२१०१
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रम्हानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
॥३॥
२१०२
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु ॥१॥
वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥
शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥
तुका म्हणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥३॥
२१०३
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥
भक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥
गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥
२१०४
जैसें चित्ती जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥
अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि ॥३॥
२१०५ ना
हीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥
तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
२१०६
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥
पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥
आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥
मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥
तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥
२१०७
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥
उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥ध्रु.॥
जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळिंगी आवडी करूनियां ॥२॥
शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥
तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥
२१०८
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्ती माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥
जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥
आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥
तुका म्हणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥
२१०९
कळेल हें तैसें गाईंन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥
काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिका ॥३॥
तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥
२११०
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥
उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥
कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥
काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥
तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥
२१११
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥
नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥
पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥
२११२
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥
आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥
२११३
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥
तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥
२११४
विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥
मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥
हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥
सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥
अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥
तुका म्हणे क्षण । नको तयाचें दर्षण ॥५॥
२११५
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥
काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥
तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥
२११६
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥
जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥
आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥
काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥
तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥
२११७
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥
न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥
जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥
हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥
तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
२११८
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥१॥
नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥
असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥
तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक वेव्हार तयासाटीं ॥४॥
२११९
याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्ती पायीं सुखें ॥१॥
माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥
मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥
तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥
२१२०
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥
किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
२१२१
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥
आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥
२१२२
नव जातां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥
कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥
नाहीं आम्ही खात । कांहीं कोणाचें लागत ॥२॥
कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥३॥
२१२३
मोहरोनी चित्ती । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥
तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥
संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥
एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥
२१२४
काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥
कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा ॥३॥
२१२५
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥
हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥
तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥
नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
२१२६
निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥
नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥
निवडावें तन । सेतीं करावें राखण ॥२॥
तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥३॥
२१२७
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥
लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥
बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥
तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥
२१२८
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥
येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्ती ॥ध्रु.॥
नाहीं केली निंदा । आम्हीं दुसिलेंसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणें विण काय काज ॥३॥
२१२९
कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥१॥
तुज आठवावे पाय । आम्हीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥
तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥
तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
२१३०
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥
तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥
देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराईं ॥२॥
कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें ॥३॥
२१३१
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ती पांडुरंगा ॥१॥
येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥
अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥
तुका म्हणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥
२१३२
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥
आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥
सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥
तुका म्हणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥
२१३३
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥
तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥
खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥
तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥
२१३४
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥
ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥
२१३५
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥
आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्ती समाधान ॥ध्रु.॥
राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥
तुका म्हणे ऐसा होईंल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥
२१३६
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥
चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥
पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥
२१३७
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥
हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥
खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥
तुका म्हणे पाळी तोंडीचिया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥
२१३८
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥
पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे ॥ध्रु.॥
घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥
तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥
२१३९
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥
घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥
आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥
तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥
२१४०
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥
आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥
नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥
तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥
२१४१
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥
जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥
वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥
करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥
तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥
२१४२
माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥
जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥
सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥
गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥
तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥
२१४३
कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥
कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥
कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥२॥
कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥३॥
तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥
॥१३॥
२१४४
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥
तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥
करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥
तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥
२१४५
भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥
माझें तळमळी चित्ती । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥
कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥
तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥
२१४६
शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥
आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥
एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥
बुद्धि नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥
२१४७
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥
कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥
काय बळयुक्ति । नाहीं तुझे अंगीं शक्ति ॥२॥
तुका म्हणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥
२१४८
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥
माझी शक्ति नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥
आम्हां ओढी काळ । तुझें क्षीण झालें बळ ॥२॥
तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
२१४९
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥
काय करिसी होईं वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
तूं चि डोळे वाती । होईं दीपक सांगातीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं ॥३॥
२१५०
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥
माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥
गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥
तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि ॥३॥
२१५१
करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥१॥
आतां ये वो माझे आईं । देई भातुकें विठाईं ॥ध्रु.॥
उपायासी नाम । दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥
बीज आणि फळ । हें चि तुका म्हणे मूळ ॥३॥
२१५२
धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥
तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥
जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥
तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥
२१५३
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥
असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥
खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥
तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें ॥३॥
॥१०॥
२१५४
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥
तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥
ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥
तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥
२१५५
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥
माझें चित्ती मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥
दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥
तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईंल कळों ॥३॥
२१५६
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ती वाटतसें ॥१॥
याचा कांहीं तुम्हीं देखा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥
काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥
तुका म्हणे आतां जालों उतराईं । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥
२१५७
सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥
काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥
कुबिर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती ॥२॥
तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख फुंदता ॥३॥
२१५८
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥
रुचिविण काय शब्द वार्या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥
आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥
२१५९
मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आम्हां ॥१॥
वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥
गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥
२१६०
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥
वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥
उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥
तुका म्हणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥
२१६१
काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥
मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥
जाली तरी मर्यादा । किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥
तुका म्हणे साचा । कोठें जासी हृदयींचा ॥३॥
२१६२
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥
आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥
लावूनियां सवे । पळतां दिसाल बरवे ॥२॥
तुका म्हणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥
॥३॥
२१६३
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥
द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥
तुका म्हणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥३॥
२१६४
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥
बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥
फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥
तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण ॥३॥
२१६५
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥
ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥
चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥
वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें ॥३॥
२१६६
तळमळी चित्ती दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥
वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥
वेठीऐसा करीं भक्तिवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥
तुका म्हणे कईं देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥
॥४॥
२१६७
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥
ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हुण ॥ध्रु.॥
नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
॥१॥
२१६८
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥
येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥
काचें तरी कढे । जाती ऐसें चित्ती ओढे ॥२॥
विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका ॥३॥
२१६९
खोट्याचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥
काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥
तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे ॥३॥
॥२॥
२१७०
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥
दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥
केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥
कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता ॥३॥
माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥
तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥
॥१॥
२१७१
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥
हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥
जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥
तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥
२१७२
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥
तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥
२१७३
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥
इच्छितां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥
देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥
तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥
२१७४
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥
म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥
आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥
तुका म्हणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥
॥४॥
२१७५
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥
तार्कियाचें अंग आपणा पारिखें । माजिर्यासारिखें वाईंचाळे ॥ध्रु.॥
माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥
तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
२१७६
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईंल लेखूं ॥१॥
तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ध्रु.॥
इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥२॥
तुका म्हणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥
२१७७
भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्हीं भोग ब्रम्हतनु ॥१॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
॥३॥
२१७८
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥
विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु.॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥
तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥
२१७९
नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥
नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥
सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥
चुकी जाली आतां काय । तुका म्हणे उरली हाय ॥३॥
२१८०
आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥
माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥
भांडवल सेवा । हा चि ठेवियेला ठेवा ॥२॥
करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥
२१८१
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥
करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥
आधारें वदली प्रसादाची वाणी । उच्छिष्टसेवणी तुमचिया ॥२॥
तुका म्हणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥
॥४॥
२१८२
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥
पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥
जळो ऐसी ब्रिदावळी । भाटवोळीपणाची ॥२॥
तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥३॥
२१८३
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥
अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥
तुका म्हणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥
२१८४
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥
स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥
काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥
तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥
२१८५
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥
धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥
निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥
तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥
॥४॥
२१८६
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥
सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥
तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्याची ॥३॥
२१८७
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥
सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥
विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥
तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥३॥
२१८८
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥
भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोईं येथुनें चि ॥ध्रु.॥
येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥
तुका म्हणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥
॥३॥
२१८९
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥
आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥
संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥
आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे ॥३॥
२१९०
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥
आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥
प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥
तुका म्हणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
२१९१
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥
अंगभूत म्हूण पूजितो वाहाणा । म्हणतां शाहाणा येइल कैसा ॥२॥
तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥
२१९२
कुतर्याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे ॥१॥
जाय तिकडे हाडहाडी । गोर्हावाडी च सोइरीं ॥ध्रु.॥
अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥
तुका म्हणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥
२१९३
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥
बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥
सेविलिया निःकामबुद्धी । मदें शुद्धी सांडवी ॥२॥
त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥
॥५॥
२१९४
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥
असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥
दुसर्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥
एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
२१९५
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥
वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥
तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥
याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥
॥२॥
२१९६
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥
कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥
२१९७
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥
पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥
फेडा आतां पांग । अंगीं लपवुनी अंग ॥२॥
दुजें नेणें तुका । कांहीं तुम्हासी ठाउका ॥३॥
२१९८
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥
फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥
कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥२॥
तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥
॥३॥
२१९९
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥
नये पाहों कांहीं गोर्हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥
॥१॥
२२००
चावळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥
उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥
गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काईं ॥२॥
तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥