मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ४५०१ ते ४५८३

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४५०१ ते ४५८३

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


४५०१

लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥

मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥

नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥

हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥४॥

पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥

तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥

क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥

देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥

त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥

४५०२

जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥

लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥

माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥३॥

जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥

मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकीं ॥५॥

ब्रम्हांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥

वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥

लाघव कळलें ब्रम्हयासी याचें । परब्रम्ह साचें अवतरलें ॥८॥

तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥

लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥

भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥

पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥

तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥१३॥

स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥

लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥

हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥

गौळिये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥

तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥१८॥

पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥

मुख माझें काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥

ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥

देव चि अवगा जालासे सकळ । गाईं हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥

तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥

दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥

४५०३

कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥

देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥

कळला हा देव तया साच खरा । गाईं वत्सें घरा धाडी ब्रम्हा ॥३॥

ब्रम्हादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥

जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे सेवे संचित हें ॥५॥

४५०४

संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥

त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥

गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरि बांधा त्या ही ॥३॥

त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यातुनि ॥४॥

पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥

नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥

मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥

४५०५

तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥

करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥

दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥

नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥

मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥

तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥

निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥

४५०६

तयांसवें करी काला दहींभात । सिदोर्‍या अनंत मेळवुनी ॥१॥

मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥

नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥

द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥

वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥

द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥

तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥

राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥

तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥

गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥

त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥

बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥

पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥

मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥

४५०७

केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥

थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥

सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥३॥

तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥

सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥

४५०८

जाय फाकोनियां निवडितां गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥

घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥

गोविंदे वेधिलें तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥

४५०९

संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥

गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥

उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥३॥

दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥

लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥

देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥

हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥

४५१०

भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥

देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥२॥

दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥

देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥

यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥

लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥

सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥७॥

माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥

लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥

देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥

मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥

तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥

मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥

तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१४॥

ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥

मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥

निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१७॥

४५११

नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥

येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥

देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥

बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्ती ॥४॥

चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥

तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥

चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकळिक देव देखे ॥७॥

देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥

काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनियां ॥९॥

यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥

गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥

पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥

संधि सारूनियां पाहिलें अनंता । म्हणती ते आतां कळलांसी ॥१३॥

कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥

तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥

सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥

४५१२

भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥

सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥

आजि आम्हां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥

न वंचत्या गाईं जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥

पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥

गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥

करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥

४५१३

काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥

लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचत्ति माव होती ॥२॥

होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥

जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥

आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥

भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥

४५१४

नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥

जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥

वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥

दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥

चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥

नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥

जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥

४५१५

खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥

मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥

ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥

पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥

कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥

नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥

तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥

हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥

तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥

दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥

४५१६

काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥

माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥

क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥

करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥

तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥

४५१७

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥

खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥

आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥

गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥४॥

जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥५॥

सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥

मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥

माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥

एका समतुकें अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥

चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥

चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहात चि ॥११॥

पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं म्हणे धरा ॥१२॥

धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि । येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥

नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥

विचारीं पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागें ॥१५॥

मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥

चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥

या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥

पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥

हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥

पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥

वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥

सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥

नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥

रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥

लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥

गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥

साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥

सांभाळिलें तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें ॥३०॥

४५१८

मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥

माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥

जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥

नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चत्ति लावा वरी ॥४॥

वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥

कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥

डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥

जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥

त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥

वरि जातां वरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥

नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देइल सिव्या ॥११॥

आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥

निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥

खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥

तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥

४५१९

नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥

न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतलें गडे सांभाळावें ॥२॥

सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरें ॥३॥

बरें विचारुनी करावें कारण । म्हणे नारायण बर्‍या बरें ॥४॥

बरें म्हणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥

तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥

येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥

पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥

न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥

मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥

४५२०

गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥१॥

जालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥

देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥

आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । म्हणउनि ऐशी परि जाली ॥४॥

जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥

कळों आलें तीहीं काफुंदे शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥

होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥

सांगे आतां हरि तुम्हां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥

यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥

परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥

४५२१

पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥

काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥

एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥

जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥

निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥

त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥

वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥७॥

सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥

नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥

सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥

तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥

यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥

यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥

मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥

४५२२

तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥

कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥

मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥

अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥

जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥

४५२३

भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥

पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥

न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥

अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥

गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥

तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥

मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥७॥

४५२४

आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥

होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥

आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥

दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥

भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥

गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥

चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥

४५२५

काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥

लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥

उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥

पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥

विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥

दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥

पाहिलें पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें जालें आतां ॥७॥

आतां हा उठोनि खाईंल या बाळा । देईंल वेल्हाळा माय जीव ॥८॥

जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥९॥

रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥

४५२६

म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥

त्याचें आइकोन निष्ठ‍ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥

तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥

वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥

वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥

संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥

अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥

मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥

जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥

यमुनेच्या डोहावरी आला ऊत । कार्‍याकृतांतधूदकारें ॥१०॥

कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥

दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥

चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥

जाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरि मुष्टिघातें ॥१४॥

तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥

आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥

कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥

यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥

४५२७

निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥

लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥

निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥

एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥

यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव म्हणे हरि पुरे आतां ॥५॥

आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥

यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥

चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥

विसरु न पडे संवगड्या गाईं । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥

त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥

हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥

४५२८

अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥

आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि ॥२॥

गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशीं ॥३॥

मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळि या दुरी जाऊं नका ॥४॥

कानीं आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥

पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥

आल्या गाईं वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥

लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥

कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥

त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥

याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥

दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥

४५२९

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥

पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥

हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥

आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥

लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥

आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥

आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥७॥

४५३०

जननी हे म्हणे आहा काय जालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥

काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥

हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥

एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥

करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥

४५३१

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥

आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥

हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥

गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥

थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥

आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥

नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥

नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥

तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥

सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥

हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥

सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥

मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥

४५३२

नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आळिंगिलीं ॥१॥

हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥

पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रम्ह ॥३॥

ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥

घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥

दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥

नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥

यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥

हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥

सेवाॠणें तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥

४५३३

नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥

बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥

मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥

सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥

लोक गेले कामा गाईंपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥

लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥

आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥

४५३४

जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥

येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥

इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥

हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥

नव्हे तें चि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥

४५३५

खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥

नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥

गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥

वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥

नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका म्हणे वरि भारवाही ॥५॥

४५३६

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥

अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥

मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥

बुद्धि स्थिर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥

लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥

४५३७

दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥

आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥

सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥

रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥

क्रोध देवावरि धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥

४५३८

भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसि ॥१॥

भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥

काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥

खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥४॥

कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥

४५३९

जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥

तातडिया मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥

नेदाविया काईं म्हसी वांचों लोक । पुरा सकळिक सिळाधारीं ॥३॥

धाक नाहीं माझा गोवळियां पोरां । सकळिक मारा म्हणे मेघां ॥४॥

म्हणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥५॥

मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥६॥

अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥

४५४०

देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥

नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥

फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥

विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥

जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥५॥

४५४१

तो या साच भावें न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली सिळा ॥१॥

घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥

देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥

विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥

लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥

आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥

यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥

४५४२

वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥

शिरी धरूं गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥

नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥

अशंकित चित्ते न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥

चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥

४५४३

नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥

आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥

पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥

आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥

निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥

दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥

सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥

४५४४

कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥

निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥

लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काफुंदे रडे कोणी धाकें ॥३॥

धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥

तयाखालीं गाईं वत्सें आलीं लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥

जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥

जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥

४५४५

त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी ।१॥

पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥

येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥

शळिांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥

एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥

ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥

हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥

दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥

भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥

निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥

सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥

यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥

४५४६

वाचाळ लटिके अक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥

बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥

आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥

लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥

आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥

४५४७

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥

लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥

भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥

लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥

एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥

आजिवरि आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥

तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥

राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥

वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥

सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥

त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥

४५४८

लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥

शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥

मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥

कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चत्ति जालें त्यांचें ॥४॥

त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥

सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥

चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥७॥

४५४९

समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥

गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥

काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥

माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥

दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥

४५५०

कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥१॥

कळलें चि नाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥

विसरु कामाचा तुका म्हणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥

४५५१

जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥

कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥

कवतुकासाठीं क्त देहावरि । आणिताहे हरि बोलावया ॥३॥

यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥

मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥

दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥

तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥

द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥

करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥

पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१०॥

संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाहीं ॥११॥

४५५२

नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥

सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥

येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥

सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाईं वत्स पशु जीवां ॥४॥

वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनियां ॥५॥

४५५३

यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥

देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥

दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥

नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥

एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥

४५५४

काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरि वोसरला ॥१॥

वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥

कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥

भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥

गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥

वत्सें गाईं पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥

चत्ति वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥

तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥

गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥

४५५५

गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥

इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥

आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥

रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥

न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥

माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥

पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥

४५५६

नाचतां देखिलीं गाईं वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥

लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥

येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥

विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥

आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥

त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥

सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥

समागमें गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥

संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥

करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥

करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥

पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥

नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥

तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥

दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥

भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥

४५५७

गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥

भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥२॥

वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥

सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा म्हणे घरा ॥४॥

राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥

छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥

त्यांच्या तुका म्हणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥

४५५८

समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥

अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥

सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥

सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥

त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥

निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥

नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥

४५५९

ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥

हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥

आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥

४५६०

अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥

परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥

लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥

दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥

न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥

रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥

उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥

कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥८॥

पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥९॥

जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥

४५६१

सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥

आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥

नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥

वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥

हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥

४५६२

द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥

देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥

नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥

४५६३

जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥

सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥

जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥

झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥

बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥५॥

रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव जाला ॥६॥

४५६४

जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥

उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥

तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥३॥

देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥

भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥

४५६५

वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥

भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥

जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥

येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥

त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥

४५६६

नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥

उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचाम ॥२॥

अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥

सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥

मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकळिक एक राज्य ॥५॥

राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥

सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥७॥

४५६७

धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥

दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥

व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥

माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥

कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥

४५६८

दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥

हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणों यासि ॥२॥

यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥

धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥

गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥

न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥

वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥

४५६९

तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥

करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥

दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥

त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥

शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥

तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥

तळमळ नाहीं तुका म्हणे चत्तिा । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥

४५७०

मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥

ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥

वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥

नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥

कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥

४५७१

वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥

ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥

लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥

देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥

येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥

काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥

ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥

४५७२

चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥

वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥

चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥

न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥

चुकवुनि जन्म देईंल आपणा । भजा नारायणा तुका म्हणे ॥५॥

४५७३

भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥

दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥

ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥

भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥

मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥

राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥

तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥

४५७४

रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥

रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥

कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥

उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥

शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥

आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥

निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥

नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥

सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥

रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥

बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥

४५७५

गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥१॥

ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥

घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥

नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥

गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥५॥

४५७६

कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥

द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥

पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥

अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥

अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥

४५७७

धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरलें ॥१॥

उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥

दिनानाथब्रिदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥

ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥

बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥

४५७८

सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥

वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥

नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥

४५७९

ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥

सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥

होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती क्त मुख लावूनियां ॥३॥

याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥

निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥

४५८०

भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥

गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥

भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥

रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥

नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥

४५८१

गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥

आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥

कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥३॥

जातों येतों आम्ही देवाचे सांगांतें । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥

४५८२

मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥

वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥

नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥

नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥

चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥

देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥

तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥

रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥

बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥

४५८३

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥

चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥

एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥३॥

दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥

भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥

नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसिद्धि ॥६॥

सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका म्हणे देखा पांडुरंगा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP