सोमवती अमूशा येती लई लोक वाईला जाती
वाईखालीं किष्णाबाई व्हाती लई लोक सत्त्व सांगती
टाळवीना घेऊनि हातीं गांवांत लोक अभंग गाती
राऊळांत कीर्तनं होतीं देवळांत गुरव नाचती
पंडित पोथी वाचीती आले बामन दान देती
लई लोक निगाले जायला पंढरपूर पहायाला
देव बसवले व्हते ठायाला गुंतले ईश्वर मायाला
तीर्थ बा घडले घाट शिंगणापुरचे चढले
भुलेश्वर शाम कडकडले त्यासी वाहुनि बेलफुलें
येतें आळंदीशीं जाऊनी तुका उभा हट्ट घेऊनी
सांगतो देवाची बा खूण मांडव शोभेचा हुकूम
करा विठ्ठलाचें घ्यान मुखीं असूंदे नारायण
खालीं इंद्रायनीचा घाट वर ज्ञानोबाचा मठ
चमत्कार झाला तुका वैकुंठासी गेला
वर हाल झाडाचा पाला बारा वर्सं पुण्य केलं
सालं सिगस्ताचीं आलीं नाशकांत दान मीं केलं
तिरंबक नाहीं पाहिलें परतुनि माघारीं आलें
भिमाशंकरांत राहिलें पुढें तप्त नर्मदा चाले
ह्याही पाण्याला वड फार ह्यानीं घाट फोडील फार
हौसनी बडूदं चल पाहूं चल रामेश्वराला जाऊं
हाय द्वारकीं ठावू चल बेट द्वारकेला जाऊं
दुही हातांनीं दर्शन घेऊं देवाघरींची हवा बघूं
गाडींत बैसुनी बा आले थेट पुन्यामंदीं उतरलें
नऊखंड पुणं पसरलं दहाखंड काशी बा भरली
न्हाई मनींची हावस पुरली पुना वाट काशीची धरली
जवळ आलीं कशीचीं रानं जागोजाग देवाची ठानं
तिथं करा पिंडदान नदीकाठीं घ्या दर्शन
हिरे माणीक मोतीं वाटी बामन आले दर्शनासाठीं
आंत जागा तीर्थाची थोर सोन्याच्या मंडप हाई वर