एका कारकुनाचा एक बालपणाचा मित्र होता. त्याला एका संस्थानात कारभार्याची नोकरी मिळाली. ही गोष्ट त्या कारकुनाला समजताच तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे गेला व म्हणाला, 'मित्रा, तुला ही मोठी हुद्याची जागा मिळाली. याबद्दल मला फार आनंद होतो आहे.' त्यावर तो कारभारी म्हणाला, 'अरे, पण तू कोण आहेस ते तर मला कळू देत. तुझं नाव काय ?' यावर तो कारकून म्हणाला, 'तुम्हांला हा जो एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला आहे त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटतं. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता माणसाला उन्माद येतो की त्याला आपल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही. त्या स्थितीबद्दल त्या माणसाची कीव कोणाला येणार नाही ?'
तात्पर्य - अधिकार व सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्याच्या स्वभावात फरक पडत नाही. असे लोक कमीच !