्यावर म्हणाला, 'तुम्ही पैसे खर्च करून धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे थांबाल तर बिनपैशाने असंच धनुष्य तुम्हाला मिळेल, कारण तुम्हाला म्हातारपण आलं म्हणजे तुमच्याही शरीराचं असंच धनुष्य होणार आहे.' हे ऐकताच तो तरुण माणूस खाली मान घालून निमूटपणे चालता झाला.
तात्पर्य - माणसाला म्हातारपणामुळे निर्माण झालेल्या वैगुण्याबद्दल त्याची चेष्टा करून त्यात आनंद मानणे हे माणूसकीचे लक्षण नव्हे.