उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत
न्हालें जगत् काय क्षीराब्धि फेनांत ? ध्रु०
या काळवेळेस निघतात वेताळ
नाचोन खिदळोन बेताल गातात ! १
बाई, शरीरास उन्मादकर वास
तो आवडे यांस येतील अंगांत ! २
गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक
मातींत राबोन स्वगृहा परततात. ३
तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग
टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ४
घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट
स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ५
हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस
चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ६
तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?
या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ७