मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ४३०१ ते ४४००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४३०१ ते ४४००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


४३०१

मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥१॥

वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥

नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥२॥

नैश्वर ब्रम्ह तेव्हां होय ब्रम्ह । तुका म्हणे श्रम करुनी काय ॥३॥

४३०२

धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं ॥१॥

धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥

माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥२॥

एके हातीं धरली दाढी । घे कुर्‍हाडी दुजे हातीं ॥३॥

येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥४॥

तुका म्हणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥५॥

४३०३

निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आम्ही ॥१॥

निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आम्ही ॥२॥

तुका म्हणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥

४३०४

पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद ॥१॥

जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण ॥२॥

निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥

४३०५

नाना मतांतरें शब्दाची वित्पत्ति । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥

माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥

यज्ञयाग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥

तुका म्हणे होय उपरति चित्ति । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥

४३०६

नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥

हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥

न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ति ॥२॥

तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥

४३०७

शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥

म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥

एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥२॥

तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥

४३०८

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥

ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥

ब्रम्हीं ब्रम्हरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥

स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥

अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥

४३०९

काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥

काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥

काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥

काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥

काय बा करीसी दंभलौकिकातें । हित नाहीं मातें तुका म्हणे ॥४॥

४३१०

स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥१॥

चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥

शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥

तुका म्हणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥३॥

४३११

आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥१॥

पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥

भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥२॥

नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥३॥

४३१२

सद्ग‍ूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥१॥

उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं ॥२॥

नमस्कारीं त्याला सद्ग‍ुरायाला । तुका म्हणे बोला नाम वाचें ॥३॥

४३१३

सद्ग‍ूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥१॥

हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥२॥

बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका म्हणे मनीं आनंदलों ॥३॥

४३१४

आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्ती देवराव ॥१॥

देवराव तो ही आहे नश्चियेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥२॥

बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका म्हणे मनीं धरा भाव ॥३॥

४३१५

सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥

फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥

शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्तनाचा रंग सोडों नये ॥२॥

तुका म्हणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥३॥

४३१६

चला आळंदीला जाऊं । ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥

होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । मुखीं म्हणतां चुकती फेर ॥२॥

तुम्हां जन्म नाहीं एक । तुका म्हणे माझी भाक ॥३॥

४३१७

चरणीं नमन सद्ग‍ूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥१॥

गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काळ्या नाथिला महाबळी ॥ध्रु.॥

ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनार्दन ॥२॥

तुका म्हणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥३॥

४३१८

सद्ग‍ूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि ॥१॥

म्हणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥

कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुम्ही ॥२॥

तुका म्हणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥३॥

४३१९

डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना ॥१॥

परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥

डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥२॥

परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते ॥३॥

ब्राम्हणें ब्राम्हणा सद्ग‍ू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥४॥

तुका म्हणे देवें सांगितली सोय । म्हणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥५॥

४३२०

संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥१॥

गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥

चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥२॥

श्वपच अंत्यज भक्तिस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥३॥

४३२१

कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥१॥

चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥

लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥२॥

तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥३॥

ऐसे अहंतेनें नाडिले । तुका म्हणे वांयां गेले ॥४॥

४३२२

लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वज्ञा हे भ्रांति बाधूं नेणे ॥१॥

सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काईं ॥ध्रु.॥

तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥२॥

भोग भोग्य भोक्ता नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥३॥

तुका ब्रम्हानंदीं आहे तुकब्रम्ह । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥४॥

४३२३

न म्हणे वो आम्ही आपुलेनि चित्ती । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥१॥

खोटा तो विटाळ । म्हणोनि गाबाळ सांडियेले ॥ध्रु.॥

भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥२॥

तुका म्हणे आम्ही नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥३॥

४३२४

अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे ॥१॥

ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥

स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥२॥

तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥३॥

पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनार्दन ॥४॥

तुका म्हणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आईं तो चि विठो ॥५॥

४३२५

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे जुंझणार कैसा जुंझे ॥१॥

पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥

बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥

असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हायहाय काय करूं ॥३॥

तुका म्हणे हा तों स्वयें परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥

४३२६

किडा अन्नाचें मानुस । त्याचा म्हणविल्या दास ॥१॥

तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥

तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥२॥

तुका म्हणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥३॥

४३२७

कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥१॥

रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥

ऐसिया प्रेमळा म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥

एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥

तुका म्हणे त्याची पायधुळी मळिे । भवभय पळे वंदितां चि ॥४॥

४३२८

उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥१॥

पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥

खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥२॥

तुका म्हणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥३॥

४३२९

पंढरीस जाऊं म्हणती । यम थोर चिंता करि ती ॥१॥

या रे नाचों ब्रम्हानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥

धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥२॥

केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥३॥

दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥४॥

दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥५॥

तुका म्हणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥६॥

४३३०

पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥१॥

कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥

मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारीं एकपणें ॥२॥

तुका म्हणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥३॥

४३३१

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥

भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृत्ति थिरावली परब्रम्हीं ॥ध्रु.॥

निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥

सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥

दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥

४३३२

अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥१॥

ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥२॥

तुका म्हणे चत्ति स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥३॥

४३३३

दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिली देवरायें ॥१॥

तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥

मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥२॥

कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥३॥

धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रक्षिली दुष्काळांत ॥४॥

दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीर्ति मोठी ॥५॥

मुजुम करीत होता कानडा ब्राम्हण । फिर्याद लिहून पाठविली ॥६॥

अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥७ ॥

दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥८॥

विकते धारणे सवाईंचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥९॥

दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥१०॥

विठो पाडेवार भक्तां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥११॥

जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो म्हणे स्थळ मंगळवेढें ॥१२॥

दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥१३॥

देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली ॥१४॥

काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो म्हणे बेगारी विठा कां जी ॥१५॥

पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप म्हणती ते ॥१६॥

पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥१७॥

छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि ॥१८॥

वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा ॥१९॥

दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा म्हणे जालें कवतुक ॥२०॥

काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥२१॥

काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा ॥२२॥

कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला ॥२३॥

पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥२४॥

सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥२५॥

दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो म्हणे आपुलें कर्म नव्हे ॥२६॥

आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी ॥२७॥

निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥२८॥

दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥२९॥

तुका म्हणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥३०॥

४३३४

पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥

दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥

तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥२॥

चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईंन निधान पांडुरंग ॥३॥

पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईंन निरंतरा पांडुरंगा ॥४॥

साहावी माझी ओवी साहा ही आटले । गुरूमूर्त भेटले पांडुरंग ॥५॥

सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां । बैसलासे डोळां पांडुरंग ॥६॥

आठवी माझी ओवी आठावीस योग । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥

नववी माझी ओवी सरलें दळण । चुकलें मरण संसारीचें ॥८॥

दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका म्हणे ॥९॥

४३३५

धरोनियां फरश करी । क्तजनाचीं विघ्नें वारी ॥१॥

ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥

सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥२॥

उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥३॥

नागयज्ञोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥४॥

भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥५॥

४३३६

नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी ॥१॥

ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥

नाम प्रल्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥२॥

नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥३॥

नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी ॥४॥

नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥५॥

नाम जाणे शुकमूर्ति । जाणे राजा परिक्षिती ॥६॥

नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥७॥

४३३७

बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥

करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥

सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥

पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥३॥

विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥४॥

४३३८

किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥१॥

नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥२॥

तुका म्हणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥३॥

४३३९

उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥

जिव्हाळ्याचा काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥

तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥२॥

तुका म्हणे ऐसी नोवर्‍याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥३॥

४३४०

न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥१॥

चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥

काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥२॥

तुका म्हणे आम्ही बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥३॥

४३४१

संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥

मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥

कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥२॥

तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥

४३४२

विधवेसि एक सुत । अहर्निशीं तेथें चत्ति ॥१॥

तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥

सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥२॥

तुका म्हणे चित्ती । पतिव्रते जैसा पति ॥३॥

४३४३

म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥

नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥

शाळिग्रामासि म्हणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥

भावी सद्ग‍ु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥

हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥

तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥

४३४४

स्वगाअचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥

नारायणनामें होऊं जिवनमुक्त । कर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥

वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥२॥

यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥

तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥

४३४५

व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥१॥

पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥

अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥२॥

तुका म्हणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥

४३४६

पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥१॥

ब्रम्हादिका दुर्लभ वांटा । आम्हां फावला राणटां ॥ध्रु.॥

गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥२॥

उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥३॥

गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥४॥

खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥५॥

४३४७

आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥

पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाईं आमुचि माता ॥ध्रु.॥

भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥

तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥

४३४८

गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥

तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥

जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥

तुका म्हणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥३॥

४३४९

बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥

मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥

बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥

तुका म्हणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥

४३५०

वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥

रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥

कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥२॥

तुका म्हणे आस । संनिध चि जगदीशा ॥३॥

४३५१

सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥

सर्वांगें तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥

ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥

तुका म्हणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥

४३५२

जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार ॥१॥

निर्गुण होता तो सगुणासि आला । भक्तिसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥

जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥२॥

सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥३॥

मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥४॥

तुका म्हणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥५॥

४३५३

जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥१॥

नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुम्हां आम्हां ॥ध्रु.॥

येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥२॥

तुका म्हणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥३॥

४३५४

कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥

त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चळिसवाण ॥ध्रु.॥

प्रेतदेह गौरविलें । तैसें विटंबवाणें जालें ॥२॥

तुका म्हणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धिचेष्टा ॥३॥

४३५५

पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।

तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥१॥

रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।

तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥

रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।

तेथें बटकीचें काम । अधमासि तों अधम ॥२॥

देव्हार्‍यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।

तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥३॥

तुका म्हणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥४॥

४३५६

ब्राम्हणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रम्ह नामें एका ॥१॥

लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥ध्रु.॥

सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥२॥

केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥३॥

नामें करा नित्य भजन भोजन । ब्रम्हकर्म ध्यान याचे पायीं ॥४॥

तुका म्हणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥५॥

४३५७

नरदेह वांयां जाय । सेवीं सद्ग‍ूचे पाय ॥१॥

सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पूजीं देव ॥ध्रु.॥

थोराचिये वाटे । जातां भवशोक आटे ॥२॥

प्रल्हादातें तारी । तुका म्हणे तो कंठीं धरीं ॥३॥

४३५८

संचित तैशी बुद्धि उपजे मनामधीं । सांगितलें सिद्धि नव जाय ॥१॥

ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥२॥

घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका म्हणे ॥३॥

४३५९

कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥१॥

तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥

अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥२॥

तुका म्हणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥३॥

४३६०

धन्य जालों हो संसारीं । आम्ही देखिली पंढरी ॥१॥

चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥

करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥

उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥

तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥

४३६१

पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥१॥

तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥

आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥२॥

तुका म्हणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥३॥

४३६२

सोडियेल्या गाईं नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥१॥

सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाईं वनामाजी ॥ध्रु.॥

गाईंगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥२॥

काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥३॥

गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥४॥

तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥५॥

तुका म्हणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥६॥

४३६३

ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृप्ति जाली ॥१॥

मुखींचें उच्छष्टि हिरोनियां खात । विस्मित विधाता देखोनियां ॥ध्रु.॥

दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । विस्मित मानसीं सुरवर ॥२॥

देव ॠषि मुनि सद्धि हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥३॥

तुका म्हणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥४॥

४३६४

आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥१॥

श्वानखररूपी होऊनियां आले । उच्छष्टि कवळ वेचिताति ॥ध्रु.॥

होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥२॥

अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां म्हणे घ्या रे धणी ॥३॥

तुका म्हणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥४॥

४३६५

एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥१॥

एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥

हाता हात हाणे लाही । पळतां घाईं चुकविती ॥२॥

तुका म्हणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥३॥

४३६६

चला वळूं गाईं । दूर अंतरल्या भाईं ॥१॥

खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥

गाईं हकारी कान्हया । म्हणोनि लागती ते पायां ॥२॥

तुका म्हणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥३॥

४३६७

नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥१॥

हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥

जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥२॥

तुका म्हणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥३॥

४३६८

हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥

देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥

आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥२॥

तुका म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥३॥

४३६९

जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥१॥

गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥२॥

तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥३॥

४३७०

स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥१॥

तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥

बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥२॥

कागदीं लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ॥३॥

तुका म्हणे जळो जळो त्याचें ज्ञान। यमपुरी कोण दंड साहे ॥४॥

४३७१

भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खिळिलें त्यासी ॥१॥

समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥

वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥२॥

तुका म्हणे पुंडलीका । भक्तिबळें तूं चि निका ॥३॥

४३७२

आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥१॥

यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥

सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥२॥

तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥३॥

४३७३

भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥१॥

मन बुद्धि जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥

कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥२॥

तुका म्हणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥३॥

४३७४

कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुम्हांपुढें ॥१॥

ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥

तुमची तुम्हां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥२॥

तुका गातो नामीं । तेथें नाहीं आम्ही तुम्ही ॥३॥

४३७५

नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥

लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥२॥

तुका म्हणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥

४३७६

सांवळें सुंदर पाहे दृष्टिभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥१॥

मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाईंसवें सदा ॥ध्रु.॥

मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥२॥

वरपंग भाव नको म्हणे तुका । करीं प्राणसखा नारायणा ॥३॥

४३७७

एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी ॥१॥

कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥

जाउनि पडे दुर्घटवनीं । श्वापदांनीं वेढिली ॥२॥

मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें ॥३॥

मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥

तुका म्हणे चित्ती यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥

४३७८

पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥१॥

पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥

कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।२॥

मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥३॥

तुका म्हणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥४॥

४३७९

उदार कृपाळ पतितपावन । ब्रिदें नारायणा जाती वांयां ॥१॥

वर्णिलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥

तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥२॥

कोण ऐसा भक्त लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥३॥

तुका म्हणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥४॥

४३८०

ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥१॥

पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥

आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥२॥

तुका म्हणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥३॥

४३८१

कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥१॥

विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥

भक्ती देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥२॥

तुका म्हणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥३॥

४३८२

शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥१॥

काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥

जीवपरमात्मा ऐक्यासि । सदा वसो हृदयेंसीं ॥२॥

तुका म्हणे देवा । कंठीं वसावें केशवा॥३॥

४३८३

माझें परिसावें गार्‍हाणें । चत्ति द्यावें नारायणें ॥१॥

माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥

सबाह्यअंतरसाक्ष । ऐसा वेदीं केला पक्ष ॥२॥

तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥

४३८४

गुरुचिया मुखें होइल ब्रम्हज्ञान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥१॥

वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥२॥

तुका म्हणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥३॥

४३८५

देव आतां आम्हीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥१॥

एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥

बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥२॥

पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पई देखा ॥३॥

तुका म्हणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥४॥

४३८६

पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥

निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥

नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥३॥

तुका म्हणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥

४३८७

कीर्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाईं धन विटाळ तो ॥१॥

हरिभक्ताचि माता हे हरिगुणकीर्ति । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥

अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईंना जननीची ॥२॥

तुका म्हणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥३॥

४३८८

पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥१॥

आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥

संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥२॥

परतोनि सोईं धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥३॥

घातलीसे मिठी नाही भक्तिभाव । उदार पंढरिराव तुका म्हणे ॥४॥

४३८९

येई गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥१॥

येई गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥

न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥२॥

तुका म्हणे धांव घालीं कृष्णाबाईं । क्षेम चाहूंबाही देई मज ॥३॥

४३९०

कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥१॥

शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाईं ॥ध्रु.॥

क्षण एक धीर होत नाहीं चित्ति । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥२॥

तुका म्हणे हें चि करीं देई । तई च विश्रामा पावईंन ॥३॥

४३९१

आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत म्हणवावें ॥१॥

पूर्वा भक्त जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेक्षिले तुम्हीं कोणी ॥ध्रु.॥

माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥२॥

करावी म्हणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येईंन मी ॥३॥

तरी माझे हाती देई मनबुद्धि । जरि दयानिधि येशील तूं ॥४॥

तुका म्हणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥५॥

४३९२

माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥

वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥

क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥

साह्य होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥

कृपा करोनि देई दया क्षमा शांती । तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥

माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥

तुका म्हणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥

४३९३

अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥१॥

तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥

मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥२॥

तुका म्हणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥३॥

४३९४

आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥१॥

पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेक्षिलें न सोडीं मी ॥ध्रु.॥

कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥२॥

तुका म्हणे कोठें गुंतलेति हरी । येई झडकरी पांडुरंगा ॥३॥

४३९५

बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥

तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥

ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥

तुका म्हणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥

४३९६

पंचाग्निसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥१॥

सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥

सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥२॥

वाटतें सेवटीं जालासि निष्ठ‍ । न देसी उत्तर तुका म्हणे ॥३॥

४३९७

तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥१॥

बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥

मी तया विश्वासें आलों शरणागत । पूर्वीचें अपत्य आहें तुझें ॥२॥

अनंत ब्रम्हांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥३॥

अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥४॥

ऐसें विचारिलें म्हणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥५॥

तुका म्हणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥६॥

४३९८

काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥१॥

नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥

आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥२॥

तुका म्हणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥३॥

४३९९

नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥

न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥

पूवाअ जाले भक्त असंख्य विरक्त । काम क्रोध अहंते निर्दाळिलें ॥२॥

ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥३॥

कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या ब्रिदासी राखावया ॥४॥

तुका म्हणे एक बाळक अज्ञातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥५॥

नाटाचे २

४४००

अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।

अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥

अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ।

अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥ध्रु.॥

अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।

अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥

अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।

अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥

अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।

अगा ये पंढरिनिवासा । अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥

अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।

अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP