अंगाई राजस बाळा
ऐकत धुंदींत स्वप्नांचें संगीत
लागो रे डोळ्यासी डोळा ॥ध्रु०॥
तोरण दाराला, सडा अंगणीं
रांगोळ्या सुरेख दिल्या रेखुनी
सजविलें गृह परोपरीनी
तुझ्या रे सुस्वागताला ॥१॥
मातुलीचें तुझ्या स्नेहार्द्र मन
कौतुकाची करी उभी कमान
सुखाच्या छायेंत शांत झोपून
रहा रे कोवळ्या फुला ॥२॥
वाडवडिलांचा कीर्तीसोपान
दाविल तुजला ध्येयवितान
यशाचें रोवून तेथें निशाण
करी रे धन्य स्वकुला ॥३॥
हरित दुःखांचा तिमिर सर्व
विश्वीं हें दीपका अखंड तेव
सदैव जाण तो दीनांचा देव
उभा रे तुझ्या पाठीला ॥४॥