मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ७०१ ते ८००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ७०१ ते ८००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


७०१

मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥

मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥

जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी ॥२॥

भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥

७०२

ब्रम्ह न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥

तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥

शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥२॥

पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥

७०३

काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥

तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥

रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धी ते ठायीं ॥२॥

काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥३॥

वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥

तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥५॥

७०४

तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥१॥

तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥

त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥२॥

तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥३॥

तुका म्हणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥

७०५

बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥

नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥

विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥२॥

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥

७०६

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥

हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥२॥

तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥३॥

७०७

सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥

त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥

हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥

७०८

मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥

मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥

आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥

तुका म्हणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥३॥

७०९

नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥

तरी आम्ही जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥

द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥

तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥

७१०

भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥

तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥

मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥

तुका म्हणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥

७११

नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥

असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥

नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करीं देखीं ॥२॥

नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥

नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥

कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥

७१२

सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥

जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ध्रु.॥

भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥

तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥

७१३

सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥

आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥

आला भोग अंगा । न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥

तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥

७१४

करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥

बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥

दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥

तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥

७१५

जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥

सहज पूजा या चि नांवें । गळित अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥

अवघें भोगितां गोसावी । आदीं आवसानीं जीवी ॥२॥

तुका म्हणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥

७१६

नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥

देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥

दंभस्थिती भलत्या भावें । मज हरिजन म्हणावें ॥२॥

तुका म्हणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥३॥

७१७

नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥१॥

म्हणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥

समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥

तुका म्हणे सत्ता । वरी असते बहुतां ॥३॥

७१८

न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥

म्हणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥

नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥

तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥३॥

७१९

एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥

ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥

एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥

प्रकाराचें तीन । तुका म्हणे केलें जन ॥३॥

७२०

वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥

दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥

अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥

बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥

७२१

विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥१॥

देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥

देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥

तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥

७२२

तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥

ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥

वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥२॥

तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥३॥

७२३

मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥

एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥

सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥

तुका म्हणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥

७२४

अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥

परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥

हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥

तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥

७२५

चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥

तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥

तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥

मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥

व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥

धर्म सत्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥

भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥६॥

तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥७॥

७२६

सोडिला संसार । माया तयावरि फार ॥१॥

धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥

यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥

तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥

७२७

बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥

रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥

विश्वास हा धरूं । नाम बळकट करूं ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥३॥

७२८

पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥१॥

करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥

एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥

तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥

७२९

मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥१॥

घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥

अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥

तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥

७३०

जाणे भक्तीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥१॥

आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥

नामरूपीं जडलें चत्ति । त्याचा दास मी अंकित ॥२॥

तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तो चि शुद्ध ॥३॥

७३१

याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥

माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥

अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥

तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥

७३२

बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥

नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥

आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥

तुका म्हणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥

७३३

अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥

पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥

होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥

तुका म्हणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥

७३४

तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥

जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥

करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥

तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥

७३५

लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥

सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥

गात नाचत विनोदें । टाळघागर्‍यांच्या छंदें ॥२॥

तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥

७३६

मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥

सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥

देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥

तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥

७३७

ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥

तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥

रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥

तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥

७३८

आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥

नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥

विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥

तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥

७३९

काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥

मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥

त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥

तुका म्हणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥

७४०

वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥

तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥

गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥

तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥

७४१

पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥१॥

ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥

देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥

गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥

शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥

तुका म्हणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥

७४२

भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥

धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥

हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥

तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥

७४३

वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥

ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥

परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥

तुका म्हणे हाडें । कुतर्‍यां लाविलें झगडें ॥३॥

७४४

हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥

अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥

न वर्जितदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥

नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥

७४५

आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥

परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥

पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥

तुका म्हणे भुली । इच्या उफराट्या चाली ॥३॥

७४६

विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥

कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥

न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥

तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥

७४७

कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥

त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥

भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥

तुका म्हणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥

७४८

नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥१॥

रूप आवडे आम्हांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥

आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥२॥

तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥

७४९

मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥

मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥

येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥

तुका म्हणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥

७५०

घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥

तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥

तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥

मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥

तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥

७५१

धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥

बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥

सर्वमंगळाचें सार । मुख सिद्धीचें भांडार ॥२॥

तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥

७५२

जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥

म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥

लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥

तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे ॥३॥

७५३

एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥

कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥

आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥

तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥

७५४

मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥१॥

पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥

तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥२॥

तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥

७५५

तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥

आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ति चारी ॥ध्रु.॥

संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥

तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥

७५६

तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥

आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥

हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥

तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥

७५७

उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥

तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥

आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥

तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥

७५८

क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥

देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥

नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥

अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं पोटीं ॥३॥

७५९

नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥

तैसी चत्तिशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥

वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥

वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥

नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥

प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥

तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥

७६०

नवां नवसांचीं । जालों तुम्हासी वाणीचीं ॥१॥

कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥

कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥

तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥३॥

७६१

एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥

कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥

लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥

तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥

७६२

आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥

आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥

माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥

मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥

पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥

शरण आलों आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥५॥

७६३

सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥

त्याचा हा चि उपकार । अंतीं आम्हाशीं वेव्हार ॥ध्रु.॥

नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥२॥

तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥

७६४

आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥

परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥

ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥

तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥

७६५

असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥

माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥

सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥

तुका म्हणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी ॥३॥

७६६

काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥

सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥

योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥

तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥

७६७

हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥

त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥

नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥२॥

करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥३॥

हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥

म्हणवी हरिचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥

७६८

हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥

ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥

करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥

तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

७६९

लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥

तैसा तूं चि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥

भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥

तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥

७७०

डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥

तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥

मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥२॥

तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥

७७१

गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥

चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥

सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥

तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥

७७२

बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥१॥

विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्‍यांचें काज ॥ध्रु.॥

पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥२॥

माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥३॥

७७३

योग तप या चि नांवें । गळित व्हावें अभिमानें ॥१॥

करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥

तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥

तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥

७७४

करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥

तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥

मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥

तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥

७७५

वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥

नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥

अंगुळिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥

नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥

७७६

वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥१॥

तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रम्ह व्हावें ॥ध्रु.॥

जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥२॥

गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥३॥

जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजायंत्र ॥४॥

साधनाच्या ओढी । डोळियांच्या मोडामोडी ॥५॥

तुका म्हणे देहीं । संत जाहाले विदेही ॥६॥

७७७

प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥

मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥

सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥२॥

तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥३॥

७७८

पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥

त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥

पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥

तुका म्हणे तई । सिद्धी वोळगती पायीं ॥३॥

७७९

धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥

पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथें भाव ॥ध्रु.॥

विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥

तुका म्हणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥

७८०

आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥

मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥

नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥

तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥

७८१

नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥

माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥

न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥

तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥

७८२

टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥१॥

तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥

कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥२॥

तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥

७८३

धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥१॥

धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥

कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥२॥

गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥

दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥

लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥

विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥६॥

तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥७॥

शाक्तावर - अभंग १३

७८४

टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥

म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥

दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥

रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥

पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥

नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥

जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥६॥

पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥७॥

कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥८॥

शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥९॥

विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥१०॥

योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥११॥

वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥

तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥

७८५

शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥

सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥

क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥

मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥

स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥

तुका म्हणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥

७८६

राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥

अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥

न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥

तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥३॥

७८७

ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥१॥

सांडुनियां रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोष ॥ध्रु.॥

शिवों नये तीं निळी । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥

तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥

७८८

अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥

त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥

काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥

करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणी ही ॥३॥

७८९

वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥

रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥

जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥

तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥

७९०

शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥

तिची त्या पडली सवे । मागें धांवें म्हणोनि ॥ध्रु.॥

शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥

तुका म्हणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥

७९१

हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥

ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥

अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥

गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥

माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥

पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥

ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥

तुका म्हणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥७॥

७९२

कांद्यासाठी जालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥

ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥

पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥२॥

तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥

७९३

सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥१॥

बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥ध्रु.॥

सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥

तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥

७९४

बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥

करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥

अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥

तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥

७९५

असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥

रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥

काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥

तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥३॥

७९६

नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥

कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥

असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥२॥

तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥

॥१३॥

७९७

पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥

कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥

न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥

तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥

तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥

७९८

कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥

द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥

डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥

वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥

तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥

७९९

विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥

मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥

असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥

तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अग्निस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥

म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥

८००

अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती ॥१॥

आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥

धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ॥२॥

तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP