दुष्ट दुर्योधन कुळकुळींत कसा ग जन्मला । दूत खेळुनी आरी आणिले पांडवाला ॥
दृष्ट हा शकुनी दुष्ट बुद्धि शिकवी कपटाला । सापळा ग एक गइले पांची वासराला ।
सोडिला बाण शब्दाशी चढे गुणाला । पाही अंतरी कळ काढी माया प्राणाला ।
लागली ग चिंता शरण जाऊं कोणाचे पायीं । धांवरे धांव किष्णा श्रीरंगे माझे आई ।
संकटीं पडलें मी एकदां भेट मज देई ॥१॥
धरोनी मृदुवेणी दुःशासन हासडुनी पाडी । फरफरां ओढीत ग नेतसे सभेंत तातडी ।
डाव्या अंकावरी बस म्हणीतो जोडी । नको ग धरूं ममता भलत्याची आशा सोडी ।
धावोनी ये रे धावोनी ये दीनदयाळू वत्सला । संकट आलें मजवरी दयाळ ।
नको सख्या गुंतु कोठें आयुधा राहिली थोडी । वस्त्रहरणाचा कैफ मांडिती सारी घाई ।
संकटी पडलें मी भेठ एकदां मजला देई ॥२॥
क्षीरसागरीचा विलासी मोठा घ्यानींमनीं । अजुनि कसा ग येईना सावळा चक्रपाणी ।
रंगमहालीं नेला कां ग सत्यभामानीं । वाट बघूनि शिणले नेत्र माझे दोन्ही ।
होईल रे हानी सख्या सोडीव येऊनी । संकटीं पडलें मजला भेट एकदां देंई ॥३॥
न सोडी सत्त्व तो धर्मराज गंभीर । भीमअर्जुन भाकेला गंतले शर ।
नकूल सहदेव रणी भैरव वीर अनीवर । न बोलतां म्हणती रागावला ईश्वर ।
न अंधीं भीष्मद्रोण आला विदुर । सभा लोक पाहे टकमकां थोर थोर ।
एकली मी आहें त्याला गत करावी काई । संकटीं मी पडलें एकदां भेट मज देई ॥४॥
ऐकोनी इतके गहिंवरलें जगजीवन । कोण्या वेड्यानं गांजिली माझी हरीण ।
ऐकोनी धावा मनीं योग ठाकोनी । नाभी नाभी शिष्टाचा ध्वनी ऐकोनी ।
खवळले प्रेम झालें अंगाचें स्फुरण । सावरल्या जाईजुई । संकटीं मी पडलें एकदां भेट मज देई ॥५॥
दुर्योधनानें हासडितां निरी । फेडिली पहिली सोनेरी चटक अंजिरी । फेडिली दुसरी शेलारी वैजापुरी ।
फेडिली तिसरी पुन्नड नागद भर्जरी । हिरवा दोखा कंचुकी गोरु पट्यावा नेसली ।
चुन्ना खंबाईत हिरवी जाई । संकटीं पडलें एकदां भेट मज देई ॥६॥
सोडिलीं दिंडं काडिली बोभाटाची खजोरी । डाळिंबी काळी चंद्रकळा झळझळी ।
गुलाबी हिरवी वाण पुरीची खंजुरी । डाळिंबी शेवटला म्हणोनि । आपला पितांबर झाकी भेटला मजला देव श्रीहरी ।
द्रौपदीला हर्ष झाला । धाव रे धाव किष्ण श्रीरंगें माझे आई । संकटीं पडलें मी एकदां भेट मज देई ॥७॥