कुरकुरे कान्हा । गाई गेल्या राना
आंबोण आण रे मामा । गाई गुरांना
लागलेला दिवा । मंद त्याची वात
घर झालें शांत । सांज वेळीं
वार्याहून हळू । हालवीते झूला
बांधली दोरीला । जुई फुलें
मिटलेल्या मुठी । नको चोखूं आतां
पाजिलें अमृतां । पोटभर
मीट डोळे मीट । वासरासी गाय
हंबरुन काय । सांगे ऐक
अरे माझे डोळे । पेंगाया लागले
खुद्कन हांसलें । गालीं कोण ?