पाळणा पाचूंचा वर खेळणा मोतियांचा
आंत बाळ नवसाचा निद्रा करी
निजसर आले बाळा तुजे डोळे
अंथरूण केलें जाई जुईचें
अंथरुण केलें पांघराया शेला
निजवितें बाळा तुला राजसा
अंथरुण केलें जाई मोगर्यांचे
बाळ गोजिरें ग माझ्या ताईचें
नीज नीज बाळा म्हणूं किती तुला
गुलाबाच्या फुला राजसा
नीज नीज बाळा सोन्याच्या पालखीं
तुला रक्षण जानकी रघुनाथ
तिन्ही सांज झाली दिवे लागणीची वेळ
थांबवीशी खेळ राजसा
नीज नीज बाळा लाडक्या विठ्ठला
अंगाई ही तुला चिमण्या