आलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून
बसायला टाका पिंढपाट पुसायची जातगोत
याची जात धनगराची आमची गंगा बामनाची
याची आमची सोयरीक न्हाई आमची गंगा द्याची न्हाई
जागा पाहूं जागाईत मळा पाहूं बागाईत
नवरां पाहूं रूपशाई तिथं देऊं गंगाबाई
गंगा ऐकनाशी झाली गेली आईच्या जवळी
अग अग माझे आई आपल्या बारवच्या तीरीं
एक जोगी नवलापरी घेतो सोन्याची किनरी
वाजवीतो नवलापरी मी जातें ज्याच्या घरीं
येडी झाली गंगूबाई ती कुनाचं ऐकत न्हाई
जागा पाहूं जागाईत मळा पाहूं बागाईत
नवरा पाहूं रूपशाई तिथं देऊं गंगाबाई
गंगा ऐकनाशी झाली गेली बापाच्या जवळी
अरे अरे माझ्या बापा आपल्या बारवाच्या तिरी
एक जोगी नवलापरी हातीं सोन्याची किनरी
वाजवीतो नवलापरी गंगा त्याजला वरी
येडी झाली गंगूबाई ती कुनाचं ऐकत न्हाई
जागा पाहूं जागाईत मला पाहूं बागाईत
गंगू ऐकनाशी झाली गेली घराच्या दाराशी
गेली मान मुरडोनी गेली वल्या पदराशीं
लागली पैल्या वनाला उभा रहा बा तूं गड्या
माझीं पावलं वडतीं घरीं पिताजी रडती
लागली दुसर्या वनाला घरीं रहा बा तूं गड्या
माझी पावलं वडती उभा माताजी रडती
एवडी पित्याची फेरी मी का जोग्याची बरी
लागली तिसर्या वनाला उभा उभा राहा तूं गड्या
मला सराट मोडती घरीं बंधूजी रडती
एवडी बंधवाचा फेरी तूं का जोग्याची बरी
चवथ्या पांचव्या वनाला आलं जोग्याचं नगर
गंगा घातली जटयींत मग गेला महालांत
गिरजा गेली शेजघरीं दिलं आंगूळीला पानी
पैला तांब्या जटवरी मग तांब्या अंगावरी
गिरजा गेली लोकाघरीं आकाशाच्या आयाबाया
पैला तांब्या जटवरी मग तांब्या अंगावरी
असूं दे ग गिरजाबाई त्येचा असल विचार कांहीं