मी म्हटलें गाइन तुलाच गीतशतांनीं,
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,
भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीची;
मज दिनें वाटली अशींच हीं जायाचीं !
परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !
त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !
तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !
माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !
ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !