भाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला
दीनबंधु करुणासिंधु ओवाळिन त्याला ॥ध्रु०॥
नवलपरीचीं नव पक्वान्नें करीन स्वयें आजी
श्रवनाचें शंकरपाळें कीर्तन करंजी
हरी स्मरण केली कैसी जिलेबी ताजी
चरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया त्याला ॥१॥
आर्चनाचे अनारसे वंदन चीरोटे
दास्यत्वाचें दिसती कैसे धीव गोमटे
सख्यत्त्वाचा साखरभात वाडावासा वाटे
आत्मनिवेदन मांडे आवडती त्याला ॥२॥
कल्पनेचें कडबोळें नको तेलकट
पंचवीस भाजणीचें नको थालीपीठ
कामक्रोध लोभाचें नको तीळकूट
श्रद्धेचा तो रंगीत पाट त्याल बैसायाला ॥३॥
वैराग्याच्या चांदीचें तें घडविलें ताट
भूतदया रांगूळी ही काढीली दाट
दया क्षमा गडवा पेला काय सांगूं थाट
त्रयोदश गुणीं विडा करुनी देती तयाला ॥४॥
भाऊबीज ऐसी केली द्रौपदीचे घरीं
पंचप्राण पंचारती ओवाळी सुंदरी
भावार्थाचा नारळ ह दिला त्याचेवरी
सुबुद्धीची भारी चोळी त्याने दिली तिजला ॥५॥
कधीं ऐसी भाऊबीज पाहीन नयनीं
तळमळ वाटतसे रात्रंदिन मनीं
हरीताप हरील कृपा जरी मोक्ष दानीं
पुरविली हौस मनींची गायनीं त्या कृष्णाला ॥६॥"