सांगा प्रभूला सैंपाक झाला । विठुजी जेवायला चला ॥ध्रु०॥
रांगोळ्या काढुनिया लावील्या समया । लाविल्या उदबत्या सुगंधीया ।
चांदीचा हा मांडूनी पाट । कनकाचें शोभतें बघा ताट । पेला घेतिला पांचूचा कांठ ।
सर्व थाट घडवुनीं सुदर केला । विठुजी जेवायला चला ॥१॥
शोभे पान केळीचें लिंबलवणी । डाळीची नारळाची वाटली चटणी ।
कोशिंबीरी पेरू केळीची फणी । रायतीं रुचिर झालीं साजणी । भरीत वांग्या दोडक्याचें भोपळ्याचें ।
आवडीनें देवा केलें मी तुजला । विठुजी जेवायला चला ॥२॥
वाटलेली डाळ आंब्याची केली । सर्व तर्हेची लोणचीं वाढियलीं ।
चिंचेचा बघा ठेचा हा केला । पापड पापडीही तळली पानाला । आळूवड्या पाखड्या पुरवड्या वड्या ।
हावसेनें मी घागराहि केला । विठुजी जेवायला चला ॥३॥
कुरवड्या सांडगे आणीक फेण्या । वाढीयल्या देवा तुम्हां खाण्या ।
शिकरण आंबरस बेत हा खास । भजीं झालीं आज खमंग सुरस ।
आकवड्या, साटोर्या केल्या कचोर्या । चिरोटा, मांडा, कानवलाहि केला । विठुजी जेवायला चला ॥४॥
बटाटे फुलवर कोवळीं वांगीं । भोपळा नवलकोल यांची हो भाजी ।
डब्बल बीं बिरड्या आणि मडक्या । केल्या उसळी कणसा चवळ्यांच्या ।
रसाळी त्रिपळी अंगरस घातिला । जेवायला विठुजी चला ॥५॥
कटाच्या आमटीनें वाटी भरली । सांबार कढी सार सर्व वाढीलीं ।
गव्हाची तया करूनी खीर । घातले तयासी सुंदर केशर । लाडू दळीया, मूगदळिया, बुंदीकळिया ।
मोतीचूर बेसनहि देवाला केला । विठुजी जेवायला चला ॥६॥
गळपोळी, साखरपोळी, परणपोळी । श्रीखंड, बासुंदी घीवर जिलेबी ।
आंब्याचा तो काढुनिया रस । मीर पुडीच्या त्या लावीला वास ।
साखर नारळीचा मटाराचा भात केला । विठुजी जेवायला चला ॥७॥
दूध, तूप, ताक, दहीं, आदमोरें । तूप वाढी लिंबूं पिवळें भातावर ।
घेऊनी आपोष्णी घालीं मी प्रीती । स्वस्थ जेवावें तुम्ही देवा आजला ।
विठुजी जेवायला चला ॥८॥