हरीभक्त बोधला भला सारंगधर फकीर झाला
बोधल्याच्या वाड्याला गेला जाऊनी उभा राहिला
दान करावं आमाला दानाला दुर्वा धान्य
नको अमाला दुर्वाधान्य तुमच्या घरची भागीरथी सुन
ती द्यावी आमा दाना कारनं तुमची भागीरथी सून
फकीर तिथुनी निघाला आपुल्या घरासी आला
आज्ञा तिनं पतीची घेतिली पतीनं पाडिले कान
आज्ञा पुत्राची घेतिली तुमी सांगाल त्या प्रमानं
तुमचं मोडायचं हाये कोन अन्नपूर्णा न्हाऊं घातिली
आनंदानीं वटी भरली वाड्या भाईर निघाली
गेली येशीं चौकामंदी गांवाशीं गांव मिळालं
कैकांच्या पाणी डोळ्याला फकीरांनी धरली हातीं
वाटं वनाच्या लागला गांवाभाईर चालला
एक वन वलांडिलीं दोन वनं वलांडिलीं
तीन वनं वलांडिलीं चौथ्या पांचव्या वनायाला
फकीर बोले अन्नपूर्णाला तुमचं जेवाण डाळरोटी
मी फकीर मागतोय तुकडा जावं आपलं माघारीं
न्हार्ह जायाची माघारीं माजं आईचा रोकड
बोधल्याचं नांव केवढं तुमा ठावं सगळं
फकीर कापं थरथरा दिली सोडून गुप्त झाला
वाड्या बोधल्याच्या गेला तुज्या सुनला देव भेटला
जा घेऊन ये तिजला टाळ मुरदुंग वाजती
दिंडी संतांची नाचती हरीभक्त बोधला राजा
वैकुंठीं लावील्या ध्वजा गांव त्येला मानी राजा