मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ६०१ ते ७००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ६०१ ते ७००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


६०१

एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ॥१॥

अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥

अनुतापें स्नानविधि । यज्ञसिद्धी देहहोम ॥२॥

जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥

६०२

त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥

पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥

पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥

तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

६०३

बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥१॥

कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥

टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥२॥

तुका म्हणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥३॥

६०४

दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥

हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥

तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥२॥

तुका म्हणे सेवा । कळिकाळा जिंकी देवा ॥३॥

६०५

करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥

वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥

पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥

तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥

६०६

मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥

मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥

दिनानाथा कृपाळुवा । सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥

तुका म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥

६०७

सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥

वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥२॥

तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥३॥

उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥४॥

ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥५॥

डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥६॥

ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥७॥

तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥८॥

६०८

नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥

देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥

भोगी भोगविता । बाळासवें तो चि पिता ॥२॥

कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥

नाटाचे अभंग समाप्त ६३

६०९

प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा । मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥

तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥

आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥२॥

काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज म्हणती करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥३॥

मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका म्हणे ॥४॥

६१०

प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥

तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घागर्‍यां घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥

नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग । सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥

जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं । आदीं अवसानीं तो चि एक ॥४॥

सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥

६११

विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥

विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वत्ति गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥

विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥

विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥५॥

६१२

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥

बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥

बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रम्हींची ॥२॥

जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥३॥

जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥

आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुसर्‍याची ॥५॥

६१३

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥

नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥

केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥

नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥

असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥

आप आपण्या घातकर । शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका म्हणे ॥५॥

६१४

आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥

जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥

जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुर्‍हावली ॥२॥

वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥

सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥

करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥५॥

६१५

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टीला जीव माझा ॥१॥

माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥

काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥

मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥

आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥

६१६

अगा ए सावर्‍यासगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥

बहु या उदराचे कष्ट । आम्हांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥

जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥२॥

येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥३॥

जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥४॥

माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्ग‍ुरू तुका म्हणे ॥५॥

६१७

आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥

करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥

मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥२॥

आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥३॥

करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनिया ॥४॥

हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥५॥

६१८

जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥

जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥

जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥२॥

जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥३॥

जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥४॥

जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥५॥

६१९

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥

काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥

काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥

काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥

काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥

ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥

६२०

तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥

संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥

मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥३॥

आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥४॥

जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥५॥

६२१

सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥

आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥

दासीचा पाहुनरउखतें । धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तिहीन ॥२॥

काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥

विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥

तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥

६२२

विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥

कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥

बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥

जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥३॥

एवढें जयाचें निमत्ति । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥४॥

तुका म्हणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल । केवढें खोल अभागिया ॥५॥

६२३

आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमार्ग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥

नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥

नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥

क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोई । अग्निस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥

देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥

तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥

म्हणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥७॥

६२४

न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥

उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥

दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥

म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥

तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हणे तुका म्हणे ॥५॥

६२५

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥

न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥

बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥३॥

आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्ति कांप भरलासे ॥४॥

आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥५॥

६२६

आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥

शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥

मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥२॥

सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥३॥

राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥४॥

६२७

देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥

शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥

भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥

नेणें भाव परि म्हणवीं तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥

तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥४॥

६२८

कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥

प्रथम केला गर्भि वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥

बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥

क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौर्‍यांशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥

आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥५॥

६२९

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥

म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥

ऐसा हा कळला निर्धार । मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळा ॥३॥

दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आम्हांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥

जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवूं ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥

६३०

देवा तूं आमचा कृपाळ । भक्तिप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥

तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥

आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥

न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥

तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥५॥

६३१

न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥

बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥

तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥२॥

अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥३॥

होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥

ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥

६३२

आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥

येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥

ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगे वाणिजेते ॥२॥

घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥

येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥

केली आराणुक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्ती । तुका म्हणें सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥५॥

६३३

बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥

दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥

तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥

ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥

फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥

नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तिचिया ॥५॥

६३४

अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥

किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥

विविध कर्म चौर्‍यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥२॥

जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥३॥

पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मळितां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥४॥

म्हणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥

६३५

ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥

जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥

चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥

मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥३॥

गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥४॥

कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥५॥

६३६

होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥

धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥

मज तों पडियेली होती भुली । चित्तीची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टी उघडली बरें जालें ॥२॥

आतां हा सिद्धी पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुम्हां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥

कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं । केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥

कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥५॥

६३७

तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥

काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥

न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥२॥

तुज समर्पिली काया । जीवें भावें पंढरीराया । सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥३॥

चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥४॥

होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥५॥

६३८

कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥

पाप बळिवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥

काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन । कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥

आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥

नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥५॥

६३९

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तिमंत । म्हणोनि उद्वेगलें चत्ति । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥

ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥

कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आम्हां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसर्‍याचा ॥२॥

सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥

नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥

बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥५॥

६४०

बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥

दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥

बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥२॥

तुम्हासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥

रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥४॥

आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥५॥

६४१

आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्तीठायीं ॥१॥

भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥

आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥

वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चत्ति । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥३॥

करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥

बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥५॥

६४२

तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥१॥

भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥

जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥

सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पक्षीश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥

मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तिकाजा लवलाहीं ॥५॥

६४३

हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥

बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥

येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥

मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्ती दृढ द्यावा ॥३॥

सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥

आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥५॥

६४४

बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥

न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥

जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥

जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥

आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥

अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपें आप एकाएकीं ॥५॥

६४५

अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥

बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥

जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥

येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें । आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥

न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥

वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ॥५॥

६४६

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनादऩना । आनंदघना अविनाशा ॥१॥

सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥

चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥

कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥

अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥

तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥५॥

६४७

आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥१॥

विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥

बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥

होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥

तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥

६४८

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥

धर्म करूं तरि नाहीं चत्ति । दान देऊं तरि नाहीं वत्ति । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥

नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥

तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥

म्हणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥

६४९

तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना । तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥

आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥

माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥

माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढ्या आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥

आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लगे मनीं । निद्राजागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥

आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥५॥

६५०

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥

सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥

भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥

नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥

पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसळिलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥

न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥

६५१

मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥

लक्ष चौर्‍यांशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥

पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥

नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्ती न धरावें ॥४॥

क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥

६५२

दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥

ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥

हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥२॥

सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥३॥

राखे दारवंटा बळीचा । रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥

भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥

६५३

हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस । होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥

धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान । न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥

वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गिर्‍हे राबवीती ॥२॥

बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥

संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥

जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥

६५४

बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भि मातेच्या उदरीं । लक्ष चौर्‍यांशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥१॥

जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥

न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥२॥

काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥३॥

ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥४॥

आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥

६५५

जंव हें सकळ सद्धी आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥

जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥

जोडोनि धन न घलीं माती । ब्रम्हवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥

दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥

मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥५॥

६५६

ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥

उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥

अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥

शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥३॥

आतां पुढें बोलणें तें काई । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ॥४॥

६५७

चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥

शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥

सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥२॥

म्हणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमत्ति ॥३॥

येणें मज भोगविल्या खाणी । नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥४॥

पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड । आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥

६५८

चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥

उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥

जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥२॥

गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥

खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥

उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥५॥

६५९

काय आम्ही भक्ति करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥

कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥

काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥

काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥

तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका म्हणे ॥५॥

६६०

शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥

शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥ध्रु.॥

शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें । पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥२॥

शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥३॥

शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥४॥

शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ॥५॥

६६१

इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥

न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥

जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥

करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥

धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥

६६२

संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥

किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवर्ति भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥

वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥

अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥

ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥

सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥५॥

६६३

विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥

विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥

उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥

रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुट्या धाकुटा ॥३॥

करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय । आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥

पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका म्हणे चित्ते चित्त मेळवूनी ॥५॥

६६४

ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥

न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥

रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥

गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥३॥

ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥

जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥

कान्होबा नाट अभंग ७

६६५

अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥१॥

अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिबंध वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥

अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥२॥

अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥३॥

अगा अंबॠषिपरंपरा । निलारंभ निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥४॥

अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥५॥

अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधु ॥६॥

६६६

उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥

शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥

श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥

कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥४॥

सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥५॥

६६७

एक मागणें हृषीकेशी । चत्ति द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥

नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥

मना येईल तो जन्म देई । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥२॥

इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥

नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥४॥

६६८

कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ति सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥

ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥

ऐसा कई येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥

कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥३॥

प्रसन्न दया क्षमा शांति । कई नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसंपत्ति । मनोरथ कळती तई पुरले ॥४॥

तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । म्हणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥

६६९

तूं बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणउनी । आतां करीन मी असेल तें ॥१॥

तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥

कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥२॥

उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥३॥

किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥४॥

६७०

देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥

जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥२॥

भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥

काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥

निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥५॥

पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥६॥

कायामनें वाचाइंद्रियांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥७॥

६७१

काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥१॥

भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥२॥

न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥३॥

चेतवूनि इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥४॥

आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥

नाटाचे अभंग समाप्त ६३

६७२

काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥

कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥

आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥

भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥

तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥

६७३

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥

संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥

संतासी देखोनि करितो ढवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥

तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

६७४

एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥१॥

एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥

अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥२॥

एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥३॥

एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥४॥

चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥५॥

रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥६॥

कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥७॥

आइकोनि तुम्ही तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळवळिलां ॥८॥

आज्ञा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥९॥

ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥१०॥

मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं म्हणोनियां ॥११॥

ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥१२॥

ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥१३॥

६७५

आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥

वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥

बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥२॥

माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥३॥

६७६

विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥१॥

विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥

विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥

विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥

विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥४॥

विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥

६७७

बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥

एकामध्यें एक नाहीं मिळो येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥

जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥

तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥

६७८

बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥

पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥

अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥

मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥

६७९

सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥

वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥

भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥

नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥

तुका म्हणे मोक्ष भक्तचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥

६८०

तीर्थेचकेलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥

जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥

योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥

तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥

६८१

कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥

नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥

नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥२॥

हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥३॥

तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥

६८२

रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥१॥

पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥

भिलटीचिया रे उच्छिष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥२॥

मी तों सलगीचें मूल । तुका म्हणे तू सखोल ॥३॥

६८३

तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥१॥

कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥

अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥

तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥

६८४

विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥

सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥

आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥२॥

तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥

६८५

पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥

रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥

तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥

६८६

नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥१॥

जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥

मोकलिलें जावें बाणें । भाता जेणे वाइलें ॥२॥

आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥

६८७

गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥

हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥

अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥२॥

तुका म्हणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥३॥

६८८

माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥

देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥

देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥

हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥

६८९

कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥

नेलें वार्‍यां हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥

कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥२॥

तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥

६९०

सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥

अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥

फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥

तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥

६९१

कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥

अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥

फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥

दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टी कृष्णलोक ॥३॥

तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥

६९२

जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥

भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥

आम्ही दुजें नेणों कोणा । हें चि मना मन साक्ष ॥२॥

तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥३॥

६९३

स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥

परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥

रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥

तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥

६९४

तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥

सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥

अव्यक्त अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥२॥

रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥

तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥४॥

६९५

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥

बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥

हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥

तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥

६९६

आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तीपासुनियां ॥१॥

पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥

पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥

तुका म्हणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥३॥

६९७

मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥१॥

पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥

इंद्रियांचीं आम्ही पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चत्ति रंगलेंसे ॥२॥

एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥

तुका म्हणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥४॥

६९८

लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥

कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥

व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्विकार ॥२॥

रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥३॥

अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥

अचेत चेतलें भक्ताचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥

६९९

कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥

कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्ती । कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥

तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥

७००

निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥

या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥

पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥

तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP